वॉर्डवासीयांची तहान भागविली
By admin | Published: May 13, 2017 01:32 AM2017-05-13T01:32:03+5:302017-05-13T01:32:03+5:30
आठवडाभरापासून वॉर्डांत पेटलेल्या पाणी टंचाईवर मात करण्यासाठी नगर पंचायत व महावितरणने
महावितरण व नगर पंचायतचा पुढाकार : बोअरवेलसाठी लगेच वीजजोडणी
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : आठवडाभरापासून वॉर्डांत पेटलेल्या पाणी टंचाईवर मात करण्यासाठी नगर पंचायत व महावितरणने संयुक्तरीत्या कृती करून वॉर्डातील पाण्याचा प्रश्न सोडविला. नगर पंचायतने दोन बोअरवेलचे खोदकाम केले तर महावितरणने लगेच त्याला वीज जोडणी देऊन पाण्याची समस्या सोडविली. सडक-अर्जुनी येथील हे कार्य असून एकत्र मिळून केलेल्या कामातून सुमारे तीन हजार वॉर्डवासीयांची तहान भागविण्यात यश आले आहे.
उन्हाळा म्हटला की पाण्याची समस्या भेडसावते. सडक-अर्जुनी शहरातील वॉर्ड क्रमांक ४ व ६ मध्ये यंदा हीच समस्या उभी झाली. मिळालेल्या माहितीनुसार, उमरझरी तलावातील पाणी बंद झाल्याने या वॉर्डात मागील आठवडाभरापासून पाणी टंचाई निर्माण झाली होती. यामुळे वॉर्डांतील सुमारे तीन हजार नागरिकांची पाण्यासाठी भटकंती सुरू होती. हा प्रकार महावितरणचे अभियंता राहुल पाटील यांच्या लक्षात आल्याने त्यांनी ७ मे रोजी नगराध्यक्ष रिता लांजेवार, उपाध्यक्ष महेंद्र मसराम, तहसीलदार विठ्ठल परळीकर, नगर पंचायत मुख्याधिकारी संतोष चिट्टेवार यांच्यासह नगर पंचायतमधील समस्त सभापती व सदस्यांची बैठक बोलाविली.
या बैठकीत अभियंता पाटील यांनी पाणी टंचाई असलेल्या वॉर्डात नगर पंचायतने बोअरवेल खोदकाम केल्यास त्वरित जोडणी देत पाणी पुरवठा करून पाणी टंचाईच्या समस्येवर तोडगा काढता येणार असल्याचे सांगितले. यावर नगर पंचायतच्या पदाधिकारी व सदस्यांनीही होकार देत नागरिकांची तहान भागविण्यासाठी लगेच कृती करण्याची तयारी दर्शविली. यावर ८ मे रोजी दोन्ही वॉर्डांत नगर पंचायतने बोअरवेलचे लगेच खोदकाम करवून घेतले. तसेच वीज जोडणीसाठी लागणाऱ्या आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करीत सायंकाळी ५ वाजता अर्ज सादर केला.
अभियंता पाटील यांनी अर्ज आल्यावर लगेच वीज मीटरसाठी डिमांड तयार करून दिली. तर नगर पंचायतकडून ९ मे रोजी डिमांड भरण्यात आली असतानाच लगेच मीटर जोडणी करण्यात आली. दोन्ही बोअरवेलला वीज जोडणी मिळाल्याने लगेच पाणी पुरवठा सुरू करून दोन्ही वॉर्डांतील पाण्याचा प्रश्न सोडविण्यात आला.
नगर पंचायतने प्रश्न गांभीर्याने घेत बोअरवेलचे लगेच खोदकाम करवून दिले. तर महावितरणने काही वेळातच वीज जोडणी दिल्याने तीन हजार वॉर्डवासीयांची तहान भागविण्यात यश आले. अन्यथा पाणी टंचाईने गंभीर रूप घेतले असते.
संयुक्त कृतीचे फलीत
बहुतांश शासकीय कामकाजात संयुक्त कार्याचा अभाव दिसून येतो. एका विभागाकडून दुसऱ्या विभागावर कामे टोलवली जातात. अशात मात्र जनता किंवा एखादी व्यक्ती कार्यालयाच्या चकरा मारत थकून जाते. येथे मात्र नगर पंचायत व महावितरण या दोन्ही विभागांनी पाणी टंचाईचा प्रश्न गांभीर्याने घेत संयुक्त कृती केली. नगर पंचायतने लगेच बोअरवेल केले नसते तर महावितरणकडून वीज जोडणी देण्याचा प्रश्नच येत नव्हता. मात्र या कार्यातून दोन्ही हात मिळून कार्य करीत असल्यास ते काम नक्कीच फत्ते होते, हे दिसून आले.