रोजंदारी कर्मचाऱ्यांची लॉटरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2018 09:27 PM2018-02-11T21:27:58+5:302018-02-11T21:28:33+5:30

Wage earner lottery | रोजंदारी कर्मचाऱ्यांची लॉटरी

रोजंदारी कर्मचाऱ्यांची लॉटरी

Next
ठळक मुद्दे६० कर्मचारी होणार स्थायी : नगर विकास विभागाने काढले आदेश

कपिल केकत ।
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : सन १९९३ पूर्वी पासून नगर परिषद कार्यालयात स्थायी होण्याची आशा बाळगून सेवा देत असलेल्या रोजंदारी कर्मचाऱ्यांना हे वर्ष भरभराटीचे लागले आहे. कारण, नगर परिषदेतील ६० रोजंदारी कर्मचाऱ्यांना सेवाज्येष्ठतेच्या आधारावर स्थायी करण्याचे आदेश नगर विकास विभागाने काढले आहे. यामुळे नगर परिषदेतील रोजंदारी कर्मचाऱ्यांची एकप्रकारे लॉटरीच लागली आहे.
येथील नगर परिषद कार्यालयात सुमारे १७१ रोजंदारी कर्मचारी कार्यरत असून आपल्या जीवनातील महत्वाचे वर्ष त्यांनी नगर परिषद सेवेत गमावले आहे. भविष्यात कधीतरी स्थायी सेवेत कायम केले जाणार ही आशा बाळगून ते आपले कर्तव्य पार पाडत आहेत. रोजंदारी कर्मचाऱ्यांना स्थायी सेवेत कायम करण्याच्या मागणीला नगर परिषद कर्मचारी युनियनचे अध्यक्ष जहीर अहमद व नगरसेवक शकील मंसुरी यांनी आमदार गोपालदास अग्रवाल यांच्याकडे विषय मांडला होता. यावर सन २००६ पासून आमदार अग्रवाल राज्य शासनापुढे हा विषय पुरजोरपणे मांडत आले आहेत.
रोजंदारी कर्मचाऱ्यांच्या या विषयाला घेऊन आमदार अग्रवाल यांनी नगर विकास विभागाच्या प्रधान सचिव मनिषा म्हैसकर व अन्य अधिकाऱ्यांसोबत कित्येकदा बैठक घेतली. मात्र आतापर्यंत या विषयात काहीच कारवाई केली जात नसल्याचे बघत आमदार अग्रवाल यांनी नाराजी व्यक्त केली. दरम्यान ३ जानेवारी रोजी नगर विकास विभागाच्या प्रधान सचिव म्हैसकर व अन्य अधिकाऱ्यांसोबत बैठक घेत आमदार अग्रवाल यांनी हा विषय मांडून त्याचा सोक्षमोक्ष लावण्याची मागणी केली. यावर म्हैसकर यांनी रोजंदारी कर्मचाऱ्यांना स्थायी करण्याचे निर्देश दिले होते.
अखेर त्याची पूर्तता करीत ६० रोजंदारी कर्मचाऱ्यांना स्थायी करण्याचे आदेश काढण्यात आले आहेत. विशेष म्हणजे, पहिल्या टप्प्यात वर्ग-३ च्या ३७ तर वर्ग-४ च्या २३ रोजंदारी कर्मचाऱ्यांचे गोंदिया जिल्ह्यातील गोंदिया व तिरोडा तसेच भंडारा जिल्ह्यातील भंडारा, पवनी व तुमसर नगर परिषद कार्यालयांतील मंजूर स्थायी रिक्त पदांवर सेवाज्येष्ठतेनुसार समावेशन केले जाणार आहे. शासनाच्या या निर्णयाने रोजंदारी कर्मचाऱ्यांची एकप्रकारे लॉटरीच लागली असून त्यांचे भविष्य आता सवरले आहे. शिवाय, यामुळे उर्वरीत रोजंदारी कर्मचाऱ्यांतही आता स्थायी होण्याची एक आशा नव्याने निर्माण झाली आहे.
असे होणार समावेशन
रोजंदारी कर्मचाऱ्यांना गोंदिया व भंडारा जिल्ह्यातील नगर परिषदांत समावेश करण्याचे आदेश आहे. आता त्यानुसार, गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा नगर परिषदमध्ये उपलब्ध होणाऱ्या वर्ग-३ च्या २० स्थायी रिक्त पदांवर २० कर्मचाऱ्यांचे व पवनी येथे २ पदांवर, तुमसर येथे १० पदांवर व भंडारा नगर परिषद येथे ५ पदांवर रोजंदारी कर्मचाऱ्यांचे समावेशन करण्यात येणार आहे. त्याचप्रकारे, गोंदिया नगर परिषद अंतर्गत पदोन्नती प्रक्रीया पूर्ण करून उपलब्ध होणाऱ्या वर्ग-४ च्या १७ पदांवर व भंडारा जिल्ह्यातील पवनी, तुमसर व भंडारा नगर परिषदेत प्रत्येकी २ प्रमाणे वर्ग-४ च्या ६ पदांवर वर्ग-४ च्या २३ रोजंदारी कर्मचाऱ्यांचे समावेशन करण्यात येणार आहे.
उर्वरितांसाठी लवकरच आदेश आणणार
नगर परिषदेतील सुमारे १७१ रोजंदारी कर्मचाऱ्यांचा हा विषय असून यातील ६० कर्मचाऱ्यांना स्थायी सेवेत घेण्याचे आदेश सध्या काढण्यात आले आहेत. त्यामुळे उर्वरीत कर्मचाऱ्यांत एक शंका निर्माण झाली आहे. मात्र उर्वरीत कर्मचाऱ्यांनाही स्थायी सेवेत समाविष्ट करण्यासाठीचे प्रयत्न सुरू असून लवकरच त्यांचेही आदेश आणणार असल्याचे आमदार अग्रवाल यांनी कळविले आहे.

Web Title: Wage earner lottery

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.