दुसऱ्या डोससाठी शहरवासीयांपेक्षा ग्रामवासीय अग्रेसर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2021 04:33 AM2021-09-05T04:33:04+5:302021-09-05T04:33:04+5:30
गोंदिया : कोरोना प्रतिबंधक लसींचे दोन्ही डोस घेणे अत्यंत आवश्यक असतानाच जिल्ह्यातील १,७९,३३५ नागरिकांनी मुदत निघून गेल्यानंतरही त्यांचा दुसरा ...
गोंदिया : कोरोना प्रतिबंधक लसींचे दोन्ही डोस घेणे अत्यंत आवश्यक असतानाच जिल्ह्यातील १,७९,३३५ नागरिकांनी मुदत निघून गेल्यानंतरही त्यांचा दुसरा डोस घेतला नसल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. विशेष म्हणजे त्यात आणखी धक्कादायक बाब अशी की, दुसऱ्या डोसला हुलकावणी देणाऱ्यात कोरोना हॉटस्पॉट असलेल्या सर्वाधिक झळ बसलेल्या गोंदिया तालुक्यातीलच ५५,५३६ नागरिकांचा समावेश आहे.
कोरोनाने देशात आतापर्यंत लाखो लोकांचा जीव घेतला असून, यापासून गोंदिया जिल्हाही सुटलेला नाही. जिल्ह्यात आतापर्यंत ७०० पेक्षा जास्त नागरिकांचा जीव गेला आहे. त्यानंतरही कोरोनाचा प्रकोप कमी झालेला नाही. अशात कोरोनाला मात देण्यासाठी देशात लसीकरण सुरू आहे. मात्र या लसींना घेऊनही कित्येक नागरिकांनी भीती व संभ्रम बाळगून ठेवले असून, मोफत मिळणारी लस घेण्यासाठीही नागरिक पुढे येत नसल्याचे दिसत आहे. विशेष म्हणजे, कोरोनाच्या भीतीने कित्येकांनी पहिला डोस घेतला असतानाच आता दुसऱ्या डोसला मात्र मुदत निघूनही हुलकावणी देत आहेत. दुसऱ्या डोसला हुलकावणी देणाऱ्यांची संख्या बघितली असता ती १,७९,३३५ एवढी असून, यात ८६,६०२ लाभार्थी कोविशिल्ड लसीचे आहेत, तर ९२,७३३ लाभार्थी कोव्हॅक्सिन लसीचे आहेत. त्यातही धक्कादायक बाब म्हणजे, दुसऱ्या डोसला हुलकावणी देणारे सर्वाधिक गोंदिया तालुक्यातील असून त्यांची संख्या ५५,५३६ एवढी आहे. धक्कादायक बाब म्हणजे, आतापर्यंत आलेल्या दोन लाटांमध्ये सर्वाधिक झळ गोंदिया शहर व तालुक्यालाच बसली असून, तालुका कोरोना हॉटस्पॉट आहे. त्यानंतरही तालुकावासीयांचा दुर्लक्षितपणा मात्र संताप आणणारा आहे.
-----------------------------------
सडक-अर्जुनी तालुक्याची उत्कृष्ट कामगिरी
एकीकडे शहरवासी जेथे लसीकरणाला हुलकावणी देताना दिसून येत आहेत तेथेच मात्र ग्रामीण भागातील सडक-अर्जुनी तालुक्याने उत्कृष्ट कामगिरी केल्याचे दिसून येत आहे. तालुक्यात सर्वात कमी १३,७२२ नागरिकांनी मुदतीनंतरही दुसरा डोस घेतला नसल्याचे दिसून येत आहे. त्यानंतर आदिवासीबहुल व नक्षलग्रस्त अशी छाप लागलेल्या सालेकसा तालुक्यानेही लसीकरणात चांगली कामगिरी केली असून, तालुक्यातील १४,८५३ नागरिकांनी दुसरा डोस घेतला नसल्याचे दिसत आहे.