रोजंदारी कर्मचाऱ्यांचे नशीब फळफळले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2018 09:47 PM2018-01-04T21:47:10+5:302018-01-04T21:47:27+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : स्थायी होण्याची अपेक्षा बाळगत नगर परिषदेत कार्यरत असलेल्या रोजंदारी कर्मचाºयांचे नशिब अखेर फळफळलेच. येत्या १५ दिवसांत या रोजंदारी कर्मचाऱ्यांची पालिकेतील रिक्त पदांवर नियुक्ती केली जाणार आहे.
मागील २०-२५ वर्षांपासून नगर परिषदेतील रोजंदारी कर्मचाऱ्यांना स्थायी करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. जेथे ३०० कर्मचारी काम करीत होते त्यातील काहीजण सेवानिवृत्त झाले तर काहींचा मृत्यूही झाला आहे. आता उर्वरीत १८७ कर्मचारी स्थायी होण्याची अपेक्षा बाळगून काम करीत आहेत. मात्र त्यांना आत्तापर्यंत केवळ आश्वासनेच मिळाली. अखेर त्यांनी काही दिवसांपूर्वी आमदार गोपालदास अग्रवाल यांना निवेदन देऊन समस्या मार्गी लावण्याची मागणी केली. सुरूवातीपासून रोजंदारी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसाठी प्रयत्नरत असलेल्या आमदार अग्रवाल यांनी यापूर्वी सप्टेंबर महिन्यात वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेतली होती. तेव्हाही रोजंदारी कर्मचाऱ्यांना स्थायी करण्यावर चर्चा झाली होती. मात्र तोडगा काहीच न निघाल्याने आमदार अग्रवाल यांनी प्रकरणावर कायमस्वरुपी तोडगा काढण्यासाठी बुधवारी (दि.३) मुंबई येथे नगर विकास सचिव मनिषा म्हैसकर, मुख्याधिकारी चंदन पाटील, नगराध्यक्ष अशोक इंगळे यांच्यासह संबंधीत अन्य अधिकाऱ्यांची बैठक घेतली. बैठकीत आमदार अग्रवाल यांनी रोजंदारी कर्मचाऱ्यांचा विषय जिथे आहे तिथेच असल्याचे सांगत नाराजी व्यक्त केली. स्थायी होण्याची अपेक्षा बाळगून आपले जीवन या रोजंदारी कर्मचाऱ्यांनी घालविले. काही रोजंदारी कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्याचे सांगितले. यावरही जर त्यांच्या प्रश्नावर तोडगा निघत नसल्यास आंदोलनाचा मार्ग अवलंबिण्याचा इशाराही आमदार अग्रवाल यांनी दिला. यावर नगर विकास सचिव मनिषा म्हैसकर यांनी, सर्व विषयांची माहिती घेत येत्या १५ दिवसांत रोजंदारी कर्मचाºयांना गोंदिया, भंडारा व गडचिरोली जिल्ह्यातील नगर परिषदांतील रिक्त पदांवर नियुक्ती केली जाणार आहे.
२००६ पासून केला पाठपुरावा
नगर परिषद रोजंदारी कर्मचाऱ्यांना स्थायी करण्यात यावे. या मागणीसाठी आमदार अग्रवाल यांचे सन २००६ पासून प्रयत्न सुरू आहेत. या काळात त्यांनी कित्येकदा मंत्र्यांपासून अधिकाऱ्यांपर्यंत मागणी रेटून धरली. मात्र रोजंदारी कर्मचाऱ्यांचा विषय काही सुटला नाही. मध्यंतरी सप्टेंबर महिन्यातही नगर विकास सचिव म्हैसकर यांच्यासह अन्य अधिकाऱ्यांसोबत बैठक झाली. दरम्यान रोजंदारी कर्मचाऱ्यांची मध्यंतरी आमदार अग्रवाल यांची भेट घेऊन त्यांच्याकडे अपेक्षा व्यक्त केली. त्यानंतर नगर विकास मंत्रालयाने १५ दिवसांत रोजंदारी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे, ६० रूपये रोजी मिळत असलेल्या रोजंदारी कर्मचाºयांना किमान वेतन नुसार ४५० रूपये रोजी मिळत आहे.