बळीराजा लागला कामाला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2019 10:12 PM2019-07-29T22:12:34+5:302019-07-29T22:13:09+5:30
मागील तीन दिवसांपासून संततधार बरसत असलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांना थोडाफार दिलासा मिळाला आहे. मोठ्या आशेने शेतकरी पुन्हा एकदा कामाला लागला आहे.जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी ३६० मिमी पावसाची नोंद झाली आहे.अपेक्षेच्या तुलनेत आत्तापर्यंत अर्धाच पाऊस झाला आहे.त्यामुळे आजही दमदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : मागील तीन दिवसांपासून संततधार बरसत असलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांना थोडाफार दिलासा मिळाला आहे. मोठ्या आशेने शेतकरी पुन्हा एकदा कामाला लागला आहे.जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी ३६० मिमी पावसाची नोंद झाली आहे.अपेक्षेच्या तुलनेत आत्तापर्यंत अर्धाच पाऊस झाला आहे.त्यामुळे आजही दमदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे.
जिल्ह्यातील पर्जन्यमान बघता आतापर्यंत सरासरी ६४४ मिमी पाऊस पडणे अपेक्षित आहे.असे असताना मात्र वरुण राजाची नाराजी जिल्ह्याला चांगलीच भोवली आहे.आतापर्यंत जिल्ह्यात सरासरी ३६० मिमी पावसाची नोंद झाली आहे. हे बघता अद्याप सरासरी २८४ मिमी पावसाची तूट कायम आहे.जून महिना कोरडा गेला असतानाच जुलै महिन्यातही पावसाने अपेक्षापूर्ती केली नाही.पंधरावडाभर दडी मारल्यानंतर मागील तीन दिवसांपासून पाऊस जिल्ह्यात परतून आला आहे.
या पावसामुळे शेतकºयाला थोडाफार दिलासा मिळाला असून तो शेतीच्या कामाला पुन्हा जुंपल्याचे चित्र आहे. मध्यंतरी पावसाने दडी मारल्याने कित्येकांची रोवणी अडकून पडली होती.तर नर्सरीही वाळत आल्याचे चित्र जिल्ह्यात बघावयास मिळाले.अशात या पावसामुळे शेतकरी रोवणीच्या कामाला लागला आहे.
पावसाच्या या खेळीने आता उशीर झाला असतानाही शेतकरी एका आशेने आपल्या शेतीत जुंपल्याचे दिसून येत आहे.असे असताना आजही दमदार पावसाची गरज आहे.
जिल्ह्यातील प्रकल्प तहानलेलेच
मागील वर्षीच्या तुलनेत यंदा कमी पाऊस झाल्याने आजही जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पांत नाममात्र पाणीसाठा आहे. हे प्रकल्प तहानलेलेच दिसून येत आहेत. जिल्ह्यातील प्रकल्पांवर नजर टाकल्यास मागील २९ जुलैपर्यंत इटियाडोह प्रकल्पात १५२.६८ दलघमी (४८.०३ टक्के) पाणीसाठा असतानाच यंदा फक्त ८४.५१ दलघमी (२६.५८ टक्के) पाणीसाठा आहे.सिरपूर प्रकल्पात मागील वर्षी ४२.७५ दलघमी (२६.७५ टक्के) पाणीसाठा असताना यंदा ३६.५८ दलघमी (२२.९० टक्के) पाणीसाठा आहे. पूजारीटोला प्रकल्पात मागील वर्षी ३२.५६ दलघमी (७४.८० टक्के) पाणीसाठा असताना यंदा ३२.५६ दलघमी (२०.१४ टक्के) पाणीसाठा असून कालीसराड प्रकल्पात मागील वर्षी १८.१९ दलघमी (७०.८६ टक्के ) पाणीसाठा असतानाच यंदा फक्त ३.८१ दलघमी (१४.६४ टक्के) पाणीसाठा आहे.पावसाळ््यात प्रकल्पांची ही स्थिती असल्यास दमदार पाऊस न बरसल्यास येणारा उन्हाळा मात्र कसा राहणार याची कल्पनाच अंगावर काटा आणणारी आहे.