विदर्भ एक्स्प्रेसचे संचालन महिलांकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2018 10:22 PM2018-03-08T22:22:55+5:302018-03-08T22:22:55+5:30
जागतिक महिला दिनानिमित्त गुरूवारी (दि.८) दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वे नागपूर मंडळाने विदर्भ एक्स्प्रेसचे संचालन नागपूर ते गोंदिया दरम्यान पूर्णत: महिला कर्मचाऱ्यांकडे सोपविले होते.
आॅनलाईन लोकमत
गोंदिया : जागतिक महिला दिनानिमित्त गुरूवारी (दि.८) दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वे नागपूर मंडळाने विदर्भ एक्स्प्रेसचे संचालन नागपूर ते गोंदिया दरम्यान पूर्णत: महिला कर्मचाऱ्यांकडे सोपविले होते. या एक्स्प्रेसला केवळ महिला पायलटनेच चालविले नाही तर गार्ड, टीटी व पोलीस कर्मचारी म्हणूनही केवळ महिलांनीच सेवा दिली.
महिला दिनाचे औचित्य साधून दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वे नागपूर मंडळाने विदर्भ एक्स्प्रेसचे संचालन पूर्णपणे महिलांकडे देण्याचा निर्णय घेतला.त्यामुळे या एक्सप्रेसने गुरूवारी (दि.८) प्रवास करणाऱ्या प्रवाशांमध्ये उत्सुकता होती. नागपूरवरून विदर्भ एक्स्प्रेसला चालविण्याची जबाबदारी पायलट म्हणून सुनिता चौधरी यांना सोपविण्यात आली. त्यांना सहायक पायलट म्हणून स्रेहा शहारे व गार्ड म्हणून कौशल्या शाहू यांनी कर्तव्य बजावले. सदर तिन्ही महिला कर्मचाºयांसाठी प्रवासी ट्रेनचे संचालन प्रथमच करण्यात आले होते. सकाळी ९ वाजताच्या दरम्यान विदर्भ एक्स्प्रेस नागपूरवरून गोंदियासाठी रवाना झाली. या एक्सप्रेसमध्ये टीटी म्हणून आठ महिला कर्मचाºयांवर जबाबदारी सोपविण्यात आली होती.
याशिवाय दोन महिला पोलीस कर्मचारी सुद्धा सुरक्षा व्यवस्थेची जबाबदारी सांभाळत होत्या. सर्व १४ महिला कर्मचाºयांचा गोंदिया रेल्वे स्थानकावर विदर्भ एक्स्प्रेस पोहचल्यानंतर नागपूर मंडळाचे डीआरएम अमित अग्रवाल, त्यांची पत्नी विधी अग्रवाल व इतर वरिष्ठ अधिकाºयांनी पुष्पगुच्छ देवून स्वागत केले तसेच महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी एडीआरएम वाय.एच. राठोड, सीएमजी सुगंधा राहा, सीनियर डोओएम सचिन शर्मा, सीनियर डीसीएम अर्जुन सिबल, सीनियर डीईई बागडे, सीनियर डीईई नारायणलाल, स्थानक व्यवस्थापक एच.ए. चौधरी, रविनारायण कार, स्थानक व्यवस्थापक (वाणिज्य) पद्मनाथ शास्त्री, वरूणकुमार, डी.के. घोष, के.के. तुरकाने, शैलेंद्रसिंह, अरविंद शाह व आरपीएफचे सहायक पोलीस निरीक्षक भोलानाथसिंह उपस्थित होते.
गोंदिया स्थानकातही ‘महिलाराज’
जागतिक महिला दिनानिमित्त गोंदिया रेल्वे स्थानकाच्या अनेक महत्त्वपूर्ण विभागांना महिलांच्या स्वाधीन करण्यात आले. बुकिंग कार्यालयात पूर्णत: महिलाराज होता. येथे बुकिंगसाठी ६ महिला कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती. स्थानकावर दोन महिला टीटींना महत्वपूर्ण जबाबदारी देण्यात आली होती. स्वच्छता व्यवस्थासुद्धा केवळ महिलांच्याच हातात राहिली. एकूण २५ महिला सफाई कामगार गोंदिया स्थानकाला स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी सांभाळत होते. ट्रेनच्या अटॅचमेंट-डिटॅचमेंटची जबाबदारीसुद्धा महिलांवरच होती.
महिला टीटी विश्रामगृहांचे उद्घाटन
गोंदिया रेल्वे स्थानकावर विश्रांती करण्यासाठी आतापर्यंत पर्याप्त जागा उपलब्ध नव्हती. आता पूर्वी जेथे प्लॅटफॉर्म क्रमांक-४ वर वेतन कार्यालय होते, त्या कार्यालयात बदल करून महिला टीटींसाठी विश्रामगृह तयार करण्यात आले आहे. येथे पिण्याच्या शुद्ध पाण्याची व्यवस्थासुद्धा करण्यात आली आहे. याचे लोकार्पण महिला कर्मचाऱ्यांच्या हस्ते करण्यात आले.
सॅनेटरी पॅड वितरण मशीनचे लोकार्पण
रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक ३-४ वर असलेल्या विश्रामगृहात सॅनेटरी पॅड वितरण मशीनचे लोकार्पण डीआरएम अमित अग्रवाल यांच्या हस्ते करण्यात आले. यासोबतच उपयोगानंतर पॅडला निरस्त करण्याची मशीनसुद्धा लावण्यात आली आहे. केवळ ५ रूपयांत सदर पॅड महिलांना उपलब्ध करुन देण्यात येत आहे. तसेच याच प्लॅटफॉर्मवर दुसºया महिला विश्रामगृहात सॅनेटरी पॅड वितरण मशनीचे लोकार्पण सेक्रोची अध्यक्ष विधी अग्रवाल यांच्या हस्ते करण्यात आले.