लाडकी बहीण, भाऊ अन् मोफत योजनांभोवती फिरतेय; निवडणूक महागाई, भ्रष्टाचारावर कुणीही बोलेना

By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2024 03:01 PM2024-11-15T15:01:58+5:302024-11-15T15:04:41+5:30

Gondia : विधानसभा निवडणुकीत जनतेची बहुतांश मुद्दे गायब

Vidhansabha election is revolving around 'Ladki Bahin' and free plans; No one spoke about election inflation, corruption | लाडकी बहीण, भाऊ अन् मोफत योजनांभोवती फिरतेय; निवडणूक महागाई, भ्रष्टाचारावर कुणीही बोलेना

Vidhansabha election is revolving around 'Ladki Bahin' and free plans; No one spoke about election inflation, corruption

लोकमत न्यूज नेटवर्क 
गोंदिया :
लोकसभेला संविधानात बदल, आरक्षणाला धोका असल्याचा आरोप महाविकास आघाडीने केल्याने महाराष्ट्रात महायुतीला फटका बसला होता. परंतु, विधानसभा निवडणुकीत मात्र लोकसभेतील बहुतांश मुद्दे गायब झाले आहेत. यावेळी लाडकी बहीण, लाडका भाऊ अन् लाडका शेतकरी या मुद्यांभोवतीच निवडणूक फिरत आहे. 


त्यात महागाई, बेरोजगारी, शेतकरी आत्महत्या, शेतमालाला भाव या मुद्यांना मात्र सोयीस्करपणे बगल देण्यात येत असून एकमेकांवर वैयक्तिक चिखलफेकीमुळे मतदारांचे मात्र चांगलेच मनोरंजन होत आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपकडून राममंदिर, कलम ३७०, रस्ते, मेट्रोचे जाळे या मुद्यांवर जोर दिला गेला होता. तसेच विरोधकांना देशद्रोही मंडळींचा समूह म्हणून हिणविले होते. तर इंडिया आघाडीकडून संविधानाला धोका महागाई, बेरोजगारी, आरक्षण संपविणार, उद्योगधंदे गुजरातला पळविले, मणिपूर या मुद्यांवर प्रचार करण्यात आला. त्यात संविधानाला धोका या मुद्यावर आघाडीने अधिक जोर दिल्याने महायुती बॅकफूटवर गेली होती.


विधानसभा निवडणुकीत यावेळी भाजपकडून लाडक्या बहिणींना दरमहा दीड हजार रुपयांऐवजी २१०० रुपये देणार, युवकांच्या हाताला काम, वृद्धांच्या पेन्शनमध्ये वाढ, महाराष्ट्रात गुंतवणूक वाढली, 'शेतकरी सन्मान'च्या निधीत वाढ, महिलांना एस.टी. प्रवासात सवलत, ओबीसी, एससी, एसटी आरक्षणाला धोका या मुद्यांवर प्रचारात जोर देण्यात येत आहे. महाविकास आघाडीनेही त्याला उत्तर म्हणून लाडक्या बहिणींना दरमहा तीन हजार रुपये देणार, जातनिहाय जनगणना, महिलांना मोफत प्रवास, भ्रष्टाचार, जाती-धर्मात तेढ, आरक्षण मर्यादा ५० टक्क्यांच्या पुढे नेणार हे मुद्दे घेऊन ते मतदारांमध्ये नेले आहेत. 


मुख्य मुद्द्यांवर कोणीच बोलेना 
महायुती व महाविकास आघाडीकडून मतदारांना आपल्याकडे खेऊन घेण्यासाठी नवनवे मुद्दे उकरून काढले जात आहे. परंतु, या सर्वांमध्ये वाढत असलेली महागाई, बेरोजगारी, भरती परीक्षांतील घोटाळे, शेतकरी आत्महत्या, आरोग्य व्यवस्था या कळीच्या विषयांना मात्र कुणीही हात घातला नाही. उलट, एकमेकांवर वैयक्तिक चिखलफेक करण्यातच धन्यता मानली जात आहे. 

Web Title: Vidhansabha election is revolving around 'Ladki Bahin' and free plans; No one spoke about election inflation, corruption

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.