मतदारराजा हेच आमचे दैवत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2019 11:40 PM2019-08-03T23:40:06+5:302019-08-03T23:40:58+5:30
विरोधक आम्हाला महाजनादेश यात्रा कशासाठी म्हणून टिका करीत आहे. मात्र जनतेच्या हितासाठी यात्रा काढणे ही भाजपची पंरपरा राहिली आहे. विरोधात असताना संघर्ष यात्रा काढली तर सत्तेवर आल्यानंतर जनतेने पाच वर्षांपूर्वी व्यक्त केलेल्या विश्वासाचे आभार मानन्यासाठी आणि कामाचा हिशोब देण्यासाठी महाजनादेश यात्रा काढली.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : विरोधक आम्हाला महाजनादेश यात्रा कशासाठी म्हणून टिका करीत आहे. मात्र जनतेच्या हितासाठी यात्रा काढणे ही भाजपची पंरपरा राहिली आहे. विरोधात असताना संघर्ष यात्रा काढली तर सत्तेवर आल्यानंतर जनतेने पाच वर्षांपूर्वी व्यक्त केलेल्या विश्वासाचे आभार मानन्यासाठी आणि कामाचा हिशोब देण्यासाठी महाजनादेश यात्रा काढली. यात्रा ही दैवताची काढली जाते, आमचे दैवत हे मतदारराजा असून त्याच्यांशी संवाद साधण्यासाठी ही महाजनादेश यात्रा असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे सांगितले.
भाजप सरकारने मागील पाच वर्षांत केलेल्या कामांचा हिशोब जनतेला देण्यासाठी आणि त्यांचे आशीवार्द घेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वात महाजनादेश यात्रा काढण्यात आली. ही यात्रा रविवारी सायंकाळी गोंदिया येथे दाखल झाली. यावेळी इंदिरा गांधी क्रीडा संकुल येथे जाहीरसभा आयोजित करण्यात आली होती. या वेळी ते बोलत होते. या वेळी प्रामुख्यामुळे ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, पालकमंत्री डॉ.परिणय फुके, खा. सुनील मेंढे, संघटनमंत्री उपेंद्र कोठेकर, आ.राजकुमार बडोले, संजय पुराम, विजय रहांगडाले, नगराध्यक्ष अशोक इंगळे, माजी खा.खुशाल बोपचे, भाजप जिल्हाध्यक्ष हेमंत पटले,माजी आ.रमेश कुथे, केशव मानकर, माजी जिल्हाध्यक्ष विनोद अग्रवाल,नगरसेवक भावना कदम, सीता रहांगडाले उपस्थित होते. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, मागील आघाडी सरकारच्या कार्यकाळात जेवढी कामे झाली नाहीत त्यापेक्षा तिप्पट कामे ही मागील पाच वर्षांत युती सरकारच्या कार्यकाळात झाली आहे. आघाडी सरकारने १५ वर्षांत शेतकऱ्यांसाठी केवळ १५ हजार कोटी रुपये दिले तर युती सरकारने ५ वर्षांत ५० हजार कोटी रुपये दिले. पूर्वी धानाला बोनस केवळ निवडणुका आल्या की दिले जात होते. मात्र आमच्या सरकारने मागील तीन वर्षांपासून सातत्याने बोनस दिले.
तसेच पुढील वर्षी आम्ही धानाला बोनस देऊ अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली. महाराष्ट्रातील युती सरकारने मागील पाच वर्षांत रेकार्ड ब्रेक कामे केली आहे. राज्यात मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून ३० हजार किमीचे रस्ते तयार केले, दीड लाख शेतकऱ्यांना वीज जोडण्या दिल्या, पायाभूत सुविधा आणि औद्योगिक विकासात सुध्दा महाराष्ट्र सर्वात पुढे असून देशात सर्वाधिक गुंतवणूक ही महाराष्ट्रात झाली आहे. तर नीती आयोगाने सुध्दा मागील पाच वर्षांत देशात सर्वाधिक रोजगार निर्मिती ही महाराष्ट्रात झाल्याचा अहवाल दिला आहे. गोंदिया शहरातील नझुल पट्टेधारकांचा प्रश्न मागील अनेक वर्षांपासून प्रलबिंत होता तो सुध्दा आम्ही मार्गी लावला असून नझुल पट्टेधारकांना केवळ पट्टेच नव्हे तर मालकी हक्क आणि घरकुल सुध्दा देऊ अशी ग्वाही दिली. या वेळी उपस्थित अन्य मान्यवरांनी या वेळी मार्गदर्शन केले.
डांर्गोली प्रकल्प पृूर्ण करण्यास महाराष्ट्र सरकार सक्षम
महाराष्ट्र आणि मध्यप्रदेशाच्या सीमेवर असलेला डांर्गोली उपसा सिंचन प्रकल्प पूर्ण झाल्यास याचा लाभ दोन्ही राज्यातील शेतकऱ्यांना होणार आहे.त्यामुळे हा प्रकल्प लवकर मार्गी लागवा यासाठी आपले तेथील सरकारशी बोलणे सुरू आहे. या प्रकल्पासाठी एकूण येणाऱ्या खर्चापैकी १० टक्के निधी मध्यप्रदेश सरकारने द्यावा देण्याची गरज आहे. मात्र मध्यप्रदेश सरकारने निधी दिला नाही तर हा प्रकल्प पूर्ण करण्यास महाराष्ट्र सरकार सक्षम असल्याची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
६०५ अभ्यासक्रमात शुल्क माफ
राज्य सरकारने ओबीसींसह सर्वच समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांवर अन्याय होऊ नये यासाठी त्यांना ६०५ अभ्यासक्रमात शुल्क माफ केले आहे. विदेशात शिक्षणासाठी शिष्यवृत्ती दिली. तसेच वैद्यकीय अभ्यासक्रमात दीड हजार जागा वाढविल्या आहेत.केंद्रातील मोदी सरकारने १० टक्के आरक्षण दिले असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
नाना पटोलेंना उत्तर देण्यास परिणय फुके सक्षम
माजी खा.नाना पटोले हे मुंबई पत्रकार परिषद घेवून जनादेश यात्रेविरोधात बोलत आहे. तसेच हिम्मत असेल मुख्यमंत्र्यांनी आपल्या सामोर येऊन उत्तर द्यावे असे सांगत आहे. मात्र आपण आज त्यांच्याच जिल्ह्यात असून त्यांना उत्तर देण्यासाठी आमचे परिणय फुके हेच सक्षम असल्याचे सांगितले. परिणय फुके यांच्यावर पक्षाने व्यक्त केलेल्या विश्वासास ते खरे उतरत असल्याचे सांगितले. फुके यांनी भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात यात्रेच्या केलेल्या नियोजनाचे मुख्यमंत्र्यांनी कौतुक केले.