नऊ योजनांना ‘करंट’ची प्रतीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2017 11:03 PM2017-12-12T23:03:48+5:302017-12-12T23:04:19+5:30
ग्रामीण भागातील नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ येऊ नये, यासाठी राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत प्रत्येक गावासाठी स्वतंत्र पाणी पुरवठा योजना मंजूर करण्यात आली.
कपिल केकत।
आॅनलाईन लोकमत
गोंदिया : ग्रामीण भागातील नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ येऊ नये, यासाठी राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत प्रत्येक गावासाठी स्वतंत्र पाणी पुरवठा योजना मंजूर करण्यात आली. मात्र पाणी पुरवठा योजना पूर्ण झाल्यानंतरही वीज जोडणी अभावी त्या कार्यान्वीत झालेल्या नाही. जिल्ह्यातील नऊ पाणी पुरवठा योजना ‘करंट’ च्या प्रतीक्षेत असल्याची बाब पुढे आली आहे.
जिल्ह्यात यावर्षी सरासरीच्या केवळ ५० टक्के पाऊस झाला. परिणामी सिंचन प्रकल्प देखील कोरडे पडले आहे. तर डिसेंबर महिन्यातच भूजल पातळी २ मिटरने खालावली आहे. त्यामुळे यंदा उन्हाळ्यात पाणी टंचाईची गंभीर समस्या निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. शहरासह जिल्ह्यातील ग्रामीण भागात आत्तापासूनच पाणी टंचाईची समस्या भेडसावू लागली आहे.
ग्रामीण भागातील नागरिकांना पाण्यासाठी दूरवर भटकंती करावी लागू नये, यासाठी राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत प्रत्येक गावात पाण्याची सोय केली जात आहे. यात प्रत्येक गावाला स्वतंत्र पाणी पुरवठा योजना देण्यावर शासनाचा भर आहे. गावाची स्वतंत्र पाणी पुरवठा योजना असल्यास त्यातूनच गावकºयांना पाण्याचा पुरवठा होईल. त्यांना दुसºया साधनावर अवलंबून राहावे लागणार नाही.
यासाठी जिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा विभागातंर्गत पाणी पुरवठा योजना उभारण्याचे काम सुरू आहे. जिल्ह्यात ३२१ योजना तयार करण्यात आल्या आहेत.
या योजनांतून संपूर्ण गावाला पाण्याची सोय केली जाते. मात्र आजही जिल्ह्यातील नऊ पाणी पुरवठा योजना विद्युत जोडणी अभावी केवळ शोभेच्या ठरत आहेत. वीज नसल्यामुळे या योजनांतून पाणी पुरवठा होणे शक्य नाही.
दोन तीन महिन्यांवर उन्हाळा असल्याने या योजना कार्यान्वीत करणे गरजेचे आहे. मात्र त्यांना कधी वीज जोडणी मिळते, यावर सर्व काही अवलंबून आहे. तोपर्यंत या गावातील नागरिकांची पाण्यासाठी भटकंती कायम राहणार आहे.
उन्हाळ्यापूर्वी वीज जोडणीची गरज
वीज जोडणी अभावी बंद असलेल्या योजनांत गोंदिया तालुक्यातील तीन, तिरोडा तालुक्यातील एक, आमगाव तालुक्यातील दोन तर सालकेसा तालुक्यातील तीन तीन योजनांचा समावेश आहे. उन्हाळा सुरू होण्यास दोन महिन्यांचा कालावधी शिल्लक असला तरी यंदा पाण्याची टंचाई समस्या गंभीर असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे नळ योजनाच आधार देणार आहे. बंद असलेल्या योजनांना उन्हाळ््यापूर्वीच वीज जोडणी देणे गरजेचे आहे. अन्यथा ग्रामीण भागात पाणी पेटण्याची शक्यता आहे.