विदर्भातील ओबीसी संघटनांनी दिली महाज्योतीला भेट ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2021 04:33 AM2021-09-06T04:33:14+5:302021-09-06T04:33:14+5:30
गोंदिया : ओबीसी विकासासाठी महाराष्ट्र शासनाने गठित महाज्योतीकडून राबविण्यात येत असलेल्या विकास योजनांसंदर्भात चिंतन बैठक आयोजित करण्यात आली ...
गोंदिया : ओबीसी विकासासाठी महाराष्ट्र शासनाने गठित महाज्योतीकडून राबविण्यात येत असलेल्या विकास योजनांसंदर्भात चिंतन बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीनंतर महाज्योती संस्थेचे नवनियुक्त पूर्णवेळ व्यवस्थापकीय संचालक प्रदीपकुमार डांगे यांची ओबीसी संघटनांच्या शिष्टमंडळाने भेट घेतली. ओबीसी विकास योजनांसंदर्भात त्यांना विचारणा करून ओबीसी विकासासाठी नवनवीन कल्पना व योजनांची सूचना देखील त्यांना करण्यात आल्या.
चिंतन बैठकीत जिल्ह्यातील ओबीसी संघटनांच्या प्रतिनिधींनी जिल्हा पातळीवर ओबीसी विद्यार्थ्यांसाठी शासनाकडून दिरंगाई होत असलेला वसतिगृहाचा प्रश्न, ओबीसी विद्यार्थ्यांना स्वाधार योजना लागू न होणे, कुणबी समाजाचा मराठा समाजासाठी गठित सारथी व ओबीसी समाजासाठी गठित महाज्योती या दोन्ही संस्थेतून लाभ देऊन शासनाकडून कुणबी विरूद्ध अन्य ओबीसी असा वाद निर्माण करून ओबीसी चळवळ खिळखिळी करण्याचा प्रयत्न, ओबीसी जनगणना आदी विषयावर मुद्दे उपस्थित करून चर्चा घडवून आणली. तसेच ओबीसी विद्यार्थ्यांसाठी तालुका व जिल्हा स्तरावर निवासी वसतिगृह सुरू करण्याची कार्यवाही करावी अशी मागणी करण्यात आली.
चिंतन बैठकीत ओबीसी जनगणना समन्वयक बळीराज धोटे, राष्ट्रीय पिछडा वर्ग संघटनेचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष रमेश पिसे, स्टुडंट राईट्स असोसिएशनचे अध्यक्ष उमेश कोर्राम, जिल्हा ओबीसी संघटनेचे मार्गदर्शक खेमेंद्र कटरे, ओबीसी संघर्ष क्रांती समितीचे जिल्हा उपाध्यक्ष तीर्थराज उके, अशोक लंजे, ओबीसी सेवा संघाचे जिल्हा प्रतिनिधी प्रेमेंद्र चव्हाण, राम हेडाऊ, गोविंद वरवाडे, दळवी, शुभांगी मेश्राम, प्रमोद काळबांधे, अंजली साळवे, श्रावण फरकाडे, निकेश पिणे उपस्थित होते.