सावधान कोरोना फोफावण्याचे संकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2021 04:18 AM2021-02-19T04:18:54+5:302021-02-19T04:18:54+5:30
केशोरी : गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यातील कोरोना रुग्णांचा आकडा कमी झाला, ही बाब आनंदाची असली तरी कोरोना विषाणू महामारीच्या ...
केशोरी : गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यातील कोरोना रुग्णांचा आकडा कमी झाला, ही बाब आनंदाची असली तरी कोरोना विषाणू महामारीच्या संसर्गाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. कोरोनाचा संसर्ग केव्हाही फोफावू शकतो याचे संकेत केंद्रीय आरोग्य समितीने दिले आहेत. मात्र, याकडे नागरिकांचे मुळीच लक्ष नसून ते बिनधास्त वावरत आहेत. यावर एकच उपाय असून तो म्हणजे, शासनाने कोरोनाविषयी घालून दिलेले नियम मोडणाऱ्या लोकांवर कार्यवाही म्हणून दंडाची वसुली ठाणेदार संदीप इंगळे यांच्या मार्गदर्शनात पोलीस पथकाने सुरू केली आहे.
फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीपासून जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या सातत्याने घटत असली तरी काही दिवशी १-२ तर काही दिवशी एकही रुग्ण आढळत नसल्याचे आरोग्य विभागाच्या माहितीवरून समजते. ही जिल्हावासियांसाठी आनंदाची बाब असली तरी अजूनही आपला अर्जुनी-मोरगाव तालुका ग्रीन झोनमध्ये आलेला नाही. त्यामुळे कोरोना केव्हा डोके वर काढेल याची काही निश्चितता नाही. कोरोना संसर्गाचा धोका घालवण्यासाठी प्रत्येकाने सावध राहण्याची गरज आहे. यासंदर्भात असावध राहणे केव्हाही अंगावर येवू शकते. बाजारपेठ, लग्नसमारंभ, सार्वजनिक स्थळी सध्या विनाकारण गर्दी होत असल्याचे दिसून येत आहे. त्यामध्ये कुठेही फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन केले जात नाही. अनेक नागरिक मास्क लावल्याचे दिसून येत नाही. त्यामुळे कोरोना केव्हा आणि कधी फोफावेल हे सांगता येत नाही.
अजूनही केशोरी परिसरातील अनेक गावांतील नागरिक कोरोना संसर्ग होत नाही, अशा आविर्भावात वावरताना दिसत आहेत. नागरिकांनी असाच बेजबाबदारपणा कायम ठेवला तर पुन्हा कोरोनाचा प्रभाव वाढण्यास वेळ लागणार नाही. हेच हेरून येथील ठाणेदार संदीप इंगळे यांनी मास्क न लावणाऱ्यांवर कार्यवाही करणे सुरू करुन तसे पोलीस पथक तयार केले आहे. कोरोना विषाणू प्रतिबंधात्मक दंडाची आकारणी करून पावती देणे सुरू केले आहे. यासाठी नागरिकांनी सावध होणे गरजेचे आहे.