औषधनिर्माण शास्त्र अभ्यासक्रमासाठी सीईटीची प्रतीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2021 04:32 AM2021-08-22T04:32:23+5:302021-08-22T04:32:23+5:30
आमगाव : बारावीचा निकाल काही दिवसांपूर्वी जाहीर झाला. दुसरीकडे औषधनिर्माणशास्त्र पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या सीईटी परीक्षेचे वेळापत्रक ...
आमगाव : बारावीचा निकाल काही दिवसांपूर्वी जाहीर झाला. दुसरीकडे औषधनिर्माणशास्त्र पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या सीईटी परीक्षेचे वेळापत्रक अद्यापही जाहीर झालेले नाही. जोपर्यंत सीईटी होत नाही तोपर्यंत औषधनिर्माणशास्त्र अभ्यासक्रमाचे प्रवेश होणार नाही. जिल्ह्यात औषधनिर्माण शास्त्र पदवी अभ्यासक्रम म्हणजे बीफार्मसीच्या चार महाविद्यालयांमध्ये २८० जागा आहे.
बारावीनंतर औषधनिर्माण शास्त्र पदवी अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यासाठी सीईटी परीक्षा होते. पण अद्याप या परीक्षेविषयी कोणताच निर्णय झालेला नाही. सप्टेंबर महिन्यात ही परीक्षा होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यानुसार बारावी उत्तीर्ण विद्यार्थी परीक्षेची तयार करत आहे. गोंदिया जिल्ह्यात बीफार्मसीसाठी चार प्रमुख महाविद्यालये आहेत. त्यात मनोहरभाई पटेल इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी गोंदिया, श्री लक्ष्मणराव मानकर इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी आमगाव, छत्रपती शिवाजी कॉलेज ऑफ फार्मसी देवरी, गोंदिया कॉलेज ऑफ फार्मसी चुलोद या महाविद्यालयांचा समावेश आहे. त्यात २८० जागा आहे. पण जोपर्यंत सीईटीचा निकाल जाहीर होत नाही तोपर्यंत प्रवेशप्रक्रिया होणार नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांसह पालकांचे लक्ष आता सीईटी परीक्षेची तारीख कधी जाहीर होते याकडे लागले आहे.
.........
दोन वर्षांपासून विलंब
कोरोनामुळे दोन वर्षांपासून सीईटी परीक्षा उशिरा होत असल्याची स्थिती आहे. बी फार्मसीला प्रवेश घेण्यास इच्छुक असलेल्या विद्यार्थ्यांना सीईटीची प्रतीक्षा करावी लागणार आहे. सप्टेंबर महिन्यात ही परीक्षा होणे अभिप्रेत आहे. परीक्षा उशिरा होत असल्याने विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यासाठी वेळ मिळाला असला तरी इतर पदवी अभ्यासक्रमाचे प्रवेश सुरू झाल्याने विद्यार्थी गोंधळात पडले आहेत.
.............
इतर पदवी अभ्यासक्रमाला प्रवेश सुरू
बारावीनंतर बीए, बीएससी, बीकॉम आणि तत्सम विद्या शाखांची प्रवेशप्रक्रिया सुरू झाली आहे. महाविद्यालयांनी पदवीचे प्रथम वर्षाचे प्रवेश सुरू केले आहेत. सीईटी उशिरा होत असल्याने बी फार्मसीचे प्रवेशही उशिरा होणार आहे. यामुळे ज्या विद्यार्थ्यांना बी फार्मसीला प्रवेश मिळाला नाही व इतर विद्या शाखांचे प्रवेश बंद झाले, तर विद्यार्थ्यांनी कुठे प्रवेश घ्यायचा? असा प्रश्न पालकांना पडला आहे.