पदे चार, इच्छुक 38, आता कोणता फाॅर्म्युला लावायचा?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2022 05:00 AM2022-05-14T05:00:00+5:302022-05-14T05:00:10+5:30
जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्षपदाची निवडणूक १० मे रोजी पार पडली. भाजपने सत्ता स्थापन करण्यासाठी राष्ट्रवादी, अपक्ष आणि चाबीच्या सदस्यांना साेबत घेतले. त्यामुळे या सर्व सदस्यांची संख्या ४० वर पोहोचली. सत्तेचे समीकरण तयार करताना भाजपने अपक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसला नेमके काय आश्वासन दिले? हे त्यांनाच ठाऊक. मात्र, आता विषय समिती सभापतिपदासाठी २३ मे रोजी निवडणूक होत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : जिल्हा परिषद विषय समिती सभापतिपदाची निवडणूक येत्या २३ मे रोजी होऊ घातली आहे. सभापतिपदी चार आणि इच्छुक ३८ सदस्य असल्याने सभापतिपदी नेमकी कुणाची वर्णी लावायची? असा प्रश्न जिल्ह्यातील भाजप नेत्यांसमोर निर्माण झाला आहे. त्यामुळे ते यासाठी कोणता फार्म्युला लावून ताेडगा काढतात, याकडे लक्ष लागले आहे.
जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्षपदाची निवडणूक १० मे रोजी पार पडली. भाजपने सत्ता स्थापन करण्यासाठी राष्ट्रवादी, अपक्ष आणि चाबीच्या सदस्यांना साेबत घेतले. त्यामुळे या सर्व सदस्यांची संख्या ४० वर पोहोचली. सत्तेचे समीकरण तयार करताना भाजपने अपक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसला नेमके काय आश्वासन दिले? हे त्यांनाच ठाऊक. मात्र, आता विषय समिती सभापतिपदासाठी २३ मे रोजी निवडणूक होत आहे. यात आरोग्य व शिक्षण, महिला व बालकल्याण, कृषी व पशुसंवर्धन, अर्थ व बांधकाम आणि समाजकल्याण सभापती असे एकूण पाच विभाग आहे. यापैकी उपाध्यक्षाकडे नेमका कुठला विभाग दिला जातो, हेदेखील महत्त्वपूर्ण ठरणार आहे. तर भाजपच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार महिला व बालकल्याण सभापतिपदी पोर्णिमा ढेंगे यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे. तर अर्थ व बांधकाम, समाज कल्याण या विभागाची सभापती पदे भाजप स्वत:कडे ठेवणार असल्याची माहिती आहे. अध्यक्षपद तिरोडा विधानसभा तर उपाध्यक्षपद अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्राला देण्यात आले. त्यामुळे आता उर्वरित क्षेत्राचा समतोल साधण्यासाठी गोंदिया, आमगाव आणि देवरी तालुक्यातील सदस्यांना प्राधान्य दिले जाणार असल्याचे बोलले जाते. आमगाव तालुक्यातून हनवंत वट्टी यांच्या नावाची चर्चा आहे. तर देवरी तालुक्यातून सविता पुराम यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. मात्र अजूनही सभापतींच्या नावावर शिक्कामोर्तब झाले नसून याचा निर्णय भाजपचे वरिष्ठ नेते घेणार असल्याची माहिती आहे. तर भाजपसह सत्तेत सहभागी झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस, अपक्ष आणि चाबीच्या सदस्यांनी सुध्दा यावर अद्याप कुठलेच वक्तव्य केले नसून वेट अँड वॉचची भूमिका स्वीकारली आहे.
जि. प. अध्यक्षांनी केली खुर्चीची पूजा
- जि. प. अध्यक्ष पंकज रहांगडाले यांनी बुधवारी अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला. मात्र, भाजप जिल्हाध्यक्षांनी त्यांना खुर्चीची पूजा करूनच खुर्चीवर बसा, असा सल्ला दिला. त्यामुळे त्यांनी त्यांच्याच उपस्थितीत खुर्चीची पूजा करून पदभार स्वीकारल्याची चर्चा आहे. यावेळी भाजपच्या सर्व सदस्यांनी शपथसुध्दा ग्रहण केल्याची माहिती आहे.
युतीवरून भाजपमध्ये धुसफूस
- जिल्हा परिषदेत सत्ता स्थापन करताना भाजपने राष्ट्रवादी काँग्रेसला सोबत घेतले, ही बाब काही भाजप नेते आणि जि. प. सदस्यांच्या अद्यापही पचनी पडलेली नाही. ते यावर उघडपणे बोलत नसले तरी १० मेपासून भाजपमध्ये यावरून अंतर्गत कलह सुरू असल्याची माहिती आहे. तर या कलहाचा स्फोट होऊ नये, यासाठी भाजपचे वरिष्ठ नेते नाराज सदस्यांना डोस देणार असल्याचे बोलले जाते.
नागपूरवरून येणार लिफाफा
अध्यक्षपदी कुणाची वर्णी लावायची? याचा निर्णय नागपुरातील भाजपच्या दोन्ही वरिष्ठ नेत्यांनी घेतला. त्यानंतर विषयी समिती सभापतिपदी कुणाची वर्णी लावायची, याचा निर्णयसुध्दा नागपुरात होणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे नावांचा लिफाफा नागपूरवरून येणार असल्याची चर्चा आहे.