सव्वा महिन्यापासून अनिल शस्त्रक्रियेच्या प्रतीक्षेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2018 12:49 AM2018-04-07T00:49:46+5:302018-04-07T00:49:46+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : ‘शासकीय काम आणि महिनाभर थांब’ या म्हणीचा आता शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात सुध्दा अनुभव येत आहे. गोरगरिबांचे रुग्णालय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या रुग्णालयात सुध्दा वेळीच उपचार केले जात नसल्याने गोरगरीब रुग्णांनी उपचारासाठी जायचे कुठे असा प्रश्न निर्माण झाला आहे. येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात तब्बल सव्वा महिन्यापासून भरती असलेल्या एका रुग्णावर अद्यापही शस्त्रक्रिया करण्यात आली नसल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
अनिल जयपाल मेश्राम (३५) रा. देवलगाव, ता. अर्जुनी मोरगाव असे सव्वा महिन्यापासून शस्त्रक्रियेच्या प्रतिक्षेत असलेल्या रुग्णाचे नाव आहे. प्राप्त माहितीनुसार १ जानेवारीला अनिल मेश्राम यांचा साकोलीजवळ अपघात झाला. या अपघातात त्यांच्या पायाचे हाड सरकले. यावर उपचार करण्यासाठी त्यांनी खासगी रुग्णालयात धाव घेतली. मात्र डॉक्टरांनी त्यांना शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला. आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने त्यांनी गोंदिया येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात धाव घेतली. त्यानंतर ते शस्त्रक्रिया करण्यासाठी २८ फेब्रुवारीला दाखल शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात झाले. मात्र येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांच्यावर शस्त्रक्रिया केली नाही. उलट त्यांच्यानंतर रुग्णालयात दाखल झालेल्या रुग्णावर शस्त्रक्रिया केली. त्यामुळे अनिल मेश्राम यांनी याची तक्रार शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे केली. पण त्यांनी सुध्दा याकडे दुर्लक्ष केले. तर एका डॉक्टरने त्यांना शस्त्रक्रियागृहात टेबल उपलब्ध नसल्याने शस्त्रक्रिया करण्यास विलंब होत असल्याचे सांगितले. जेव्हा की त्यांच्यानंतर दाखल झालेल्या रुग्णांवर याच शस्त्रक्रियागृहात शस्त्रक्रिया करण्यात आल्या.
येथील डॉक्टरांनी अनिलला दिलेले उत्तर सुध्दा तेवढेच मजेदार असून शासकीय रुग्णालयाच्या व्यवस्थेचे वाभाडे काढणारे आहे. मात्र शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील अनागोंदी कारभाराचा फटका अनिल सारख्या रुग्णांना सहन करावा लागत आहे. मागील सव्वा महिन्यापासून आज तरी आपल्यावर शस्त्रक्रिया होईल, या आशेवर अनिल आहे. शस्त्रक्रिया न केल्यामुळे त्यांना काही झाल्यास याची जबाबदारी कोण घेणार असा सवाल उपस्थित केला जात आहे.
वैद्यकीय अधिकाऱ्यांमध्ये समन्वयाचा अभाव
येथील शासकीय महाविद्यालयात आॅपरेशन थिएटरमध्ये सेवा देणाºया वैद्यकीय अधिकाºयांमध्ये समन्वय नसून त्याचा फटका रुग्णांना बसत आहे. काही डॉक्टर केवळ त्यांच्या मर्जीतील अथवा त्यांच्या रेफरंसने दाखल झालेल्या रुग्णांवरच शस्त्रक्रिया करतात. त्यामुळे अन्य डॉक्टरांना शस्त्रक्रियागृहात टेबल उपलब्ध होवू दिले जात नसल्याची माहिती आहे. त्याचाच फटका अनिल सारख्या रुग्णांना बसत आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील वार्ड क्रमांक ५ मध्ये बेड क्रमांक ४ वर अनिल भरती आहे.
अधिष्ठातांकडे तक्रार
मागील सव्वा महिन्यांपासून अनिल मेश्राम यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली नाही. त्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांनी याची तक्रार शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.रूखमोडे यांच्याकडे केली. मात्र यानंतर कुठलाच फरक पडला नाही. त्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांनी आता पुन्हा त्यांच्याकडे तक्रार केली. यासंदर्भात अधिष्ठाता डॉ.रुखमोडे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी अनिल मेश्राम यांच्यावर शस्त्रक्रिया करण्याचे निर्देश वार्ड प्रभारी डॉ.मरसकोल्हे यांना दिले असल्याचे लोकमतशी बोलताना सांगितले.