शस्त्रक्रियेत वानखेडे राज्यात प्रथमच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2017 09:45 PM2017-11-19T21:45:14+5:302017-11-19T21:45:57+5:30
केंद्र सरकारच्या आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या वतीने कुटुंब कल्याणात पुरूषांचा सहभाग वाढविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : केंद्र सरकारच्या आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या वतीने कुटुंब कल्याणात पुरूषांचा सहभाग वाढविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. यात महाराष्ट्रातून सर्वात जास्त शस्त्रक्रिया करणारे डॉक्टर म्हणून पुन्हा सातगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉ. विजय वानखेडे यांचे नाव पुढे आले आहे. मागच्या वर्षीही ते राज्यात प्रथम क्रमांकावरच होते. त्यांचा दिल्ली येथील दि पार्क हॉटेलमध्ये गुरूवारी (दि.१६) रोजी सत्कार करण्यात आला.
आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय भारत सरकारच्या सचिव डॉ. वंदना गुरूनानी, कुटुंब कल्याणचे आयुक्त डॉ. एस.के. सिकंदर यांच्या हस्ते डॉ. वानखेडे यांना गौरविण्यात आले. सन २०१५-१६ व सन २०१६-१६ या दोन्ही वर्षात वानखेडे महाराष्टÑातून सर्वात जास्त शस्त्रक्रिया करणारे डॉक्टर ठरले. आतापर्यंत त्यांनी ११ हजार ४४८ महिला तर ३ हजार २७ पुरूषांच्या अश्या एकूण १४ हजार ५१७ नसबंदी शस्त्रक्रिया केल्या आहेत. डॉ. विजय वानखेडे यांना गौरविले त्यावेळी महाराष्टÑ शासनाचे कुटुंब कल्याणचे सहाय्यक संचालक डॉ.एन.डी. देशमुख, गडचिरोलीचे माता व बाल संगोपन अधिकारी डॉ. सुनील मडावी उपस्थित होते.