११ वर्षापासून २८ डॉक्टरांना स्थायी होण्याची प्रतीक्षा
By admin | Published: September 25, 2016 02:23 AM2016-09-25T02:23:44+5:302016-09-25T02:23:44+5:30
एकीकडे एमबीबीएस डॉक्टरांची कमतरता असल्याने आरोग्य संस्थेत २५ जागा रिक्त आहेत.
फक्त मिळते आश्वासन : मॅग्मोमार्फत केले होते आंदोलन
गोंदिया : एकीकडे एमबीबीएस डॉक्टरांची कमतरता असल्याने आरोग्य संस्थेत २५ जागा रिक्त आहेत. तर दुसरीकडे मागील ११ वर्षापासून २८ बीएएमएस डॉक्टरांना स्थायी होण्याची प्रतिक्षा आहे.
एमबीबीएस डॉक्टरांची कमी भासू नये यासाठी राज्य सरकार द्वारे बीएएमएस डॉक्टरांना नियुक्ती देण्यात येते.हे सर्व डॉक्टर जिल्ह्याच्या अतिदुर्गम भागात अस्थायी डॉक्टर म्हणून सेवा देत आहेत. परंतु त्यांना शासकीय सुविधेपासून वंचित ठेवण्यात येत आहे. कार्यरत असताना मृत्यू झाल्यास शासनाकडून त्यांच्या कुटुंबियांना काहीच मिळत नाही.त्यामुळे अस्थायी डॉक्टरांमध्ये असंतोष आहे.
एमबीबीएस डॉक्टरांच्या अभावामुळे शासनाने आयुक्त व आरोग्य सेवा उपसंचालक यांनी २००५ मध्ये राज्यात ७९१ डॉक्टरांना नियुक्त केले. बीएएमएस डॉक्टर जिल्ह्याच्या दुर्गम भागात सेवा देतात. या डॉक्टरांना एक दिवसाचा खंड देऊन नियुक्ती दिली जाते. वार्षिक वेतन वाढ, विमा, अंशदायी सेवानिवृत्ती वेतन योजना, भविष्य निर्वाह निधी या सारख्या योजना या डॉक्टरांना लागू केले जात नाही.यामुळे अस्थायी डॉक्टरांमध्ये असुरक्षीतेची भावना आहे.
जिल्ह्यात २८ अस्थायी वैद्यकीय अधिकारी (बीएएमएस) गट ब कार्यरत आहेत. या अस्थायी डॉक्टरांना समान वेतन मिळत नाही. काही लोक स्थायी होणे योग्य आहे. तर काही वय ओलांडत चालले आहे. लिखनलाल कुंभरे या डॉक्टरला कर्करोगाने पछाडले आहे. ते अस्थायी असल्यामुळे त्यांच्या कुटुंबियांना शासकीय लाभ मिळणार नाही. (तालुका (प्रतिनिधी)