अडीच हजारावर शेतकरी कृषीपंपासाठी वेटिंगवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2018 12:56 AM2018-06-21T00:56:30+5:302018-06-21T00:56:30+5:30
राज्यात सत्तारुढ सरकारने कृषीपंपासाठी अर्ज करणाऱ्या शेतकऱ्यांना त्वरित वीज जोडणी करून देण्यात येईल. एकही शेतकरी कृषीपंपाच्या जोडणीपासून वंचित राहणार नाही, असा दावा केला होता.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : राज्यात सत्तारुढ सरकारने कृषीपंपासाठी अर्ज करणाऱ्या शेतकऱ्यांना त्वरित वीज जोडणी करून देण्यात येईल. एकही शेतकरी कृषीपंपाच्या जोडणीपासून वंचित राहणार नाही, असा दावा केला होता. मात्र हा दावा पूर्णपणे फोल ठरला असून जिल्ह्यातील २८२० शेतकरी मागील मागील दीड वर्षांपासून कृषीपंपाच्या जोडणीसाठी विद्युत वितरण कंपनीच्या पायऱ्या झिजवित असल्याचे चित्र आहे.
सिंचनाअभावी शेतकºयांच्या डोक्यावर कर्जाचे डोंगर वाढत आहे. शेतकºयांना विहीर देण्यासाठी शासन तत्पर आहे. परंतु या विहिरीतील पाणी शेतपिकांना देण्यासाठी विद्युत कनेक्शन देण्यास विद्युत वितरण कंपनी अपयशी ठरली आहे. धान हेच जिल्ह्यातील मुख्य पीक असल्याने शेतकºयांची आर्थिक परिस्थिती धानपिकावरच अवलंबून आहे.धानाला मोठ्या प्रमाणात पाणी लागते. मागील दोन-तीन वर्षापासून दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकरी कर्जाच्या खाईत जात आहे. दरवर्षी कर्ज घेऊन चांगल्या उत्पन्नाचे स्वप्न रंगविणाऱ्या शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच येत आहे. घेतलेल्या कर्जाची परतफेड करणे त्यांना शक्य होत नसल्याचे चित्र आहे. पाण्याअभावी शेतपीक वाया जात आहे. तर उन्हाळी पिकांची लगावड करण्याचे स्वप्न यंदा केवळ स्वप्नच राहिले.
जिल्ह्यातील तीन हजाराच्या घरात शेतकऱ्यांनी कृषीपंपाकरीता विद्युत वितरण विभागाकडे अर्ज करुन कृषीपंपासाठी वीज कनेक्शन मागीतले. परंतु मागील दीड वर्षापासून डिमांड भरलेल्या शेतकऱ्यांना अद्यापही वीज जोडणी करुन देण्यात आली नाही. पाण्याअभावी शेतकऱ्यांचे पीक वाया गेले.
गोंदिया तालुक्यातील ४९३, गोरेगाव तालुक्यातील ४३४, तिरोडा ४५६, आमगाव १४८, सालेकसा २३७, देवरी २३३, सडक-अर्जुनी ३१२, अर्जुनी-मोरगाव ५०७ अशा एकूण शेतकऱ्यांनी विद्युत कनेक्शनकरीता डिमांड भरले आहेत. परंतु त्यांना विद्युत वितरण कंपनीने कनेक्शन दिले नाही. त्यामुळे वीज जोडणी केव्हा करुन मिळणार यासाठी शेतकरी विद्युत वितरण कंपनीच्या पायºया झिजवित आहेत.
टेंडरच्या नावावर टाळाटाळ
शेतकºयांना विद्युत कनेक्शन देण्यासाठी मागील दीड वर्षापासून टाळाटाळ केली जात आहे. कृषीपंपाचे कनेक्शन देण्यासाठी कंत्राट देण्याची टेंडर प्रक्रिया सुरु असल्याचे सर्व शेतकºयांना सांगून मागील वर्षभरापासून एकच पाढा विद्युत वितरण कंपनी वाचत आहे. टेंडर प्रक्रिया सुरु असल्याच्या नावावर शेतकºयांची दिशाभूल केली जात असल्याचा शेतकºयांचा आरोप आहे.