पहिल्या दिवशी पालन अन् दुसऱ्या दिवशीच उल्लंघन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2021 05:00 AM2021-06-30T05:00:00+5:302021-06-30T05:00:10+5:30
जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग आता पूर्णपणे आटोक्यात आला आहे. दुसरी लाट देखील पूर्णपणे ओसरली आहे. त्यामुळेच जिल्ह्याचा अनलॉकच्या लेव्हल वनमध्ये समावेश होता. जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट अर्ध्या टक्क्याच्या आतच आहे. सुदैवाने डेल्टा आणि डेल्टा प्लसच्या एकाही रुग्णाची नोंद जिल्ह्यात झाली नाही, ही निश्चितच समाधानकारक बाब आहे. कोरोनामुक्तीच्या दिशेने जिल्ह्याची वाटचाल सुरू आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : काेरोनाच्या डेल्टा आणि डेल्टा प्लसचा प्रादुर्भाव लक्षात घेता खबरदारीचा उपाय म्हणून सोमवारपासून (दि.२८) नवीन निर्बंध लागू करण्यात आले. यानुसार जीवनावश्यक वस्तूंसह सर्वच दुकाने सकाळी ७ ते दुपारी ४ या वेळेत सुरू ठेवण्याचे आदेश काढण्यात आले. पहिल्याच दिवशी शहरातील सर्वच व्यावसायिकांनी याचे पालन केले. मात्र, मंगळवारी दुसऱ्याच दिवशी बाजारपेठेतील बहुतेक दुकाने सायंकाळी ४.४५ वाजतापर्यंत सुरूच होती. त्यामुळे पहिल्या दिवशी पालन अन् दुसऱ्या दिवशी उल्लंघन असेच चित्र होते.
जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग आता पूर्णपणे आटोक्यात आला आहे. दुसरी लाट देखील पूर्णपणे ओसरली आहे. त्यामुळेच जिल्ह्याचा अनलॉकच्या लेव्हल वनमध्ये समावेश होता. जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट अर्ध्या टक्क्याच्या आतच आहे. सुदैवाने डेल्टा आणि डेल्टा प्लसच्या एकाही रुग्णाची नोंद जिल्ह्यात झाली नाही, ही निश्चितच समाधानकारक बाब आहे. कोरोनामुक्तीच्या दिशेने जिल्ह्याची वाटचाल सुरू आहे. त्यामुळेच जिल्ह्यात कोरोनाच्या नवीन विषाणूचा प्रादुर्भाव जिल्ह्यात वाढू नये यासाठी आरोग्य विभाग आणि जिल्हा प्रशासनाने कडक उपाययोजना केल्या आहेत, तसेच खबरदारीचा उपाय म्हणून जिल्ह्यात निर्बंध लागू केले आहेत. याची अंमलबजावणी करण्याच्या सूचना नगर परिषद, महसूल आणि पोलीस विभागाला केल्या आहेत. सोमवारी पहिल्या दिवशीच दुपारी ४ वाजता पोलिसांनी बाजारपेठेत फिरून वेळेत दुकाने बंद करण्यास व्यापाऱ्यांना सांगितले. त्यामुळे पहिल्या दिवशी नियमांचे पालन झाले. हेच चित्र यापुढे देखील कायम राहील अशी अपेक्षा होती. मात्र, दुसऱ्याच दिवशी नियमांना धाब्यावर बसविल्याचे चित्र होते.
पोलीस पथक झाले गायब
- डेल्टा प्लसच्या अनुषंगाने जिल्हाधिकाऱ्यांनी सोमवारपासून (दि.२८) कडक निर्बंध लागू करण्याचे पत्र काढले. त्याची कडक अंमलबजावणी करण्यासाठी नगर परिषद, पोलीस आणि महसूल विभागावर जबाबदारी निश्चित करून दिली. पहिल्या दिवशी पोलीस पथकाने शहरातील बाजारपेठेत फिरून नियमांचे पालन करण्याच्या सूचना केल्या. मात्र, दुसऱ्या दिवशी हे पथक गायब झाल्याने दुकाने सायंकाळी ४.४५ पर्यंत सुरूच होती.
न.प.ला पडला कारवाईचा विसर
- कोरोनाचा संसर्ग आटोक्यात असला तरी कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करण्याच्या सूचना प्रशासनाने केल्या आहे. मास्क, फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन न करणाऱ्या ग्राहक आणि व्यावसायिकांवरसुद्धा कारवाई करण्याचे निर्देश दिले. नगर परिषद आणि महसूल विभागाकडून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जात होती, पण दोन दिवसांपासून नगर परिषदेलासुद्धा कारवाई करण्याचा विसर पडल्याचे चित्र आहे.
दासगाव येथे आठवडी बाजार सुरूच
- जिल्हाधिकाऱ्यांनी कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांतर्गत संसर्ग टाळण्यासाठी जिल्ह्यातील सर्व आठवडी बाजार बंद ठेवण्याचे आदेश काढले आहे. मात्र, यानंतर गोंदिया तालुक्यातील दासगाव येथे मंगळवारी आठवडी बाजार सुरू होता.