विषयी समिती सभापती खाते वाटपाला कुणाच्या आदेशाची प्रतीक्षा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2022 05:00 AM2022-05-27T05:00:00+5:302022-05-27T05:00:11+5:30

भाजपने जिल्हा परिषदेत सत्ता स्थापन करताना राष्ट्रवादी काँग्रेस आणि अपक्षांना सोबत घेतले. त्यांच्यात ठरल्यानुसार अपक्षाला एक आणि राष्ट्रवादी काँग्रेसला दोन सभापतीपदे मिळणार आहेत. अर्थ व बांधकाम सभापतीपद भाजप स्वत:कडे ठेवणार आहे, तर शिक्षण व आरोग्य आणि कृषी व पशुसंवर्धन सभापती पदांपैकी राष्ट्रवादी काँग्रेसला कोणते आणि अपक्ष सदस्याला कोणते खाते द्यायचे, यावर अद्यापही भाजपचे नेते कुठल्याही निर्णयावर पोहोचले नसल्याची माहिती आहे. 

Waiting for someone's order to distribute the account of the committee chairperson! | विषयी समिती सभापती खाते वाटपाला कुणाच्या आदेशाची प्रतीक्षा !

विषयी समिती सभापती खाते वाटपाला कुणाच्या आदेशाची प्रतीक्षा !

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : जिल्हा परिषद विषयी समिती सभापतीपदाची निवडणूक २३ मे रोजी पार पडली. खरेतर त्याचदिवशी किंवा दुसऱ्या दिवशी सभापती म्हणूृन निवड झालेल्या पदाधिकाऱ्यांना खाते वाटप होणे अपेक्षित आहे. शिवाय नियमात तशी तरतूद आहे. पण पाच दिवसांचा कालावधी लोटूनही सभापतींना खाते वाटप करण्यात आलेले नाही. त्यामुळे खाते वाटप करण्यासाठी कुणाच्या आदेशाची प्रतीक्षा केली जात आहे, हे कळण्यास मार्ग नाही. 
जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्षांची निवडणूक १० मे रोजी पार पडली. त्यानंतर तेरा दिवसांनी जिल्हा परिषद विषय समिती  सभापतीपदाची निवडणूक घेण्यात आली. २३ मे रोजी समाजकल्याण आणि महिला बालकल्याण सभापतीपदाचे खाते वाटप करण्यात आले. त्याचदिवशी अर्थ व बांधकाम, शिक्षण व आरोग्य आणि कृषी व पशुसंवर्धन पदांचेही खाते वाटप होणे  अपेक्षित होते. सभापतींना खाते वाटप हे अध्यक्ष करतात. त्यामुळे निवडणुकीच्या दुसऱ्या दिवशी खाते वाटप होईल, अशी  अपेक्षा होती. जिल्हा परिषदेच्या नियमानुसार सभापतींची  निवड झाल्यानंतर तातडीने खाते वाटप करावे लागते.  पण येथे खाते वाटप करण्यापासूनच ‘हम करे सो कायदा’ असे चित्र आहे. जिल्हा परिषदेत भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि अपक्षांनी एकत्र येत सत्ता स्थापन केली. त्यामुळे भाजपचा अध्यक्ष, तर राष्ट्रवादी काँग्रेसचा उपाध्यक्ष करण्यात आला. त्यानंतर सभापतीपदाच्या निवडणुकीत दोन सभापतीपदे भाजपला आणि एक अपक्ष आणि एक राष्ट्रवादी काँग्रेसला देण्यात आले. 
यापैकी समाजकल्याण सभापतीपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पूजा सेठ तर महिला व बालकल्याण सभापतीपदी सविता पुराम यांची निवड करण्यात आली. सभापतीपदी निवडून आलेले संजय टेंभरे आणि साेनू कुथे यांना अद्यापही खाते वाटप करण्यात आलेले नाही. खाते वाटप लांबण्याचे नेमके कारण काय, हे कळण्याससुद्धा मार्ग नाही. खाते वाटपावरून भाजप नेत्यांमध्ये अद्याप एकमत झाले नसल्याची चर्चा आहे. 

अर्थ व बांधकाम कुणाकडे ?
- भाजपने जिल्हा परिषदेत सत्ता स्थापन करताना राष्ट्रवादी काँग्रेस आणि अपक्षांना सोबत घेतले. त्यांच्यात ठरल्यानुसार अपक्षाला एक आणि राष्ट्रवादी काँग्रेसला दोन सभापतीपदे मिळणार आहेत. अर्थ व बांधकाम सभापतीपद भाजप स्वत:कडे ठेवणार आहे, तर शिक्षण व आरोग्य आणि कृषी व पशुसंवर्धन सभापती पदांपैकी राष्ट्रवादी काँग्रेसला कोणते आणि अपक्ष सदस्याला कोणते खाते द्यायचे, यावर अद्यापही भाजपचे नेते कुठल्याही निर्णयावर पोहोचले नसल्याची माहिती आहे. 

 सर्वसाधारण सभेपूर्वी खाते वाटप 

- जिल्हा परिषदेत सत्ता स्थापन झाल्यानंतर नवीन पदाधिकारी आणि सदस्यांची सर्वसाधारण सभा ७ जूनला होणार असल्याची माहिती आहे. या सभेच्या एक दिवस आधी सभापतींना खाते वाटप करण्यात येणार असल्याची माहिती आहे. मात्र, तोपर्यंत या सभापतींना बिनखात्याचे सभापती म्हणून काम पाहावे लागणार आहे. 
नाराज सदस्यांची मनधरणी कशी करणार ?
- जिल्हा परिषदेत सत्ता स्थापन करताना आणि अध्यक्ष आणि सभापतीपदी निवड करताना काही सदस्यांना हेतूपुरस्सर डावलल्याची चर्चा आहे. यामुळे भाजपचे काही सदस्य नाराज आहेत. त्यातच सभापतीपदाच्या निवडणुकीत अर्जुनी मोरगाव तालुक्याला डावलण्यात आल्याने याचीही सदस्यांमध्ये नाराजी आहे. त्यामुळे सदस्यांची ही नाराजी कशी दूर केली जाते, याकडे लक्ष लागले आहे.

 

Web Title: Waiting for someone's order to distribute the account of the committee chairperson!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.