गणेशोत्सवानिमित्त गोंदियात ऐच्छिक रक्तदान जनजागरण
By admin | Published: August 27, 2014 11:42 PM2014-08-27T23:42:10+5:302014-08-27T23:42:10+5:30
महाराष्ट्रात लोकमान्य टिळक यांनी सुरू केलेल्या सार्वजनिक गणेशोत्सवाचे निमित्त साधून स्थानिक बाई गंगाबाई शासकीय रक्तपेढीतर्फे २९ आॅगस्ट ते १० सप्टेंबरदरम्यान ऐच्छिक रक्तदान जनजागरण मोहीम
गोंदिया : महाराष्ट्रात लोकमान्य टिळक यांनी सुरू केलेल्या सार्वजनिक गणेशोत्सवाचे निमित्त साधून स्थानिक बाई गंगाबाई शासकीय रक्तपेढीतर्फे २९ आॅगस्ट ते १० सप्टेंबरदरम्यान ऐच्छिक रक्तदान जनजागरण मोहीम आयोजित करण्यात आली आहे. यात विविध गणेश मंडळाचे सहकार्य व स्वयंसेवी संघटनांचा सहभाग राहणार असल्याची माहिती बाई गंगाबाई शासकीय रक्तपेढीच्या प्रमुख डॉ. सुवर्णा हुबेकर यांनी दिली.
गणेशोत्सवानिमित्त प्रत्येक गावागावात व वार्डांत गणेशाची स्थापना होते. पेंडालमध्ये दहा दिवसपर्यंत विविध जनजागरण कार्यक्रम आयोजित केले जातात. हजारोंच्या संख्येने युवक या गणेशोत्सवात उत्साहाने सहभागी होतात. हाच औचित्य साधून ऐच्छिक रक्तदानाबाबत जनजागृती करण्यात येईल, असे रक्तपेढीचे जनसंपर्क अधिकारी अनिल गोंडाणे व रक्तपेढी अधिकारी डॉ. हुबेकर यांनी सांगितले आहे.
यानिमित्त रविवारी (दि.३१ आॅगस्ट) आमगाव शहरात गणेश मंडळातर्फे जयश्री फुंडकर यांच्या सहकार्याने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सोमवारी (दि.१ सप्टेंबर) अर्जुनी/मोरगाव येथे अशोक चांडक मित्रमंडळातर्फे गणेशोत्सवानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. मंगळवार (दि.२) गणेश मंडळ नवेगावबांध येथे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे.
जास्तीत जास्त गणेश मंडळांनी ऐच्छीक रक्तदानाबाबत पेंडालमधून प्रतिकृती, देखावे, शो तसेच फ्लेक्स, बॅनर्स, माहिती पत्रिका यांच्या माध्यमातून भरपूर जनजागृती करावी, असे आवाहन रक्तपेढी अधिकारी डॉ. सुवर्णा हुबेकर यांनी केली आहे.
शासनाच्या विविध विभागातर्फे जसे पोलीस विभाग, महिला बाल विकास विभाग आदीतर्फे गणेशोत्सवानिमित्त गणेश मंडळांना प्रोत्साहनपर पुरस्कार देण्यात येतात. यामध्ये ज्या गणेश मंडळाने ऐच्छीक रक्तदान शिबिर आयोजित करून बाई गंगाबाई शासकीय रक्तपेढीला रक्त दिले, त्यांना विशेष गुणांकण दिले जाणार असल्याचे डॉ. सुवर्णा हुबेकर यांनी सांगितले आहे.
‘एक गाव-एक गणपती-एक शिबिर’ या पद्धतीने जिल्ह्यात ऐच्छिक रक्तदान शिबिरे गणेशोत्सवादरम्यान आयोजित केले जाणार आहेत. तरी रक्तदान शिबिरांकरिता जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. रवी धकाते, जिल्हा वैद्यकीय अधीक्षक डॉ. संजीव दोडके, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. विनोद वाघमारे व डॉ. अमरीश मोहबे व संबंधित अधिकाऱ्यांनी केले आहे. (प्रतिनिधी)