जिल्ह्यातील ८८०० शेतकरी वेटिंगवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 3, 2018 09:32 PM2018-12-03T21:32:02+5:302018-12-03T21:33:04+5:30
छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जात असून आतापर्यंत जिल्ह्यातील ७३ हजार ७३२ शेतकरी कर्जमुक्त झाले आहेत. असे असतानाही अद्याप जिल्ह्यातील ८ हजार ७४२ शेतकरी कर्जमाफीपासून वंचीत आहेत. शासनाने १३ ग्रीन लिस्ट जाहीर करून दिल्या असून कर्जमाफीच्या प्रतिक्षेत असलेल्या शेतकºयांच्या नजरा १४ व्या ग्रीन लिस्टकडे लागल्या आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जात असून आतापर्यंत जिल्ह्यातील ७३ हजार ७३२ शेतकरी कर्जमुक्त झाले आहेत. असे असतानाही अद्याप जिल्ह्यातील ८ हजार ७४२ शेतकरी कर्जमाफीपासून वंचीत आहेत. शासनाने १३ ग्रीन लिस्ट जाहीर करून दिल्या असून कर्जमाफीच्या प्रतिक्षेत असलेल्या शेतकऱ्यांच्या नजरा १४ व्या ग्रीन लिस्टकडे लागल्या आहेत.
आजघडीला शेती करणे अत्यंत धोकादायक झाले आहे. निसर्गाच्या मर्जीवर शेतीचा कारभार चालत असून मागील दोन-तीन वर्षांत निसर्गाने साथ न दिल्याने लोकांच्या पोटाची व्यवस्था करणारी शेती शेतकऱ्यांसाठीच मृत्यूचा मार्ग बनली. कर्ज काढून शेती करणारे शेतकरी यात चांगलेच फरफटल्याने शासनाने आत्महत्येचा मार्ग पत्करणाऱ्या शेतकऱ्यांना मदतीचा हात म्हणून कर्जमाफीची योजना सुरू केली. छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना म्हणून ही योजना राबविली जात आहे.
या योजनेंतर्गत कर्जमाफीसाठी जिल्ह्यातील ८२ हजार ४७४ शेतकºयांनी आॅनलाईन अर्ज केला होता. त्यानंतर शासनाकडून टप्प्याटप्प्याने कर्जमाफीची प्रक्रीया सुरू केली. यात कर्जमाफी करण्यात आलेल्या शेतकºयांची ग्रीन लिस्ट काढली जात असून आतापर्यंत अशा १३ ग्रीन काढण्यात आल्या आहेत. त्यातील १२ व्या ग्रीन लिस्टपर्यंत जिल्ह्यातील ७३ हजार ७३२ शेतकºयांची कर्जमाफी करण्यात आली आहे. म्हणजेच आता ८ हजार ७४२ शेतकरी कर्जमाफीपासून वंचीत आहेत. परिणामी त्यांना धाकधूक होत आहे.
मागील वर्षभरापासून शासनाकडून एक-एक करून आतापर्यंत १३ ग्रीन लिस्ट आल्या. मात्र त्यात आपले नाव नसल्याने उरलेल्या या ८ हजार ७४२ शेतकऱ्यांचे टेंशन वाढले आहे. कधी यादी येते व त्यात आपले नाव दिसते याचीच या उर्वरीत शेतकºयांना प्रतीक्षा लागली आहे. त्यामुळे आता या सर्वांच्या नजरा १४ व्या ग्रीन लिस्टकडे लागल्या आहेत.
१३ व्या ग्रीनलिस्टची जुळवणी सुरू
शासनाकडून आलेल्या १३ व्या ग्रीन लिस्टमध्ये जिल्ह्यातील १५६ शेतकऱ्यांचा समावेश होता. मात्र शासनाकडून आलेल्या ग्रीनलिस्टची जिल्हास्तरावर जुळवणी केली जाते व त्यात काही त्रुटी असल्यास किंवा नावे पुन्हा आल्यास त्याबाबत कळविले जाते. ही प्रक्रीया झाल्यावर तसे कळवून निधी मागविला जाते. यामुळे सध्यातरी १२ व्या यादीपर्यंत शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा आकडा धरला जात आहे. या यादीची जुळवणी झाल्यानंतर कर्जमाफी झालेल्या शेतकऱ्यांची संख्या वाढणार आहे.