वैनगंगा नदी पूर नियंत्रण समन्वय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2018 10:24 PM2018-05-23T22:24:10+5:302018-05-23T22:24:10+5:30
वैनगंगा, बावनथडी आणि बाघ नदीवर बांधण्यात आलेल्या प्रकल्पामुळे पावसाळ्याच्या दिवसात अतिवृष्टी झाल्यास अशा स्थितीत नदीत पाणी सोडण्यात येईल. त्यामुळे बालाघाट, गोंदिया व भंडारा जिल्ह्यात पूरपरिस्थिती निर्माण होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : वैनगंगा, बावनथडी आणि बाघ नदीवर बांधण्यात आलेल्या प्रकल्पामुळे पावसाळ्याच्या दिवसात अतिवृष्टी झाल्यास अशा स्थितीत नदीत पाणी सोडण्यात येईल. त्यामुळे बालाघाट, गोंदिया व भंडारा जिल्ह्यात पूरपरिस्थिती निर्माण होते. ही पूरपरिस्थिती नियंत्रणात आणण्याच्या दृष्टीने बालाघाटचे जिल्हाधिकारी डी.व्ही.सिंह यांच्या अध्यक्षतेखाली बालाघाट जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात बालाघाट, गोंदिया, भंडारा व नागपूर जिल्ह्याच्या अधिकाऱ्यांची बैठक पार पडली.
बैठकीला जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे, पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील-भूजबळ, बालाघाटच्या जि.प.च्या मुख्य कार्यकारी अधिकारी मंजुषा राय व गोंदिया,नागपूर, भंडारा, बालाघाट जिल्ह्यातील जलसंपदा विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
मध्यप्रदेशातील शिवनी जिल्ह्यातील संजय सरोवर प्रकल्पातील पाणी अतिवृष्टीच्या काळात सोडल्यानंतर बालाघाट, गोंदिया व भंडारा जिल्ह्यातील काही गावे प्रभावित होतात.
गोंदिया जिल्ह्यातील शिरपूर प्रकल्प, पुजारीटोला व कालिसरार या प्रकल्पातील सुध्दा अतिवृष्टीच्या काळात पाणी सोडल्यानंतर बालाघाट जिल्ह्यातील काही गावात पूरपरिस्थिती निर्माण होते.
बावनथडी नदीवर बांधण्यात आलेल्या राजीव सागर प्रकल्पातून पाणी सोडल्यानंतर भंडारा जिल्ह्यातील काही गावांमध्ये सुध्दा पूरपरिस्थिती निर्माण होते. यावर बैठकीत मंथन करण्यात आले.
शिवनी जिल्ह्यात वैनगंगा नदीवर भिमगड प्रकल्प व बालाघाट जिल्ह्यातील बावनथडी नदीवर बांधण्यात आलेल्या राजीव सागर प्रकल्प व गोंदिया जिल्ह्यातील बाघ नदीवर बांधण्यात आलेले शिरपूर, पुजारीटोला व कालिसरार प्रकल्पातील नदीमध्ये पूरपरिस्थितीच्या काळात एकाचवेळी पाणी सोडण्यात येणार नाही.
एका प्रकल्पातून पाणी सोडल्यानंतर दुसऱ्या प्रकल्पातून पाणी सोडले जाणार नाही.
प्रकल्पातून पाणी सोडताना योग्य समन्वयातून पाणी सोडण्यात येईल. गोंदिया जिल्ह्यातील शिरपूर, पुजारीटोला व कालिसरार प्रकल्पात पावसाळ्याच्या दिवसात नियंत्रीत स्वरुपात पाणी सोडण्यात येईल.
ज्यामुळे वैनगंगा नदीत पूरिस्थती निर्माण होणार नाही. नदीकाठावरील गावांना पुराचा फटका बसणार नाही. पावसाळ्याच्या दिवसात पूरपरिस्थितीवर मात करण्यासाठी आवश्यक ते साहित्य व साधने तयार असावीत.
या साहित्य साधनांचा वापर करण्याच्या दृष्टीने त्याची रंगीत तालीम सुध्दा घेण्यात यावी.
त्यामुळे सुस्थितीत असलेल्या साधनांची माहिती मिळून आवश्यक ते साहित्य खरेदी करता येईल. पूरपरिस्थितीच्या काळात ग्रामस्थांना सावध करण्याचे स्त्रोत अद्ययावत करण्यात येतील.
जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी आवश्यक
जिल्हाधिकाऱ्यांना सांगितल्याशिवाय नदीमध्ये प्रकल्पाचे पाणी सोडण्यात येणार नाही. संजय सरोवरातून पाणी सोडल्यानंतर १७० कि.मी.चा प्रवास करीत हे पाणी १५ ते २० तासामध्ये बालाघाटपर्यंत पोहोचते. त्यामुळे सर्व संबंधित जिल्ह्यात पाणी सोडण्यात येणार असल्याची पूर्वसूचना देण्यात येणार आहे. पूरपरिस्थितीवर नियंत्रण मिळण्यासोबतच आवश्यक त्या उपाययोजना करता येणार आहे.
नोडल अधिकाऱ्याची नियुक्ती
प्रसारमाध्यमातून पूरपरिस्थितीबाबतची पूर्वकल्पना ग्रामस्थांना देण्यात येणार आहे. पावसाळ्याच्या दिवसात प्रत्येक गावाकरीता एका नोडल अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात येणार आहे. या काळात ग्रामस्थांच्या आवश्यक त्या गरजा पूर्ण करण्यासोबतच उपाययोजना करण्याची जबाबदारी जिल्हा प्रशासनाच्या समन्वयातून पूर्ण करण्याचे काम नोडल अधिकारी करणार असल्याचे निश्चित करण्यात आले. प्रकल्प पूर्णपणे भरल्यानंतर किंवा पूरपरिस्थिती निर्माण झाल्यानंतर प्रकल्पातून पाणी सोडण्याबाबतची सूचना संबंधित जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना दिली जाणार आहे.