पशुवैद्यकीय दवाखाना वाऱ्यावर
By admin | Published: October 3, 2015 01:42 AM2015-10-03T01:42:40+5:302015-10-03T01:42:40+5:30
येथे पशूवैद्यकीय दवाखाना म्हणजे कृत्रीम रेतन केंद्र बऱ्याच काळापासून आहे
१५ वर्षांपासून डॉक्टर नाही : बदलीच्या ठिकाणी येण्यास टाळाटाळ
गोठणगाव : येथे पशूवैद्यकीय दवाखाना म्हणजे कृत्रीम रेतन केंद्र बऱ्याच काळापासून आहे. मात्र डॉक्टरअभावी जून २००१ पासून प्रभारी वैद्यकीय अधिकाऱ्याच्या भरवशावर काम सुरु आहे. प्रभारी अधिकारीसुद्धा नाममात्र आहेत. त्यामुळे सदर पशुवैद्यकीय दवाखाना गेल्या १५ वर्षांपासून वाऱ्यावरच असल्याचे चित्र दिसून येत आहे.
जून २००१ पूर्वी येथे डॉ. दुसावार कार्यरत होते. त्यांच्या बदलीनंतर सदर कृत्रिम रेतन केंद्रात एकही डॉक्टर रुजू झाला नाही. त्यामुळे १५ वर्षांपासून गोपालकांना आपल्या जनावरांवर योग्य औषधोपचार करता येत नाही. उपचाराअभावी अने जनावरे मृत्यूमुखी पडतात. या प्रकाराने त्यांच्यावर आपली जनावरे विकण्याची वेळ आली आहे. वातावरण बदलामुळे अनेक साथीचे रोग उद्भवतात. मात्र वेळेवर उपाचार होत नसल्यामुळे जनावरे मृत्यूमुखी पडतात. या प्रकारामुळे शेतकरी व गोपालक त्रासले असून त्वरित पशूवैद्यकीय दवाखान्यात डॉक्टरची नियुक्ती करण्याची मागणी करण्यात आली आहे. यासंबंधी अनेकदा वरिष्ठांचे लक्ष वेधण्यात आले. परंतु उपयोग त्याचा काहीही उपयोग झाला नाही.
गोठणगाव येथील कृत्रिम रेतन केंद्र श्रेणी ०२ साठी पशुवैद्यकीय अधिकारी अ.दि. खामगावर (जिल्हा कृत्रिक रेतन केंद्र बीड) यांना पशुसंवर्धन खात्याचे आदेश (एजीओ-३ (प्र.क्र. ४१४) (बदली)/५४६/२०१५ पस-१ पुणे-६ दि. ३०/०५/२०१५ व सहायक/पस/१६/२०१५, पुणे-६ दि.१०/०६/२०१५) नुसार सहायक आयुक्त पशुसंवर्धन, तालुका लघु पशुवैद्यकीय सर्वचिकित्सालय अर्जुनी-मोरगाव, रापवैद श्रेणी-२ गोठणगाव जि. गोंदिया येथे बदलीचे आदेश देण्यात आले. परंतु संबंधित वैद्यकीय अधिकारी अद्यापही रुजू झालेले नाही.
यावरुन असे निदर्शनात येते की सदर ठिकाणी रुजू होण्यास ते टाळाटाळ करीत आहेत किंवा पसंतीच्या ठिकाणी रुजू व्हावे, अशी त्यांची मागणी आहे, असे म्हणणे वावगे ठरणार नाही. मात्र गोठणगाव परिसरातील शेतकरी व गोपालक त्रस्त झाल्यामुळे रुजू होणे सक्तीचे करुन गोपालकांच्या समस्या मार्गी लावाव्या, अशी मागणी होत आहे. (वार्ताहर)
परिचर झाले डॉक्टर
पशु वैद्यकीय दवाखान्यात एक डॉक्टर व एक परिचर अशा दोन जागा आहेत. परंतु १५ वर्षांपासून डॉक्टर नसल्यामुळे परिचर हुपचंद भैसारे डॉक्टरची भूमिका निभवताना दिसतात. तेसुद्धा एका आठवड्यामध्ये दोन दिवस गोठणगाव तर चार दिवस सहायक आयुक्त, पशुसंवर्धन, तालुका लघु पशुवैद्यकीय सर्वचिकित्सालय, अर्जुनी-मोरगाव येथे त्यांना आपले कर्तव्य पार पाडावे लागते. जुलै २०१४ पासून पशुवैद्यकीय अधिकारी मदीकुंटावार यांच्याकडे प्रभार सोपविण्यात आला आहे. परंतु गोठणगाव कुठे आहे? हेसुद्धा त्यांना माहीत नसल्याचे निदर्शनास येत आहे.