गाव एक, तालुके मात्र वेगवेगळे
By admin | Published: April 10, 2016 01:58 AM2016-04-10T01:58:22+5:302016-04-10T01:58:22+5:30
शिर्षक वाचून दचकलात का? पण शिर्षक सत्य आहे. दिघोरी/मोठी हे गाव सन १९९५ पासून लाखांदूर तालुक्यात विलीन झालेले आहे,
मुकेश देशमुख दिघोरी/मोठी
शिर्षक वाचून दचकलात का? पण शिर्षक सत्य आहे. दिघोरी/मोठी हे गाव सन १९९५ पासून लाखांदूर तालुक्यात विलीन झालेले आहे, असे असले तरी दिघोरी (मोठी)येथील वीज ग्राहकांना आजही जे बिल येतात, त्यात कधी अर्जुनी/मोरगाव, सानगडी अथवा साकोली तालुका असल्याचे देयकावर नोंद असते. यावरुन वीज वितरण कंपनीचा भोंगळ कारभार लक्षात येते.
२१ वर्षापुर्वी म्हणजे सन १९९५ पुर्वी दिघोरी/मोठी हे गांव अर्जुनी/मोरगाव या तालुक्यात येत होते. त्यानंतर सन १९९५ ला दिघोरी गाव लाखांदूर तालुक्यात विलीन झाले. त्यामुळे विद्युत बिलावर अर्जुनी/मो. ऐवजी लाखांदूर तालुका अशी नोंद व्हायला हवी होती मात्र, विज वितरण कंपनीच्या भोंगळ कारभारामुळे व अधिकाऱ्यांच्या कुंभकर्णी झोपेमुळे आजही विद्युत बिलावर दिघोरी/मोठी गावाची नोंद अर्जुनी (मो.)तालुक्यात असल्याचे दिसून येते.
आधार कार्ड, पॅन कार्ड, अधिवास प्रमाणपत्र, पासपोर्ट बनविणे, नवीन वाहन खरेदी करतांनी व इतर अनेक शासकीय, निमशासकीय कामासाठी विद्युत बिलाचा निवासी पत्ता म्हणून पुरावा ग्राहय धरला जातो. परंतु मागील २१ वर्षापुर्वी तालुका बदलला असतांनासुध्दा आजही जुन्याच तालुक्याची नोंद विद्युत बिलावर होत असल्याने विद्युत ग्राहकांना, सामान्य नागरिकांना यांचा बराच त्रास सहन करावा लागत आहे.
दिघोरी/मोठी सोबतच लाखनी तालुक्यातील विहिरगाव व साकोली तालुक्यातील सोलबर्डी येथे येणाऱ्या विद्युत बिलांवरसुध्दा अर्जुनी (मोरगाव) व सानगडी तालुका असल्याची नोंद आढळून येते.मुळात सानगडी हा तालुकाचा दर्जा नसलेला गाव आहे. मात्र विद्युत विभागाने स्वत:ची शक्कल लढवून सानगड ला तालुक्याचा दर्जा दिला. यामुळे अशा चुकांच्या सामान्य नागरिकांना किती फटका बसतो याचा विचारच विद्युत विभाग करीत नसल्याचे आढळून येते. ज्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या चुकांमुळे सामान्य ग्राहकांना नाहक त्रास सहन करावा लागतो अशांवर कारवाई करुन गत २१ वर्षे कुंभकर्णी झोपेत असलेल्या विद्युत विभागाने जागे होवून विद्युत बिलावरील तालुक्यांचा घोळ मिटवावा, ज्या तालुक्याचे गाव असेल त्याचे तालुक्याचे नाव विद्युत बिलावर नोंदवावे, अशी मागणी दिघोरी, विहीरगांव व सालेबर्डीच्या विद्युत ग्राहकांनी केली आहे. तालुका बदल झाले असल्याने शासकीय कामात अनेकांना अडथळा निर्माण होत आहे.
याबाबत अधिक माहितीसाठी उपमुख्य कार्यकारी अभियंता व कनिष्ठ अभियंता यांचेशी भ्रमणध्वनीवर संपर्क केला असता संपर्क होऊ शकला नाही. प्रशासन यावर काय तोडगा काढते, याकडे आता लक्ष आहे.