नळाला आज पाणी आले, उद्याचा मात्र भरवसा नाही...

By कपिल केकत | Published: July 29, 2023 06:52 PM2023-07-29T18:52:27+5:302023-07-29T18:52:46+5:30

- लो-व्होल्टेजमुळे समस्या : त्यात यंत्रांमध्ये बिघाडाची भर

water came to the tap today but there is no hope for tomorrow | नळाला आज पाणी आले, उद्याचा मात्र भरवसा नाही...

नळाला आज पाणी आले, उद्याचा मात्र भरवसा नाही...

googlenewsNext

कपिल केकत, गोंदिया : शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरणला एक ना एक ग्रहण लागत असल्याचे दिसत आहे. एकीकडे लो-व्होल्टेजमुळे डोंगरली पंप हाऊसमधील पंप सुरू होत नसल्याने पाणी पुरवठ्याची समस्या उद्भवत आहे. तर त्यातच वारंवार यंत्रांमध्ये येणाऱ्या बिघाडाची त्यात भर पडत आहे. परिणामी वारंवार पाणी पुरवठा खंडित होत असून, ‘नळ आज आले, उद्याचा मात्र भरवसा नाही’ असे म्हणण्याची वेळ शहरवासीयांवर आली आहे.

शहरासह लगतच्या ग्राम कटंगी व कुडवाला येथे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडून पाणी पुरवठा केला जातो. यासाठी डांगोरली येथे मजिप्राचे पंप हाऊस असून, वैनगंगेचे पाणी खेचून ते शहरासह दोन्ही गावांना दिले जाते. यासाठी पंप हाऊसमध्ये २४० एचपी क्षमतेचे दोन मोटारपंप लावण्यात आले आहेत. मात्र, महावितरणकडून डांगोरलीला कमी वीज दाबाने पुरवठा केला जात असल्यामुळे दोन्ही पंप सुरू होत नाहीत. परिणामी मजिप्राच्या पाण्याच्या ७ टाक्या भरत नाहीत व दोनवेळचा नियमित पाणी पुरवठा करता येत नाही.

त्यातच मागील पंधरवड्यापासून मजिप्राचे ग्रह काही व्यवस्थित नसल्याने त्यांच्या यंत्रांमध्ये वारंवार बिघाड होत आहे. १८ तारखेला वीज वाहिन्या तुटल्याने पाणी पुरवठा करता आला नाही. २१ तारखेला पंपाच्या स्टार्टरला शॉटसर्किटने आग लागल्याने तर २६ तारखेला नवीन स्टार्टर नादुरुस्त झाल्याने शहराला पाणी पुरवठा करता आला नाही. दर एक-दोन दिवसांमध्ये पाणी पुरवठा खंडित होत असल्याने नागरिकांची मात्र पाण्याअभावी गैरसोय होत आहे. परिणामी त्यांच्यात रोष वाढत असून, ते कधीही रस्त्यावर उतरतील, याचा नेम नाही.

भीमनगर, रामनगर व सिव्हिल लाइन्स परिसराला फटका

- कमी वीज दाबामुळे डांगोरली पंप हाऊसमधील एकच पंप सुरू राहतो. परिणामी सात टाक्या भरता येत नाहीत. त्यातही रामनगर, भीमनगर व सिव्हिल लाइन्स परिसरात पाणी पुरवठा होत नाही. आता हा नेहमीचाच प्रकार झाला असून, या तिन्ही भागातील नागरिक चांगलेच संतापले आहेत. एक दिवस नळ येतो व दोन-तीन दिवस बंद राहतो. हा प्रकार नित्याचाच झाला आहे. अशात महावितरणने या समस्येवर तोडगा काढावा, जेणेकरून या तिन्ही भागांना सुरळीत पाणी पुरवठा करता यावा, अशी मागणी रामनगर, भीमनगर व सिव्हिल लाइन्सवासीयांनी केली आहे.

Web Title: water came to the tap today but there is no hope for tomorrow

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Waterपाणी