निंबा गाव बनले काष्ठकलेचे माहेरघर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2017 10:36 PM2017-09-11T22:36:44+5:302017-09-11T22:37:07+5:30

टाकाऊ ते टिकाऊ या संकल्पनेला अनुसरुन निरुपयोगी सागवानच्या लाकडापासून काष्ठशिल्प कलेचा नमूना तालुक्यातील निंबा या गावात घरोघरी पाहायला मिळत आहे.

The village of Nimba became the corner of the bracket | निंबा गाव बनले काष्ठकलेचे माहेरघर

निंबा गाव बनले काष्ठकलेचे माहेरघर

Next
ठळक मुद्देगावकºयांनी थाटला स्वयंरोजगार : टाकाऊ ते टिकाऊ बनले उदरनिर्वाहाचे आधार

विजय मानकर ।
लोकमत न्यूज नेटवर्क
सालेकसा : टाकाऊ ते टिकाऊ या संकल्पनेला अनुसरुन निरुपयोगी सागवानच्या लाकडापासून काष्ठशिल्प कलेचा नमूना तालुक्यातील निंबा या गावात घरोघरी पाहायला मिळत आहे. त्यामुळे निंबा हे गाव काष्ठशिल्प कलेचे माहेरघर बनले आहे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. या गावातील अनेक कुटुंबांनी काष्ठशिल्प कलेला उदरनिर्वाहचा आधार बनवून जीवनयापन करताना दिसून येत आहे.
तालुका मुख्यालयापासून ३ किमी. अंतरावर असलेले निंबा हे गाव सालेकसा ते पिपरीया बस मार्गावर असून भाताची शेती करणे या गावच्या लोकांचा मुख्य व्यवसाय आहे. त्या बरोबर या गावाला लागूनच पूर्वी भागात मोठे घनदाट जंगल सुद्धा पसरले आहे. या गावात शेतमजूर आणि वनमजूरांचे वास्तव्य मोठ्या प्रमाणावर आहे. त्यामुळे येथील जास्तीतजास्त लोकांना आपले जीवन चालविण्यासाठी रोजगार व कामाची नेहमी गरज पडते. दगा देणारी शेती व उद्योगांचा अभाव यामुळे पोटापाण्याचा प्रश्न नेहमी या परिसरात उद्भवत असतो. अशात अनेक कुटुंब शहराकडे सुद्धा पलायन करीत असतात. परंतु काही लोकांनी आपल्या कलागुणांना ओळखून गावातच राहून त्या कला गुणांचा उपयोग करीत जगण्याची वाट शोधण्याचे काम उत्स्फूर्तपणे केले आहे. काष्ठ केलेच्या कौशल्याचा उपयोग करीत त्यातच आपले जीवनयापन करण्याचा मार्ग त्यांनी अवलंबिला आहे.
निंबा या गावालगत मोठे जंगल व्यापलेले आहे. या जंगलात विविध बहुपयोगी झाडे असून त्यात सागवानच्या किमती व दर्जेदार लाकडाची झाडे येथील वनात मोठ्या प्रमाणात असून सागवानाच्या लाकडाची तसेच सागवानच्या लाकडापासून तयार फर्निचर व इतर साहित्याची सर्वात जास्त मागणी होत असते. येथील जंगलातील सागवानच्या झाडाची कटाई काही प्रमाणात अधिकाधिक स्तरावर होते. परंतु मोठ्या प्रमाणावर या झाडाची कत्तल करुन लाकूड चोरीचे गैरकाम सुद्धा मोठ्या प्रमाणावर होत असते. सागवानच्या झाडांची कत्तल करुन सरळ व उपयोगी भाग घेवून जातात. त्या झाडांच्या फांद्या व बुड तसेच पडून राहते व त्याला निरुपयोगी समजून सोडून दिले जाते.
काष्ठशिल्पसाठी सागवानच्या झाडाचे बुड सर्वोत्तम उपयोगी असून बुडातील जड्याची लाकडे काष्ठशिल्प व कोरीव कामे करण्यासाठी सर्वात उत्तम असून त्यावर दर्जेदार कलात्मक व शाळेच्या वस्तू तयार केल्या जातात. तसेच फांद्या सुद्धा कलात्मक वस्तू तयार करण्यासाठी उपयोगी पडतात. गावातील काष्ठ शिल्पकार जंगलातील निरुपयोगी ही लाकडे संकलित करुन घरी आणतात. त्यावर आपल्या कला गुणांचा उपयोग व कोरीवकाम करुन किंवा नक्षीकाम करुन शोभेची वस्तू तयार करतात. यात धनाढ्यांच्या ड्रार्इंग रुमला रुजविणाºया आकर्षक शोभेच्या वस्तू मोठ्या प्रमाणावर तयार केल्या जातात. शोकेसमध्ये ठेवून ड्रॉर्इंग रूमची शोभा वाढविणारे विविध प्राणी, पक्षी, फूल, पाखळ्या, वृक्ष इत्यादींची प्रतिकृती काष्ठ कलेतून तयार करतात.
त्याचबरोबर टी टेबलचे स्टँड, टेबललॅम्प, पानदान सारख्या उपयोगी वस्तू सुद्धा काड्यांवर नक्षीकाम करुन केले जाते. याशिवाय असंख्य प्रमाणात उपयोगी व शोभेच्या वस्तु काष्ठकलेतून तयार केल्या जातात. अनेकांच्या कलात्मक वस्तू खरेदी करण्यासाठी बाहेरुन आलेले अधिकारी-कर्मचारी, एस.आर.पी. किंवा सी.आर.पी.एफ.चे जवान, उच्च विलासी जीवन जगणारे लोक या वस्तुंना आवडीने खरेदी करतात.
मात्र परिश्रमाच्या तुलनेत हवी तेवढी रक्कम या काष्ठ कलाकारांना मिळत नाही, किंवा आवश्यक व आधुनिक औजार त्यांच्याकडे उपलब्ध नसल्याने त्यांच्या वस्तू निर्मितीचा वेग कमी असल्याने आर्थिक लाभाचे प्रमाण कमी आहे.
शासनाच्या पाठबळाची गरज
केंद्र व राज्य शासनाच्यावतीने अनेक योजना ग्रामीण भागातील लोक व काष्ठ कारागिरांसाठी चालत आहेत. परंतु दुर्भाग्य असे की, या योजनांचा लाभ निंबा येथील कारागिरांना मिळवून देण्यासाठी कोणी प्रयत्न करताना दिसत नाही. उलट काही हुशार दलाल या कारागिरांकडून तयार केलेल्या वस्तू कमी भावाने खरेदी करुन त्यावर आपल्या नावाचे श्रेय लाटत दुप्पट ते तीप्पट पैसे कमविण्याचे काम करीत आहेत. निंबा गावात जवळपास २५ ते ३० पुरुष आणि महिला कारागिर काष्ठशिल्प कलेचे काम करीत असून त्यांना शासनाचे पाठबळ मिळाले तर आधुनिक औजार, साहित्य, लाकूड कापण्यासाठी मशीन, मोटार, लाकडावर चमक आणण्यासाठी मशीन तसेच उपयुक्त वातावरण निर्माण करुन देणारे कक्ष व आधुनिक सोयी सुविधा मिळविता येतील. शासनाने कर्जाची किंवा अनुदानाची व्यवस्था करुन दिल्यास निंबा गावात काष्ठशिल्प कलेच्या निर्मितीचे मोठे केंद्र उभारुन अनेकांना रोजगाराची संधी मिळू शकते. तसेच येथील लोकांच्या जीवनाचा दर्जा सुधारू शकतो.

Web Title: The village of Nimba became the corner of the bracket

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.