शेतकऱ्यांना दहाव्या ‘ग्रीन लिस्ट’ची प्रतीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2018 01:00 AM2018-06-20T01:00:30+5:302018-06-20T01:04:06+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : शासनाने शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतंर्गत कर्जमाफीची घोषणा केली. या अंतर्गत आत्तापर्यंत जिल्ह्यातील ६४ हजार शेतकऱ्यांचे कर्जमाफ करण्यात आले. मात्र कर्जमाफीस पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांपैकी अद्यापही १८ हजार शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर रक्कम जमा झाली नाही. तर दहावी ग्रीन यादी अजूनही बँकाना प्राप्त झाली नसल्याने खरीप हंगामात शेतकरी अडचणीत आले आहे.
मागील वर्षी निसर्गाने दगा दिल्याने राज्यातील शेतकरी अडचणीत आले होते. याचा फटका जिल्ह्यातील शेतकऱ्यांना बसला. पावसाअभावी हाती आलेले पीक गमवावे लागल्याने शेतकºयांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले. त्यामुळे बँकेतून उचल केलेल्या कर्जाची परतफेड करणे शेतकºयांना शक्य झाले नाही. संकटातील शेतकऱ्यांना मदतीचा हात देण्यासाठी शासनाने कर्जमाफीची घोषणा केली. कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांचे आॅनलाईन अर्ज मागविण्यात आले होते. यात जिल्ह्यातील ८२ हजार शेतकऱ्यांनी अर्ज केले होते. मात्र आॅनलाईन प्रक्रियेमुळे अनेक शेतकऱ्यांचे अर्ज अपात्र ठरले. तसेच अर्जातील माहिती आणि बँकाची माहिती न जुळल्याने पेच निर्माण झाला. परिणामी कर्जमाफीची प्रक्रिया लांबली. कर्जमाफीचा घोळ संपत नसल्याने शासनाकडून तारीख पे तारीख दिली जात आहे. शासनाने आतापर्यंत ९ ग्रीन याद्या बँकाना पाठविल्या असून त्यातील ६४ हजार शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ देण्यात आला. मात्र अद्यापही दहावी ग्रीन यादी आली नसल्याने यातील १८ हजार शेतकरी कर्जमाफीपासून वंचित आहे. सध्या खरीप हंगामाला सुरूवात झाली असून शेतकरी शेतीच्या कामात व्यस्त आहे. मात्र खरीपात पेरणी व इतर कामे करण्यासाठी पैशाची गरज असल्याने शेतकरी पीक कर्जाची उचल करण्यासाठी बँकेच्या पायºया झिजवित आहे. मात्र बँकेचे अधिकारी यादी आली नसल्याचे सांगून शेतकºयांना आल्या पावलीच परत पाठवित आहे. जिल्ह्यातील ६४ हजार शेतकºयांच्या बँक खात्यावर आत्तापर्यत १८८ कोटी रुपये जमा करण्यात आले आहे. तर उर्वरित १८ हजार शेतकºयांना अद्यापही पैसे जमा होण्याची प्रतीक्षा आहे.