पाण्याअभावी गांडूळ खत प्रकल्प संकटात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2018 09:48 PM2018-05-16T21:48:38+5:302018-05-16T21:48:38+5:30
शहरातील सुभाषचंद्र बोस उद्यानातील केरकचऱ्याची योग्य विल्हेवाट लावण्यासाठी कचऱ्यापासून गांडूळ खत तयार करण्याचा प्रकल्प तयार करण्यात आला. मात्र पाणी आणि तांत्रिक अडचणी अभावी गांडूळ खत तयार करण्याची प्रक्रिया बंद असून हा प्रकल्प सुद्धा संकटात आला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : शहरातील सुभाषचंद्र बोस उद्यानातील केरकचऱ्याची योग्य विल्हेवाट लावण्यासाठी कचऱ्यापासून गांडूळ खत तयार करण्याचा प्रकल्प तयार करण्यात आला. मात्र पाणी आणि तांत्रिक अडचणी अभावी गांडूळ खत तयार करण्याची प्रक्रिया बंद असून हा प्रकल्प सुद्धा संकटात आला आहे.
केरकचऱ्याची योग्य विल्हेवाट लावून त्यातून उत्पन्न मिळण्यासाठी गांडूळ खत प्रकल्प हा उत्तम पर्याय आहे. नगर परिषदेच्या सिव्हिल लाईन येथील सुभाषचंद्र बोस उद्यानात दररोज झाडांचा मोठ्या प्रमाणात पालापाचोळा जमा होतो. गांडूळ खत निर्मितीसाठी पालापाचोळा महत्त्वाचा आहे. त्यामुळे नगर परिषदेने सुभाषचंद्र बोस उद्यानात गांडूळ खत निर्मिती करण्याचा प्रकल्प सुरू केला. यासाठी उद्यानातील एका भागात एका टाकी तयार करण्यात आली. यामध्ये पालापाचोळा, गांडूळ आणि पाणी टाकले जात होते. मात्र मधल्या काळात पाण्याची समस्या निर्माण झाल्याने गांडूळ खत निर्मितीचे काम ठप्प झाले आहे.
गांडूळ खत तयार करण्यासाठी नगर परिषदेने अग्निश्मन विभागाकडून टँक मागविला होता. उद्यान विभागाचे प्रमुख मिश्रा यांनी नगर परिषद पाणी पुरवठा विभागाचे अभियंता उमेश शेंडे यांच्याकडे वांरवार पाणी पुरवठा करण्यासंदर्भात पाठपुरावा केला. मात्र उद्यानातील गांडूळ खत प्रकल्पासाठी पाणी उपलब्ध करून देण्यात आले नाही. विशेष म्हणजे उद्यानात गांडूळ खत प्रकल्प तर तयार करण्यात आला, मात्र यासंबंधीची तांत्रिक माहिती संबंधित कर्मचाऱ्यांना देण्यात आली नाही. गांडूळ खत निर्मिती प्रक्रिया सुरू करुन बऱ्याच कालावधी लोटला. मात्र अद्यापही या प्रकल्पातून गांडूळ खत विक्रीला सुरूवात झालेली नाही. पाणी आणि इतर अडचणीमुळे सध्या गांडूळ खत निर्मितीचे काम पूर्णपणे ठप्प असल्याची माहिती आहे.
उद्यानात गांडूळ खत तयार करण्यासाठी तयार केलेल्या टँकची काय स्थिती आहे, त्यामध्ये दररोज पालापाचोळा आणि पाणी टाकले जात आहे किंवा नाही, गांडूळ तयार होत आहे की नाही. यासर्व गोष्टींकडे नगर परिषदेच्या जबाबदार अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष झाले आहे. विशेष म्हणजे उद्यानातील केरकचरा सुध्दा आता गांडूळ खत तयार करण्याच्या टँकमध्ये टाकला जात नसून तो इतरत्र फेकला जात असल्याची माहिती आहे. त्यामुळे पालापाचोळ्यापासून गांडूळ खत तयार करुन त्यापासून आर्थिक उत्पन्न मिळविण्याचे नगर परिषदेचे स्वप्न केवळ स्वप्न ठरत आहे.
उत्पन्न वाढविण्याकडे दुर्लक्ष
नगर परिषदेच्या मालमत्ता कर थकबाकीच्या आकड्यात दरवर्षी वाढ होत असल्याने नगर परिषद आधीच अडचणीत आली आहे. नगर विकास विभागाने नगर परिषदेला मालमत्ता कर वसुली आणि उत्पन्नाचे स्त्रोत वाढविण्याची वांरवार सूचना केली. मात्र नगर परिषदेने ही बाब अद्यापही गांर्भियाने घेतली नाही. त्यामुळेच उत्पन्नाचे स्त्रोत समजला जाणारा गांडूळ खत प्रकल्प बंद पडला असताना त्याकडे पालिकेचे लक्ष नाही.
घन करचरा व्यवस्थापनाकडे दुर्लक्ष
गोंदिया शहरातील केरकचऱ्याची समस्या अद्यापही मार्गी लागली नाही. घनकचरा प्रकल्प सुद्धा अद्यापही कागदावरच आहे. यासाठी जागा शोधण्याची मोहीम सुरू असल्याची माहिती आहे. शहरातील केरकचऱ्याची विल्हेवाट लावण्यात हा प्रकल्प महत्त्वपूर्ण ठरणार होता. मात्र तो प्रकल्प सुध्दा रखडल्याचे चित्र आहे.
गांडूळ खताला मागणी
सध्या शेतकऱ्यांचा कल रासायनिक खताऐवजी सेंद्रिय आणि गांडूळ खताकडे अधिक आहे. चारशे ते पाचशे रुपये प्रती किलो दराने गांडूळ खत विकले जात आहे. तर नगर परिषदेकडे गांडूळ खत निर्मितीसाठी सर्व सोईसुविधा उपलब्ध असूृन यातून चांगले उत्पन्न सुद्धा मिळू शकते. मात्र नगर परिषदेच्या अधिकाऱ्यांचे याकडे दुर्लक्ष झाले असल्याने नगर परिषदेचे उत्पन्न वाढविण्यात अडचण निर्माण होत आहे.
गांडूळ खत विक्री पूर्वी त्याची तपासणी करावी लागते. त्यासाठी गांडूळ खताचे नमुणे तपासणीसाठी नागपूर येथे पाठविण्यात आले आहे. तपासणी अहवाल प्राप्त झाल्यानंतर गांडूळ खत विक्रीची प्रक्रिया सुरु केली जाईल. उद्यानात पाणी उपलब्ध असल्याने अतिरिक्त पाण्याची व्यवस्था केली नाही.
- उमेश शेंडे,
अभियंता पाणी पुरवठा विभाग.