धो-धो बरसला ...
By Admin | Published: August 3, 2016 12:06 AM2016-08-03T00:06:09+5:302016-08-03T00:06:09+5:30
पंधरवड्यापासून दडी मारून बसलेल्या पावसाने सोमवारपासून (दि.१) दमदार हजेरी लावली.
सालेकसात सर्वाधिक पाऊस
गोंदिया : पंधरवड्यापासून दडी मारून बसलेल्या पावसाने सोमवारपासून (दि.१) दमदार हजेरी लावली. मात्र मंगळवारच्या (दि.२) पावसाने जिल्हावासीयांना खुश करून टाकले. या पावसामुळे शेतकरी खुश झाला असून शेतीची कामे पुन्हा सुरू झाली आहेत. विशेष म्हणजे सालेकसा तालुक्यात सर्वाधीक पाऊस बरसला असून काही रस्ते बंद पडले.
सोमवारी दमदार हजेरी लावून पाऊस जिल्ह्यात परतून आला. मात्र मंगळवारी सकाळपासूनच पावसाने जिल्ह्याला झोडपण्यास सुरूवात केली. या पावसामुळे जिल्ह्यात सर्वत्र पाणीच पाणी झाले आहे. मंगळवारी (दि.२) सकाळी ८ वाजतापर्यंत घेण्यात आलेल्या आकडेवारीनुसार, गोंदिया तालुक्यात १९.०, गोरेगाव १८.०, तिरोडा ७.२, देवरी ६.०, आमगाव ३६.०, सालेकसा ५९.०, सडक-अर्जुनी १३.४ मीमी. पावसाची नोंद घेण्यात आली आहे. तर अर्जुनी-मोरगाव तालुक्यात पाऊस नव्हता. या पावसाची १५८.६ मीमी. नोंद घेण्यात आली असून त्याची सरासरी १९.८२ एवढी आहे.
मात्र मंगळवारी सकाळपासून पावसाने काही भागात दमदार हजेरी लावली. हा पाऊस सालेकसा व आमगाव तालुक्यावर सर्वाधीक प्रसन्न दिसला असून या दोन तालुक्यांत सर्वाधीक पावसाची नोंद घेण्यात आली आहे. पावसामुळे खोळंबून असलेली शेतीची कामे पुन्हा जोमात सुरू होणार आहेत.
शिवाय नदी-नाल्यांतील पाणीसाठ्यात या पावसामुळे वाढ होणार आहे. जिल्ह्यात मुसळधार पाऊस बरसला असतानाही पावसामुळे कसल्याही प्रकारचे नुकसान झाल्याची माहिती नव्हती.