निवडणूक लक्षात घेऊन पोलिसांचे पथसंचलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2019 10:22 PM2019-03-18T22:22:42+5:302019-03-18T22:22:57+5:30
गोंदिया-भंडारा लोकसभेच्या निवडणुकीला घेऊन शांतता व सुव्यवस्था कायम राखण्यासाठी जिल्हा पोलिसांनी सोमवारी (दि.१८) शहरातील प्रमुख मार्गांवर पथसंचलन केले. या पथसंचलनात ४३ अधिकारी, ४९१ कर्मचारी व गृहरक्षक दलातील ५० कर्मचाऱ्यांचा सहभाग होता.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : गोंदिया-भंडारा लोकसभेच्या निवडणुकीला घेऊन शांतता व सुव्यवस्था कायम राखण्यासाठी जिल्हा पोलिसांनी सोमवारी (दि.१८) शहरातील प्रमुख मार्गांवर पथसंचलन केले. या पथसंचलनात ४३ अधिकारी, ४९१ कर्मचारी व गृहरक्षक दलातील ५० कर्मचाऱ्यांचा सहभाग होता.
निवडणुका खुल्या व निर्भय वातावरणात नि:पक्षपणे पार पडाव्यात व जनमाणसात विश्वास निर्माण करण्यासाठी जिल्हा पोलिसांकडून सोमवारी (दि.१८) सायंकाळी ४ वाजता शहरातील मुख्यमार्गावर पोलीस अधीक्षक विनीता शाहू यांच्या नेतृत्वात पथसंचलन करण्यात आले. शहरातील इंदिरा गांधी स्टेडियम येथून संचलनाची सुरूवात करण्यात आली.
नेहरू चौक, सिव्हील लाईन हनुमान मंदिर चौक, जयस्तंभ चौक, गांधी प्रतिमा चौक, गोरेलाल चौक, दुर्गा चौक, चांदणी चौक, मूर्री रोड, श्रीनगर, भीमनगर, मैदान, आंबेडकर वॉर्ड, रेल्वे चौकी, शारदा सॉ मील रोड, रामनगर हायस्कूल, रामनगर बाजार चौक, राजलक्षमी चौक, पाल चौक, गुरूद्वारा रोड, शक्ती चौक मार्गे बसस्थानक येथे या पथसंचलनाचा समारोप करण्यात आला. या पथसंचलनात पोलीस अधीक्षक शाहू, अप्पर पोलीस अधीक्षक संदीप आटोळे, पोलीस उपअधीक्षक मुख्यालय, सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, सर्व ठाणेदार, पोलीस कर्मचारी, केंद्रीय राखीव दलाच्या कंपन्यासुद्धा सहभागी झाल्या होत्या.