वैर संपले, झाली पैशाची बचत
By admin | Published: December 27, 2015 02:14 AM2015-12-27T02:14:23+5:302015-12-27T02:14:23+5:30
जर, जोरू, जमीन बरोबर दारूमुळे वाढणाऱ्या क्षुल्लक वादाचे पर्यावसान मोठ्या वादात होत होते.
तंटामुक्त मोहिमेमुळे फायदा : भांडणांचे प्रमाण झाले कमी, पोलिसांचा ताण हलका
गोंदिया : जर, जोरू, जमीन बरोबर दारूमुळे वाढणाऱ्या क्षुल्लक वादाचे पर्यावसान मोठ्या वादात होत होते. परंतु महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीने या झालेल्या गुन्ह्यांना सोडवून पुढे गुन्हे घडू नये यासाठी गावात जनजागृती केली. परिणामी ज्या गावातून वर्षातून ५० तक्रारी पोलीस ठाण्यात जात होत्या, त्या गावातून आता पाच तक्रारी पोलीस ठाण्यापर्यंत जात नाही. यामुळे दोन्ही पक्षाचा वेळ व पैसा वाचला. तसेच शासनाच्या पैशाचीही बचत झाली.
महाराष्ट्र शासनाने गावातील तंटे गावातच सामोपचाराने सोडविण्यासाठी १५ आॅगस्ट २००७ पासून राज्यात महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम अंमलात आणली. या मोहिमेसाठी शासनाने निकष ठरवून दिले. या मोहिमेतील निकष पूर्ण करणाऱ्या गावांना शासनाने लोकसंख्येच्या आधारावर रोख रक्कम पुरस्कार म्हणून दिली. या पुरस्कार रकमेतून गावाच्या विकासावर पैसा खर्च करण्यात आला. परंतु तंटामुक्त गावे वादग्रस्त तर नाहीत याचा आढावा घेण्याची शोधमोहीम महाराष्ट्र शासनाने सुरू केली आहे. यासंदर्भात ३ जानेवारी २०१४ ला महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षकांना पत्र पाठवून तंटामुक्त गावातील किती गुन्हे पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचले याचा अहवाल मागीतला आहे. तंटामुक्त गावात घडलेले तंटे, त्यांची संख्या, त्यांचे स्वरुप व त्या गावात नेहमीच तंटे होतात का याची माहिती मागविली आहे. तंटामुक्त झालेल्या गावातील लोकांचा राहणीमानाचा दर्जा तेथील लोकसंख्या व गावातील तंटे सोडविण्यासाठी तंटामुक्त समितीने घेतलेला पुढाकार तसेच नवीन तंटे उद्भवू नये यासाठी तंटामुक्त समित्यांनी केलेले प्रयत्न याची इतंभूत माहिती शासनाने मागविली आहे. या माहितीत तंटामुक्त मोहमेमुळे लोकांच्या राहणीमानात सुधार झाला. शासनाने पुरस्कारच्या स्वरूपात दिलेले पैसे गावाच्या विकासावर खर्च करण्यात आले.
तंट्यासाठी लागणाऱ्या पैश्याची बचत झाली. आपसी गैरसमज समझोत्यातून दूर करण्यात तंटामुक्त समितीला यश आले. (तालुका प्रतिनिधी)
दर तीन वर्षाने प्रोत्साहन पुरस्कार द्या
गोंदिया जिल्ह्यात सन २००७-०८ मध्ये ५६ गावे, २००८-०९ मध्ये २६२ गावे, २००९-१० मध्ये २०५ गावे तर २०१०-११ मध्ये ३३ गावे तंटामुक्त झाली. अवघ्या चार वर्षात गोंदिया जिल्हा राज्यात प्रथम तंटामुक्त जिल्हा म्हणून पुढे आला. या मोहीमेत पुरस्कार प्राप्त गावे, गावात तंटे उद्भवणार नाही याकडे किती लक्ष घालतात याचा लेखाजोखा शासनाने मागीतला आहे. राज्यातील ३५ जिल्ह्यातून आलेल्या माहितीच्या आधारावर तंटामुक्त मोहिमेने किती गावांचा विकास झाला, किती तंटामुक्त गावे शांततेच्या मार्गावर आहे. याची माहिती शासनाला समजली. तंटामुक्त गावातील समित्यांना नेहमी प्रोत्साहन देण्यासाठी शासनाने तंटामुक्त गावाचे दर तीन वर्षाने पुनर्मूल्यांकन करून त्या गावांना प्रोत्साहन राशी देण्याचे ठरवावे. त्यामुळे शासनाचे कोट्यवधी रूपये बचत होतील.
१४ कोटी पुरस्कारातून आमूलाग्र बदल
जिल्ह्यात ५५६ ग्राम पंचायत आहेत. यातील ११४ ग्राम पंचायती नक्षलदृष्ट्या अतिसंवेदनशील भागात आहेत. नक्षलग्रस्त भागात शासनाच्या योजनांना प्रतिसाद मिळत नाही. मात्र तंटामुक्त मोहीमेला नक्षलग्रस्त भागातही लोकचळवळ प्राप्त झाली. तंटामुक्त गावे आपल्या गावात जातीय सलोखा राबवित आहेत. या ५५६ गावांना तंटामुक्त बक्षिसापोटी १४ कोटी सात लाख रूपये मिळाले आहेत. या पैश्यातून गावाचा व नक्षलग्रस्त भागात आमूलाग्र बदल झाला आहे. नक्षलवाद्यांचे समर्थक असलेले काही लोक आता पोलिसांचे खबरी झाले आहेत.