विदर्भ एक्स्प्रेस निश्चित करते सोनोग्राफीची डेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2018 09:23 PM2018-05-03T21:23:41+5:302018-05-03T21:23:41+5:30
येथील बहुतेक शासकीय कार्यालयाची वेळ विदर्भ एक्स्प्रेस ठरविते. मात्र आता बाई गंगाबाई रुग्णालय सुध्दा याला अपवाद राहिले नाही. सोनोग्राफी करण्यासाठी येणाऱ्या गर्भवती महिलांना सुध्दा विदर्भ एक्स्प्रेसची प्रतीक्षा करावी लागत असल्याचीे धक्कादायक बाब पुढे आली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : येथील बहुतेक शासकीय कार्यालयाची वेळ विदर्भ एक्स्प्रेस ठरविते. मात्र आता बाई गंगाबाई रुग्णालय सुध्दा याला अपवाद राहिले नाही. सोनोग्राफी करण्यासाठी येणाऱ्या गर्भवती महिलांना सुध्दा विदर्भ एक्स्प्रेसची प्रतीक्षा करावी लागत असल्याचीे धक्कादायक बाब पुढे आली आहे. सोनोग्राफीसाठी डेट देण्याची जबाबदारी ज्या कर्मचाºयाकडे आहे. ते नागपुरवरुन अप-डाऊन करतात. त्यामुळे सकाळी विदर्भ एक्सप्रेस येईपर्यंत गर्भवती महिलांना रुग्णालयात त्यांची प्रतीक्षा करण्याशिवाय पर्याय नसतो.
जिल्ह्यातील एकमेव असलेले बाई गंगाबाई महिला रुग्णालय नेहमी कुठल्या ना कुठल्या कारणावरुन प्रकाश झोतात असते. एकमेव सरकारी महिला रुग्णालय असल्याने जिल्हाभरातील रुग्ण येथे उपचार घेण्यासाठी येतात. मात्र रुग्णालय प्रशासनाच्या दुर्लक्षीत धोरणामुळे नेहमीच महिला रुग्णांना मनस्ताप सहन करावा लागतो. दर मंगळवार आणि शुक्रवारी या रुग्णालयात गर्भवती महिलांची आरोग्य तपासणी केली जाते. यानंतर वैद्यकीय अधिकारी तपासणी करुन त्यांना सोनोग्राफी करण्याचा सल्ला देतात. मात्र बरेचदा सोनोग्राफी करणारे तज्ञ कर्मचारी उपस्थित राहत नसल्याने गर्भवती महिलांना आल्या पावलीच परत जावे लागते. गुरूवारी (दि.३) गर्भवती महिला तपासणी करण्यासाठी बीजीडब्ल्यू रुग्णालयात पोहचल्या. वैद्यकीय अधिकाºयांनी तपासणी करुन त्यांना सोनोग्राफी करण्याचा सल्ला दिला. सोनोग्राफी करणारे वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते. मात्र कोणत्या ताररेखला गर्भवती महिलांची सोनोग्राफी करायची आहे हे सांगणारा टेक्नीशीयन उपस्थित नव्हता. त्यामुळे ते येईपर्यंत गर्भवती महिलांना प्रतीक्षा करण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता. यापैकी काही महिलांनी टेक्नीशीयन विदर्भ एक्सप्रेस आल्याशिवाय येणार नसल्याचे सांगितले. विशेष म्हणजे रुग्णालयात दुपारी १२.३० वाजेपर्यंत रुग्णांना तपासणी करिता चिठ्या दिल्या जातात. दुपारी १ वाजेपर्यंत वैद्यकीय अधिकारी रुग्णांची तपासणी करतात. त्यामुळे टेक्नीशीयन जर रुग्णालयात उशीरा पोहचला तर सोनोग्राफीसाठी आलेल्या महिलांना आल्यापावलीच परत जावे लागते. ही समस्या नेहमीचीच असल्याचे काही महिलांनी लोकमत प्रतिनिधीशी बोलताना सांगितले. महिलांनी याची तक्रार बीेजीडब्ल्यू रुग्णालयाच्या वरिष्ठ अधिकाºयांकडे केली. मात्र त्यांनी सुध्दा याकडे दुर्लक्ष केले आहे.
गरीब रुग्णांना भुर्दंड
येथील बाई गंगाबाई महिला रुग्णालयात जिल्ह्यातील दूरवरुन गर्भवती महिला उपचार व तपासणीसाठी येतात. मात्र कधी वैद्यकीय अधिकारी गैरहजर तर कधी सोनोग्राफी करणारा टेक्नीशीयन वेळेवर पोहचत नसल्याने त्यांना आल्यापावलीच परत जावे लागते. त्यामुळे येण्या जाण्याचा आर्थिक भुर्दंड सुध्दा सहन करावा लागतो. या रुग्णालयातील बहुतेक वैद्यकीय अधिकारी विदर्भ एक्सप्रेसने अप-डाऊन करीत असल्याची बाब आता लपून राहीलेली नाही.
ढेकवार हे टेक्नीशीयन आहेत मात्र गुरूवारी (दि.३) ते वेळेवर रुग्णालयात पोहचले नाही. शिवाय त्यांनी याची माहिती दिली नाही. त्यामुळे पर्यायी व्यवस्था करता आली नाही. केवळ सोनोग्राफीची डेट घेण्यासाठी गर्भवती महिलांना बसून राहावे लागले. यासंदर्भात सदर टेक्नीशीयनला विचारणा करण्यात येईल. त्यानंतर पुढील निर्णय घेतला जाईल.
- डॉ.कांबळे, प्रभारी वैद्यकीय अधीक्षक बीजीडब्ल्यू रुग्णालय.