दोन दिवसांपूर्वीही झाली होती पीडित महिलेला मारहाण
By Admin | Published: June 4, 2016 01:38 AM2016-06-04T01:38:50+5:302016-06-04T01:38:50+5:30
गोरेगाव तालुक्याच्या कटंगी येथील एका महिलेसह तिच्या दोन अल्पवयीन मुलींवरील अत्याचारप्रकरणी...
मायलेकींवरील अत्याचार : आरोपी तेजेंद्रच्या सहभागाबद्दल पोलिसांना संशय
गोंदिया : गोरेगाव तालुक्याच्या कटंगी येथील एका महिलेसह तिच्या दोन अल्पवयीन मुलींवरील अत्याचारप्रकरणी सदर घटनेच्या दोन दिवस आधी गावातीलच एका महिलेने व तिच्या मुलाने पीडित महिलेला मारहाण केली असल्याची बाब पोलीस तपासात पुढे येत आहे. मात्र त्याबद्दल तक्रारीत कोणताही उल्लेख नसल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यामुळे या प्रकरणाच्या पार्श्वभूमीबद्दल तर्कवितर्क सुरू आहेत.
या प्रकरणी पोलिसांनी अद्याप अटक न केलेल्या आरोपी तेजेंद्र हरिणखेडेचा या प्रकरणात संबंध नसण्याची शक्यता पोलिसांनी काही लोकांच्या बयाणाच्या आधारे व्यक्त केली आहे. त्यामुळे त्याला अद्याप अटक झालेली नाही.
दरम्यान, या प्रकरणात पीडित महिलेने प्रसार माध्यमासमोर व्यक्त केलेल्या व्यथेनंतर पोलीस प्रशासनाने हे प्रकरण अधिक गांभिर्याने घेतले आहे. मात्र बलात्काराच्या गुन्हा नोंद करण्याची कार्यवाही अद्यापही झालेली नाही.
पोलिसात तक्रार करताना त्या महिलेने आपल्यावर बलात्कार झाल्याचा कोणताही उल्लेख केला नसल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. पोलिसांनी ‘इन कॅमेरा’ ते बयाण घेतले आहे. त्यामुळे हे प्रकरण लैंगिक छळाचे नाहीच या भूमिकेवर पोलीस ठाम आहेत.
या प्रकरणात ठाणेदार शिंदे यांनी त्या महिलेच्या घराशेजारी राहणाऱ्या महिलांचे बयान घेतले आहे. गोरेगाव येथील एका महिलेचा पती सद्या तुरूंगात आहे. त्याच्या पत्नीने व मुलाने तक्रारकर्त्या महिलेला या घटनेच्या दोन दिवसांपूर्वी मारहाण केल्याची माहिती त्यातून पुढे आली. मात्र त्यासंदर्भात पीडित महिलेने कोणतीही तक्रार दिली नाही.
पोलिसांनी इतरही काही लोकांचे बयान घेतले. परंतु त्यात घटनेच्या दिवशी असा काही प्रकार किंवा आरडाओरड झाली नाही, असे शेजारच्या महिलांचे म्हणणे आहे. मारहाण होण्याची घटना तक्रारीत नमूद केलेल्या दोन दिवसांपूर्वीची असून ती रात्री ९ वाजताची नाही तर सायंकाळी ६ वाजताची आहे. त्यावेळी जितेंद्र हरिणखेडे तिथे नव्हता असे ठाणेदार शिंदे यांनी सांगितले.
दि.२६ रोजी रात्री अत्याचार व मारहाणीची घटना झाल्याचे पीडित महिलेचे म्हणणे आहे. तर पोलिसांनी घेतलेल्या बयाणानुसार त्याच्या दोन दिवस आधी म्हणजे दि.२४ ला मारहाणीचा प्रकार झाला आहे. म्हणजेच या घटनेला आता आठवडा लोटला आहे. तरीही त्या महिलेच्या चेहऱ्यावर मारहाणीच्या खुणा अजूनही कायम आहेत. यावरून झालेली मारहाण किती जबर होती हे स्पष्ट होते. त्यामुळे या प्रकरणाचा योग्य तपास करून पीडित महिलेला योग्य न्याय द्यावा, अशी अपेक्षा केली जात आहे. (तालुका प्रतिनिधी)