वेतन कपातीचा मिळणार लेखा-जोखा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 3, 2017 12:09 AM2017-12-03T00:09:11+5:302017-12-03T00:09:31+5:30
अंशदायी सेवानिवृत्ती योजनेंतर्गत महसूल कर्मचाऱ्यांच्या वेतनातून कपात करण्यात आलेल्या रकमेचा लेखा-जोखा कर्मचाऱ्यांना देण्यात यावा असे आदेश वित्त विभागाने काढले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : अंशदायी सेवानिवृत्ती योजनेंतर्गत महसूल कर्मचाऱ्यांच्या वेतनातून कपात करण्यात आलेल्या रकमेचा लेखा-जोखा कर्मचाऱ्यांना देण्यात यावा असे आदेश वित्त विभागाने काढले आहेत. त्यामुळे महसूल कर्मचाºयांना त्यांच्या वेतनातील कपातीचा पूर्ण लोखा-जोखा आता मिळणार आहे. विशेष म्हणजे, आमदार गोपालदास अग्रवाल यांनी वित्त व महसूल विभागाच्या सचिवांची बैठक घेऊन त्यांना याबाबत निर्देश दिले होते.
सन २००५ पासून महसूल विभागात नोकरीवर लागलेल्या कर्मचाºयांना अंशदायी सेवानिवृत्ती योजना लागू करण्यात आली आहे. यांतर्गत कर्मचाºयांच्या वेतनातून १० टक्के रक्कम कपात करून त्यात शासनाकडून १० टक्के रक्कम जोडून कर्मचाºयांच्या सेवानिवृत्त खात्यात जमा केली जाणार आहे. त्यानुसार येथील कर्मचाऱ्यांच्या वेतनातून रक्कम कपात केली जात आहे. मात्र त्यात शासनाकडून तेवढीच रक्कम जोडण्यात आली की नाही, रक्कम कोणत्या विभागाच्या कोणत्या खात्यात जमा आहे. प्रत्येक कर्मचाºयांच्या खात्यात अंशदायी सेवानिवृत्ती योजनेचे किती रूपये जमा आहे याबाबत काहीच माहिती किंवा विवरण विभाग व कर्मचाऱ्यांकडे नाही. यावर महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटना व महाराष्ट्र राज्य जुनी पेंशन हक्क संघटनतर्फे आमदार अग्रवाल यांना निवेदन देण्यात आले होते.
याप्रसंगी आमदार अग्रवाल यांनी संघटनेच्या पदाधिकाºयांना याबाबत संबंधित अधिकाºयांची बैठक घेण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार, अग्रवाल यांनी, लोकलेखा समितीच्या विधानभवनातील (मुंबई) कार्यालयात वित्त विभागाचे उपसचिव अनुदिप दिघे व महसूल विभागाचे प्रधान सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांच्या उपस्थितीत बैठक घेतली. याप्रसंगी महसूल कर्मचाऱ्यांच्या वेतनातून कापण्यात आलेल्या रकमेचा स्पष्ट लेखा-जोखा तयार करून नियमानुसार शासनाच्या रकमेचा हिस्सा त्यात जोडून कर्मचाºयांच्या सेवानिवृत्ती खात्यात जमा करण्याचे निर्देश दिले. वित्त विभागाचे उपसचिव दिघे यांनी महसूल कर्मचाºयांच्या अंशदायी सेवानिवृत्ती वेतन योजनेच्या कार्यपद्धतीत त्वरीत दुरूस्ती करणे व कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्ती वेतनासंबंधात सर्व विवरण कोषागार अधिकाऱ्यांना त्वरीत तयार करून माहिती व संवितरण अधिकाºयांना उपलब्ध करुन देण्याचे आदेश काढले आहेत. यामुळे आता या कर्मचाºयांना त्यांच्या वेतनातील कपात केलेल्या रकमेचा संपूर्ण लेखा-जोखाच आता उपलब्ध होणार आहे.