रमा ग्रामसंघाच्या वतीने गांडूळखत निर्मिती प्रकल्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2021 04:22 AM2021-06-02T04:22:31+5:302021-06-02T04:22:31+5:30
बोंडगावदेवी : आजघडीला प्रत्येक क्षेत्रात महिला वर्ग आघाडीवर दिसत आहे. मिळालेल्या संधीचे सोने करण्यात महिला वर्गाला कुणीही अडवू शकत ...
बोंडगावदेवी : आजघडीला प्रत्येक क्षेत्रात महिला वर्ग आघाडीवर दिसत आहे. मिळालेल्या संधीचे सोने करण्यात महिला वर्गाला कुणीही अडवू शकत नाही. याचा प्रत्यय तालुक्यातील चान्ना (बाक्टी) येथील रमा ग्रामसंघाच्या सहभागी महिलांनी गावात गांडूळखत निर्मिती प्रकल्प उभारून प्रत्यक्षात आणून दाखविला.
तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष अर्जुनी-मोरगाव, स्वराज प्रभाग संघ बोंडगावदेवीअंतर्गत महाराष्ट्र राज्य जीवनोन्नती अभियान उमेदअंतर्गत चान्ना या गावामध्ये २०१६ मध्ये रमा ग्रामसंघाची निर्मिती करण्यात आली. ग्रामसंघात २८ महिला बचत गट संलग्न असून, ३०५ महिलांचा सहभाग आहे. ग्रामीण भागातील महिला स्वयंस्फूर्त होऊन त्यांचा जीवनस्तर उंचावा गावामध्ये रोजगार मिळाला. महिलांच्या हातामध्ये कारभार देऊन संघाच्या माध्यमातून उद्योग निर्मिती होऊन कुटुंबाच्या चरितार्थास हातभार लागावा, महिलांचे सक्षमीकरण व्हावे यासाठी उमेद अभियानाच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविले जात आहेत. सेंद्रिय शेतीला चालना मिळावी म्हणून राष्ट्रीय आर्थिक परिवर्तन प्रकल्पच्या माध्यमातून शेतकरी महिलांचे सेंद्रिय शेतीचे गट तयार करण्यात आले. महिलांनी सेंद्रिय शेती करण्यास पुढाकार घ्यावा यासाठी महिलांना प्रशिक्षण देण्यात आले. आर्थिक परिवर्तन प्रकल्पांतर्गत तालुक्यात सेंद्रिय गटाची स्थापना करण्यात आली. ग्रामसंघाला वेळोवेळी मार्गदर्शन करण्यात आले. चान्ना येथील रमा ग्रामसंघाने गांडूळखत निर्मिती प्रकल्प सुरू करण्याचा मनोमन चंग बांधला.
......
ग्रामपंचायतीने दिले शेड तयार करून
ग्रामपंचायतीच्या वतीने स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण)अंतर्गत गांडूळखत निर्मिती प्रकल्प शेड गावाबाहेर बांधण्यात आले. ग्रामसंघाने ग्रामपंचायतीला गांडूळखत निर्मितीसाठी शेडची मागणी केली. ग्रामसंघाच्या महिलांची दृढ इच्छा पाहून ग्रामपंचायतीने शेड उपलब्ध करून दिले. प्रकल्पासाठी आवश्यक असलेल्या भांडवलाची गटाकडून सभासद शुल्काच्या स्वरूपातून उभारणी करण्यात आली.
...........
...अशी होतेय गांडूळ निर्मिती
गांडूळखताला लागणारा सर्व कच्चा माल गावामधून खरेदी केला. शेणखत, पालापाचोळा मोठ्या प्रमाणात मिळाला. उच्चप्रतीचे गांडूळ जमा करून शेणखतामध्ये मिसळवले. आवश्यकतेनुसार वेळोवेळी गांडुळांना पाणीपुरवठा केला. गांडूळखत तयार होण्याचा कालावधी ४० ते ५० दिवसांचा असतो. एका फेरीला दहा हजार रुपये खर्च येतो. ५ ते ६ टन खत निर्माण होतो. गांडुळांची संख्याही वाढते. खत विक्री केल्यानंतर संपूर्ण खर्च वजा केला असता २५ हजार शुद्ध नफा ग्रामसंघाला मिळतो.
.....
गांडूळखतातून रोजगार निर्मिती
महिला ग्रामसंघाच्या वतीने निर्मिती केलेले गांडूळखत शनिवार विक्रीसाठी लाखांदूर तालुक्यात पोहोचविण्यात आले. याप्रसंगी तालुका अभियान व्यवस्थापक रेशीम नेवारे, शहारे, भेंडारकर, रिता दडमल, बोंडगावदेवी प्रभागाच्या प्रभारी व्यवस्थापक अर्चना रामटेके, ग्रामसंघाच्या सरिता रामटेके, निर्मला मरस्कोल्हे, मंगला शेंडे, आशा फुंडे, सविता राखडे, शीला लोगडे, संगीता गायकवाड, हेमलता सोनवाने, श्वेता डोंगरवार, चित्रकला शेंडे, सत्यफुला फुंडे इत्यादी पदाधिकारी महिला उपस्थित होत्या.