व्हीएनआयटी करणार स्ट्रक्चरल आॅडिट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2018 08:36 PM2018-07-14T20:36:03+5:302018-07-14T20:37:12+5:30
येथील सिव्हिल लाईन परिसरातील बाई गंगाबाई महिला रुग्णालयाचा (बीजीडब्ल्यू) कारभार ८० जुन्या जीर्ण इमारतीतून सुरू आहे. तर मागील तीन वर्षांपासून या इमारतीचे स्ट्रक्चरल आॅडिट झाले नव्हते. यामुळे या रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णांचा जीव धोक्यात आला होता.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : येथील सिव्हिल लाईन परिसरातील बाई गंगाबाई महिला रुग्णालयाचा (बीजीडब्ल्यू) कारभार ८० जुन्या जीर्ण इमारतीतून सुरू आहे. तर मागील तीन वर्षांपासून या इमारतीचे स्ट्रक्चरल आॅडिट झाले नव्हते. यामुळे या रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णांचा जीव धोक्यात आला होता. लोकमतने ही धक्कादायक बाब उघडकीस आल्यानंतर शासन आणि प्रशासनाने याची गांर्भियाने दखल घेतली. तसेच बीजीडब्ल्यू रुग्णालयाचे स्ट्रक्चरल आॅडिट करण्याचे काम नागपूर येथील व्हिएनआयटी संस्थेकडे सोपविण्याचे निर्देश पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी दिले. लवकरच या कामाला सुरूवात केली जाणार आहे.
बीजीडब्ल्यू रुग्णालयाच्या महिला वार्डात पावसाचे पाणी साचल्याच्या घटनेतंतर लोकमतने हा मुद्दा लावून धरला. तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग, आरोग्य प्रशासन यांचा भोंगळ कारभार पुढे आणला. बीजीडब्ल्यू रूग्णालयाची इमारत १९३९ मध्ये उभारण्यात आली. आता या इमारतीला ८० पूर्ण झाले असून ही इमारत जीर्ण झाली आहे. त्यामुळे या इमारतीचे दरवर्षी स्ट्रक्चर आॅडिट करणे आवश्यक होते. त्यामुळे रुग्णालयाची इमारत वापर करण्यायोग्य आहे किंवा नाही, याची माहिती मिळण्यास मदत होते. मात्र बीजीडब्ल्यू प्रशासनाने सार्वजनिक बांधकाम विभागाला ११ पत्र दिल्यानंतरही मागील तीन वर्षांपासून इमारतीचे स्ट्रक्चरल आॅडिट केले नव्हते. त्यामुळे इमारतीच्या सुरक्षिततेवर प्रश्न निर्माण झाला होता. लोकमतने बीजीडब्ल्यूच्या इमारतीचे स्ट्रक्चरल आॅडिट व इतर मुद्दे लावून धरल्यानंतर प्रशासनात खळबळ उडाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याची गांर्भियाने दखल घेत यावरुन जिल्हा प्रशासनाला फटकारले. तसेच दोन दिवसांपूर्वी बीजीडब्ल्यू आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या विविध समस्यांवर नागपूर येथे बैठक घेतली. त्यानंतर पालकमंत्री बडोले यांनी याच मुद्दावर शुक्रवारी (दि.१३) नागपूर येथे बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी वैद्यकीय महाविद्यालय परिसरातील बांधकाम टप्प्या-टप्प्याने करण्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देणार असल्याचेही सांगितले. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व बीजीडब्ल्यू रु ग्णालयाची इमारत जीर्ण झाली असल्याने त्याचे भविष्याच्या दृष्टीने स्ट्रक्चरल आॅडिट करणे आवश्यक आहे. बांधकाम विभागाने जुन्या इमारतीचे स्ट्रक्चरल आॅडिटचा प्रस्ताव व्हीएनआयटीला दिला आहे. या प्रस्तावावर निर्णय झाल्यानंतर रु ग्णालयाच्या इमारतीचे बांधकाम करण्यात येणार असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी बैठकीत दिली. आरोग्य सुविधा ही अत्यावश्यक सेवा असल्याने गोंदिया येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या विस्ताराला मंजूरी देण्यात आली. वैद्यकीय महाविद्यालय परिसरात रुग्णालयाच्या इमारतीचे बांधकाम, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी वसतीगृहाची व्यवस्था, संरक्षण भिंत आदी विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या कामांना गती देण्याचे निर्देश पालकमंत्री बडोले यांनी दिले.
केरकचऱ्याची त्वरित विल्हेवाट लावा
बीजीडब्ल्यू रुग्णालय आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या परिसरात सर्वत्र घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. तसेच काही अनावश्यक वस्तू देखील आवारात पडल्या आहेत. त्यामुळे रुग्णालय परिसरात केरकचरा आणि घाणीचे साम्राज्य पसरले आहे. हा सर्व केरकचरा आणि अनावश्यक वस्तूंची त्वरीत विल्हेवाट लावण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ.कांदबरी बलकवडे यांनी दिले.
बांधकामाची गती वाढवा
गोंदिया येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मंजूर झाल्यानंतर त्याचा कारभार केटीएस जिल्हा सामान्य रुग्णालय आणि बीजीडब्ल्यू रुग्णालयाच्या इमारतीत सुरू आहे. या दोन्ही रुग्णालयाच्या परिसरात वैद्यकीय महाविद्यालयासाठी इमारतींचे बांधकाम सुरू आहे. मात्र या बांधकामाची गती फार मंद असल्याने कामकाजात अडचण निर्माण होत आहे. त्यामुळे बांधकामाची गती वाढवून कामे वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश बैठकीत देण्यात आले.
मान्यतेवर संकट
मेडीकल कॉन्सिल आॅफ इंडियाच्या निकषानुसार शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरु करण्यासाठी ज्या आवश्यक सोयी सुविधा पाहिजे, त्या अद्यापही पूर्ण करण्यात आल्या नाही. त्यामुळे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात या आवश्यक सोयी सुविधा उपलब्ध करुन न दिल्यास मेडीकल कॉन्सिल आॅफ इंडियाकडूृन मान्यता मिळण्यास अडचण निर्माण होवू शकते. त्यामुळे आरोग्य विभागसुध्दा जोमाने कामाला लागला आहे.