८ हजार शेतकऱ्यांना कर्जमाफीची प्रतीक्षाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 3, 2017 12:18 AM2017-12-03T00:18:51+5:302017-12-03T00:19:38+5:30

शेतकरी कर्जमाफीची घोषणा होवून चार महिन्याचा कालावधी लोटला तरी यातील घोळ अद्यापही संपलेला नाही. गोंदिया जिल्ह्यातील १९ हजार ग्रीन यादीतील शेतकऱ्यांची यादी बँकाना प्राप्त झाली.

Waiting for debt relief for 8 thousand farmers | ८ हजार शेतकऱ्यांना कर्जमाफीची प्रतीक्षाच

८ हजार शेतकऱ्यांना कर्जमाफीची प्रतीक्षाच

googlenewsNext
ठळक मुद्दे९२ शेतकऱ्यांचे पैसे मागविले परत : कर्जमाफीचा घोळ कायम

अंकुश गुंडावार।
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : शेतकरी कर्जमाफीची घोषणा होवून चार महिन्याचा कालावधी लोटला तरी यातील घोळ अद्यापही संपलेला नाही. गोंदिया जिल्ह्यातील १९ हजार ग्रीन यादीतील शेतकऱ्यांची यादी बँकाना प्राप्त झाली. मात्र त्यापैकी केवळ ११ हजार शेतकऱ्यांच्या बँक खात्यात रक्कम झाली असून ८ हजार शेतकऱ्यांना बँकानी अद्यापही प्रतीक्षेत ठेवले आहे.
राज्य सरकारने छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतंर्गत कर्जमाफीची घोषणा केली. यातंर्गत जिल्ह्यातील ७३ हजार शेतकरी प्राथमिक स्वरुपात कर्जमाफीस पात्र ठरले होते. मात्र त्यानंतर शासनाने कर्जमाफीचा लाभ बोगस लाभार्थ्यांना मिळू नये, यासाठी चावडी वाचन आणि कर्जमाफीच्या याद्यांची पडताळणी करण्यासाठी ग्रीन, येलो आणि रेड याद्यांचा निकष लावला. मात्र यानंतरही बऱ्याच शेतकऱ्यांचे आधार क्रमांक आणि बँक खाते क्रमांक जुळत नसल्याने यातील घोळ वाढला. परिणामी कर्जमाफीची घोषणा होवून चार महिन्याचा कालावधी लोटला तरी कर्जमाफीची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेली नाही. याद्यांमधील घोळ टाळण्यासाठी मुंबई येथील आयटी विभागाची मदत घेण्यात आली. मात्र या विभागाने कर्जमाफीच्या प्रक्रियेतील गुंता अधिक वाढविल्याचे चित्र आहे. जिल्ह्यातील एकूण कर्जमाफीकरिता पात्र ठरलेल्या ७३ हजार शेतकऱ्यांपैकी शासनाने २६८० ग्रीन यादीतील शेतकऱ्यांची यादी व त्यासाठी १० कोटी ४२ लाख २९ हजार ३३७ रुपयांचा निधी जिल्हा बँकेला उपलब्ध करुन दिला. त्यानंतर पुन्हा १६ हजार ५३६ ग्रीन यादीतील शेतकऱ्यांची दुसरी यादी व ५९ कोटी २६ लाख १५ हजार ५१२ रुपयांचा निधी जिल्हा बँकेला उपलब्ध करुन दिला. एकूण १९ हजार ३३४ शेतकऱ्यांपैकी शनिवार (दि.२) पर्यंत ११ हजार ७१९ शेतकऱ्यांच्या बँक खात्यात कर्जमाफीची रक्कम जमा करण्यात आली. तर ग्रीन यादीतील ८ हजार शेतकºयांना अद्यापही रक्कम जमा होण्याची प्रतीक्षाच आहे.
त्या शेतकऱ्याची रक्कम परत मागविली
मुंबई आयटी विभाग आणि शासनाने जिल्ह्यातील ग्रीेन यादीतील शेतकऱ्याची यादी जिल्हा बँकेला पाठविली. त्यासाठी निधी देखील उपलब्ध करुन दिला होता. मात्र दोन दिवसांपूर्वीच शासनाने ग्रीन यादीतील त्या ९२ शेतकऱ्याच्या बँक खात्यावर रक्कम जमा न करण्याचे निर्देश जिल्हा बँकेला दिले. तसेच ३४ लाख १३ हजार ४२८ रुपयांची रक्कम सुध्दा शासनाने परत मागविल्याची माहिती जिल्हा बँकेच्या सूत्रांनी दिली.
आता बँक स्तरावर खाते तपासणी मोहीम
शेतकरी कर्जमाफीवरुन राज्य सरकार दररोज एक नवीन निकष लावत आहे. आयटी विभागाची मदत घेऊन देखील कर्जमाफीच्या याद्यांमधील घोळ संपलेल्या नाही. त्यामुळे आता शनिवार (दि.२) पासून ग्रीन यादीतील शेतकºयांचे बँक खाते आणि आधार क्रमांक तपासणीची मोहीम सुरू केली आहे.
तिसरी यादी येणार मंगळवारी
कर्जमाफीकरिता पात्र ठरलेल्या ग्रीन यादीतील शेतकऱ्यांची तिसरी यादी मंगळवारी (दि.५) रोजी येण्याची शक्यता आहे. मात्र बँकाना आधी प्राप्त झालेल्या याद्यांमधील ८ हजार शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर अद्यापही रक्कम जमा झालेली नाही. तर तिसऱ्या यादीतील रक्कम केव्हा जमा होणार असा सवाल उपस्थित केला जात आहे. तर या सर्व प्रक्रियेमुळे बँकेचे कर्मचारी तणावात असल्याचे चित्र आहे.
शेतकऱ्यांची पायपीट कायम
कर्जमाफीची घोषणा होवून चार महिन्याचा कालावधी लोटला. मात्र अद्यापही कर्जमाफीची रक्कम बहुतेक शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झालेली नाही. जोपर्यंत खाते शून्य होत नाही तोपर्यंत शेतकऱ्यांना नवीन कर्जाची उचल करता येत नाही. यंदा जिल्ह्यात दुष्काळी स्थिती असल्याने उन्हाळी पिकांच्या लागवडीसाठी शेतकऱ्यांना पैशाची गरज आहे. मात्र बँकेच्या किचकट प्रक्रियेमुळे शेतकऱ्यांना बँकेच्या पायºया झिजवाव्या लागत आहेत.

Web Title: Waiting for debt relief for 8 thousand farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Farmerशेतकरी