टोमॅटो लावून चूक झाली? मागणीच्या तुलनेत पुरवठा अधिक झाल्याने पडली किंमत
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2025 16:05 IST2025-02-15T16:04:49+5:302025-02-15T16:05:54+5:30
वाहतुकीचा खर्चसुद्धा निधेना : गोंदियात आवक वाढली

Was it a mistake to plant tomatoes? The price fell due to more supply than demand.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : फेब्रुवारी महिन्याला सुरुवात होताच टोमॅटोचे दर उतरण्यास सुरुवात झाली. आता तर दहा रुपयांना दीड किलो टोमॅटो विकले जात आहेत. शेतकऱ्याचा लावणीचा खर्चसुद्धा निघणे कठीण झाले आहे. फेब्रुवारी महिन्यात सर्वाधिक भाजीपाला पिकाची लागवड केली जाते. शेतकऱ्यांकडे सिंचनाची सुविधा होण्यास सुरुवात झाली असल्याने भाजीपाला पिकाखालील क्षेत्रसुद्धा वाढत चालले आहे.
जिल्ह्यात उत्पादित होणारा भाजीपाला व नागपूर येथील मुख्य बाजारपेठेतून येणारा भाजीपाला यामुळे भाजीपाल्याची आवक वाढून टोमॅटोसह इतर भाजीपाल्याचे दर प्रचंड प्रमाणात घटले आहेत. ऑक्टोबर महिन्यात ४० रुपये पाव दराने विकल्या जाणारा सांभार, मेथी, पालक आता १० रुपयांना एक पावाची जुडी विकली जात आहे. टोमॅटो तर दहा रुपयांना किलोभर किंवा सायंकाळी दहा रुपयांना दीड किलो दिले जात आहेत. घरी परत नेण्यापेक्षा मिळेल त्या भावाला टोमॅटोची विक्री केली जात आहे. शेवटी असलेले कमी दर्जाचे टोमॅटो त्या ठिकाणी ठेवून शेतकरी गावाला निघून जात आहेत. दुसऱ्या दिवशी याच टोमॅटोवर मोकाट जनावरे ताव मारत असल्याचे चित्र दिसून येते. भाव वाढ होण्याची प्रतीक्षा शेतकरीवर्ग उराशी बाळगून आहेत.
१०० हेक्टरवर भाजीपाल्याची लागवड
१०० हेक्टर क्षेत्रावर भाजीपाल्यासह टोमॅटोची लागवड करण्यात आली आहे. मोठ्या प्रमाणात टोमॅटोचे उत्पादन झाल्याने भाव कमी झाले आहेत.
तोडणी, वाहतुकीचे वांदे!
ग्रामीण भागात मजूर मिळणे कठीण झाले आहे. त्यामुळे टोमॅटो तोडणीसाठी शेतकऱ्यांना अडचण जात आहे.
१० रुपये दीड किलो दराने बाजारात विकतोय टमाटर
आठवडी बाजारात सायंकाळच्या सुमारास १० रुपयांना दीड किलो एवढ्या कमी दराने टोमॅटो विकले जात आहेत. भाव कमी असल्याने व्यापारीवर्गालाही यातून अतिशय कमी प्रमाणात नफा मिळत आहे. त्यामुळे ते विक्रीस फारसे तयार नाहीत.
उत्पादन वाढले, मात्र कवडीमोल भावाने विक्री
टोमॅटोसह इतर पालेभाज्यांचे दर अतिशय कमी झाले आहेत. दारात दहा रुपयांचा भाव ग्राहकांच्या दारात केवळ १० रुपये किलो दराने टोमॅटो विकले जात आहेत. शेतकरी २० ते ३० किमी अंतरावरून दुचाकीने टोमॅटो आणतात. त्यांचा वाहतूक खर्चसुद्धा निघत नसल्याचे दिसून येत आहे. टमाटरचे उत्पादन मोठा पैसा कमवून देईल अशी अपेक्षा असल्यामुळे शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात टोमॅटोची लागवड केली. परंतु मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी एकाच वेळी ही लागवड केल्यामुळे मागणी कमी आणि पुरवठा अधिक असल्यामुळे कवडीमोल भावाने विक्री होत आहे.
भाव कशामुळे आपटला ?
फेब्रुवारी महिन्यात टोमॅटोचे प्रचंड प्रमाणात उत्पादन झाले आहे. त्यामुळे टोमॅटोचा भाव आपटला आहे. जिल्ह्यातील प्रत्येक आठवडी बाजारात मोठ्या प्रमाणात टोमॅटोची आवक वाढली असल्याचे दिसून येत आहे.
वैशाली वाणाची लागवड, मागणी जास्त
टोमॅटोच्या अनेक संकरीत जाती आहेत. त्यापैकी टोमॅटोची लागवड सर्वाधिक केली जाते. या वाणाचे टोमॅटो ग्राहकांचे लक्ष वेधून घेते. या टोमॅटोची वरची साल जाड राहत असल्याने ते जास्त दिवस टिकून राहते, तसेच वाहतुकीदरम्यान, सदर टोमॅटो अतिशय कमी प्रमाणात फुटतात. त्यामुळे या टोमॅटोची लागवड वाढली आहे.
टोमॅटो ८० ला टच झाला होता!
ऑक्टोबर महिन्यात टोमॅटोचे भाव ८० रुपयांपर्यंत पोहोचले होते. टोमॅटो स्वयंपाक घरातील अविभाज्य घटक बनला आहे. त्यामुळे कितीही दर असला तरी टोमॅटोची खरेदी करावीच लागते. परिणामी बजेट वाढते.
"ठोक स्वरूपात कमी दरात टोमॅटो उपलब्ध होत असल्याने कमी दरानेच विकल्या जात आहेत."
- प्रेमानंद पाथोडे, भाजीपाला विक्रेता
"टोमॅटोचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळे चांगला भाव मिळून नफा मिळेल, अशी अपेक्षा होती. भाव गळगळले असल्याने काहीच नफा मिळत नाही."
- संजय देशकर, भाजीपाला विक्रेता