भरकटलेल्या पावलांना सावरणाऱ्या विनिता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2019 11:58 PM2019-03-07T23:58:18+5:302019-03-07T23:59:19+5:30
पौगंडावस्थेतील मुलींनी आकर्षणाच्या नादातून वाईट कृत्य करु नये यासाठी त्या मुलींचे समुपदेशन करुन भरकटणाऱ्या मुलींच्या पावलांना योग्य दिशा देण्याचे काम करणाऱ्या गोंदियाच्या नवीन पोलीस अधीक्षक विनिता शाहू यांनी केले.
नरेश रहिले ।
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया :पौगंडावस्थेतील मुलींनी आकर्षणाच्या नादातून वाईट कृत्य करु नये यासाठी त्या मुलींचे समुपदेशन करुन भरकटणाऱ्या मुलींच्या पावलांना योग्य दिशा देण्याचे काम करणाऱ्या गोंदियाच्या नवीन पोलीस अधीक्षक विनिता शाहू यांनी केले. महाराष्ट्र राज्य महिला आयोग व स्वयंसेवी संस्था यांच्या पुुढाकाराने त्यांनी उडाण प्रकल्प उभारुन भंडारा येथे पोलीस अधीक्षक म्हणून काम करताना या प्रकल्पासाठी जिल्हा नियोजन समितीतून दहा लाख रुपये मंजूर करवून घेतले. किशोरवयीन मुलींचे पाऊल भरकटू नये यासाठी त्या मुलींना योग्य समुपदेशन करुन आत्मसंरक्षणाचे धडे देण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला.तसेच मुलींच्या सर्व समस्या सोडविण्यावर भर दिला.
इतकेच नव्हे तर गुन्हेगारीवर वचक ठेवण्यासाठी दाखल असलेल्या गुन्ह्यांतील आरोपींना शिक्षा व्हावी, यासाठी दोषसिद्धी कक्षामार्फत न्याय प्रक्रियेकडे लक्ष दिले. अवैध रेती प्रकरण असो, प्राणी संरक्षण असो किंवा अवैध दारु विक्रीवर आळा घालण्यासाठी जोमाने प्रयत्न करुन अनेकांना तुरुंगाची हवा चारली. भंडारा जिल्ह्यात काम करताना त्यांनी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ दिला नाही.
२०१० मध्ये भारतीय पोलीस सेवेत केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे निवड झालेल्या विनिता शाहू यांनी शेजारच्या भंडारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक म्हणून सूत्रे २०१५ ला हातात घेतले. फोफावलेल्या सट्टा, जुगार, दारु यावर अंकुश लावून कुख्यात गुन्हेगारांचे मुसके आवळले. राष्ट्रीय महामार्गावरील वाहतुकीची कोंडी टाळण्यासाठी त्यांनी उत्तम उपाययोजना केली. संपूर्ण देशाला हादरवून सोडणारा कुख्यात व्याघ्र शिकारी कट्टू ऊर्फ राहुल पारधी याला उत्तरप्रदेशातून पकडून आणले.
आपले प्रशासन लोकाभिमुख राहावे, यासाठी फिरते पोलीस ठाणे ही संकल्पना भंडारा जिल्ह्यात राबविली. तीच संकल्पना आता गोंदिया जिल्ह्यात राबविणार आहेत. भंडारा जिल्ह्यातील १७१० ठिकाणी फिरते पोलीस ठाणे कॅम्प आयोजित करुन १ लाख २५ हजार लोकांनी त्यात सहभाग घेतला. या फिरते पोलीस ठाण्याच्या संकल्पनेला १ फेब्रुवारी २०१८ ला राज्यस्तरावर राबविण्याचे आदेश दिले.
पोलिसांच्या कल्याणासाठी कल्याण निधी वाढविण्यासाठी उत्तम योजना आखली. पोलीस कर्मचाऱ्यांना व जनतेला हेल्मेट सक्ती केली. ही सक्ती नसून नागरिकांच्या जिवाची पर्वा करण्यासाठी उचललेले पाऊल आहे. अधिकारी, कर्मचारी यांचा वाढदिवस, त्यांच्या पाल्यांचा वाढदिवस साजरा करण्याची भूमिका साकारणाºया त्या पहिल्या पोलीस अधीक्षक आहेत. जनतेच्या सेवेसाठी आपण आहोत हीच भावना ठेवून ‘सद्रक्षणाय खलनिग्रहणाय’ या बिद्रवर खरे उतरण्याची तयारी पोलीस अधीक्षक विनिता शाहू यांची आहे.