पाण्यासाठी ‘वेट अॅन्ड वॉच’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2018 10:02 PM2018-04-16T22:02:01+5:302018-04-16T22:02:01+5:30
शहरातील पाणी टंचाईच्या समस्येवर मात करण्यासाठी आठ दिवसांपूर्वी पुजारीटोला धरणाचे पाणी सोडण्यात आले होते. मात्र या दरम्यान कालवा फुटल्याने पाणी बंद करण्यात आले. त्यामुळे हे पाणी डांर्गोली येथील पाणी पुरवठा योजनेपर्यंत पोहचलेच नाही.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : शहरातील पाणी टंचाईच्या समस्येवर मात करण्यासाठी आठ दिवसांपूर्वी पुजारीटोला धरणाचे पाणी सोडण्यात आले होते. मात्र या दरम्यान कालवा फुटल्याने पाणी बंद करण्यात आले. त्यामुळे हे पाणी डांर्गोली येथील पाणी पुरवठा योजनेपर्यंत पोहचलेच नाही. आता कालवा दुरूस्तीचे काम पूर्ण झाले असून येत्या दोन दिवसात शहराला नियमित पाणी पुरवठा होईल, असे महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाकडून सांगितले जात आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्यासाठी शहरवासीयांना पुन्हा वेट अॅन्ड वॉच करण्याचा सल्ला दिला जात असल्याचे चित्र आहे.
जिल्ह्यात मागील वर्षी कमी प्रमाणात पाऊस झाल्याने सिंचन प्रकल्प आणि तलावांमध्ये सुध्दा मोजकाच पाणीसाठा आहे. तर वैनगंगा नदीचे पात्र देखील मार्च महिन्यातच कोरडे पडले.त्याचा शहरातील पाणी पुरवठ्यावर परिणाम झाला. मागील महिनाभरापासून शहरवासीयांना केवळ एक वेळ पाणी पुरवठा केला जात आहे. मात्र तो देखील नियमित होत नसून पाच ते दहा मिनिटे पाणी पुरवठा होत असल्याने पाणी टंचाईची समस्या गंभीर झाली आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आणि जिल्हा प्रशासनाला पाणी टंचाईवर उपाययोजना करण्यासाठी उशीरा जाग आल्याने पाणी टंचाईच्या समस्येत पुन्हा भर पडली. आठ दिवसांपूर्वी शहरातील पाणी टंचाईच्या समस्येवर मात करण्यासाठी पुजारीटोला धरणाचे पाणी सोडून ते कालव्याव्दारे डांगोर्ली येथील पाणी पुरवठा योजनेपर्यंत पोहचविण्याचे प्रयत्न सुरू झाले. मात्र सालेकसा तालुक्यातील आंभोऱ्याजवळ कालवा फुटल्याने पाणी पोहचण्यास विलंब झाला. त्यानंतर रविवारी (दि.१५) पुन्हा पुजारीटोला धरणातून पाणी सोडण्यात आले. सध्या स्थितीत धरणातून १०० क्यूसेक पाणी सोडले जात असून हे पाणी डांर्गोलीपर्यंत पोहचण्यास दोन दिवसांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. पुजारीटोला धरणातून सोडलेले पाणी सध्या आमगाव तालुक्यातील सुपलीपारपर्यंत पोहचले आहे. डांर्गोलीपासून हे अंतर ४० कि.मी.असून तिथपर्यंत पाणी पोहचण्यास दोन दिवस लागू शकतो. त्यामुळे शहरवासीयांना किमान दोन तीन दिवस पाणी टंचाईच्या समस्येला तोंड द्यावे लागणार आहे.
सिरपूर व इडियाडोह जलाशयांचे पाणी सोडले
शहरासह जिल्ह्यातील ग्रामीण भागात सुध्दा पाणी टंचाईची समस्या निर्माण झाली आहे. सडक अर्जुनी, तिरोडा, गोरेगाव तालुक्यातील गावकऱ्यांची पाण्यासाठी भटकंती सुरू आहे. जनावरांना सुध्दा पिण्यासाठी तलाव, बोडयामध्ये पाणी नसल्याने पशुपालकांसमोर मोठी समस्या निर्माण झाली आहे. ही समस्या पाहता सिरपूर जलाशयातून ६६७ क्यूसेक व इडियाडोह जलाशयातून १३० क्यूसेक पाणी सोडण्यात आले आहे.