व्हिडीओ व्हायरल प्रकरण :भाजप आमदार संजय पुराम यांच्या उमेदवारीवर प्रश्नचिन्ह
By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2019 05:13 AM2019-09-29T05:13:40+5:302019-09-29T05:14:03+5:30
मुंबईत डान्सबारमध्ये बारबालांसोबत नाचतानाच्या कथित व्हीडीओ प्रकरणी आमगाव मतदारसंघाचे भाजप आमदार संजय पुराम यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.
गोंदिया : मुंबईत डान्सबारमध्ये बारबालांसोबत नाचतानाच्या कथित व्हीडीओ प्रकरणी आमगाव मतदारसंघाचे भाजप आमदार संजय पुराम यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. न्यायालयाचे आदेश मिळाल्यानंतर व्हिडीओ ताब्यात घेऊन तो फोरेन्सिक प्रयोगशाळेत पाठविण्यात येईल. तसेच सायबर सेलच्या मदतीने तो नेमका कुठून व्हायरल झाला; त्याची लिंक शोधून आरोपींना पकडले जाईल, असे देवरी पोलीस स्टेशनचे ठाणेदार कमलेश बच्छाव यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
कथित व्हीडीओ व्हायरल झाल्याची बातमी ‘लोकमत’मध्ये प्रकाशित झाल्यानंतर राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. संपूर्ण मतदारसंघात शनिवारीदेखील याच विषयाची चर्चा होती. नागरिकांमधून वेगवेगळ्या प्रतिक्रिया व्यक्त होत होत्या. दुपारी याच सर्व घडामोडींवर आमगाव येथील भाजपच्या एका नेत्याच्या घरी काँग्रेसच्या एका भावी उमेदवाराला या क्षेत्रातून भाजपकडून निवडणूक लढण्याची आफर देण्यात आल्याची माहिती आहे. यावर सदर उमेदवारानेसुध्दा होकार दिल्याची माहिती आहे. त्यामुळे पुराम यांच्या उमेदवारीवर सुध्दा प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. ४ आक्टोबर ही उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख असून यासर्व घडामोडींवर भाजपचे पक्षश्रेष्ठी काय निर्णय घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
हा तर बदनाम करण्याचा प्रयत्न - हेमंत पटले
विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असतांना संबंधित लोकप्रतिनिधीची लोकप्रियता कमी करण्यासाठी बदनामी करण्याचा विरोधकांचा हा प्रयत्न आहे. यामागील खरे सत्य आणि आरोपी लवकर पुढे येतील, अशी प्रतिक्रिया भाजप चे गोंदिया जिल्हाध्यक्ष हेमंत पटले यांनी व्यक्त केली आहे.