शहरात पाणी पेटणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2018 08:37 PM2018-04-05T20:37:57+5:302018-04-05T20:37:57+5:30
डांर्गोलीजवळ वैनगंगा नदीच्या पात्राजवळ उभारलेल्या पाणी पुरवठा योजनेतून शहराला पाणी पुरवठा केला जातो. मात्र यंदा वैनगंगा नदीचे पात्र कोरडे पडल्याने शहरातील पाणी पुरवठ्यात कपात करण्यात आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : डांर्गोलीजवळ वैनगंगा नदीच्या पात्राजवळ उभारलेल्या पाणी पुरवठा योजनेतून शहराला पाणी पुरवठा केला जातो. मात्र यंदा वैनगंगा नदीचे पात्र कोरडे पडल्याने शहरातील पाणी पुरवठ्यात कपात करण्यात आली. नदीच्या पात्रात केवळ आठ दिवस पुरेल ऐवढाच पाणीसाठा असल्याने शहरात पाणी टंचाईची गंभीर समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे.
गोंदिया शहराला महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागातंर्गत डांर्गोलीजवळ वैनगंगा नदीच्या पात्रालगत उभारण्यात आलेल्या योजनेतून पाणी पुरवठा केला जातो. या योजनेमुळे शहरातील दोन लाखांवर नागरिकांची तहान भागविली जाते. मात्र मागील वर्षी जिल्ह्यात कमी पाऊस झाल्याने व यंदा वैनगंगा नदीचे पात्र मार्च महिन्यातच कोरडे पडल्याने शहरातील पाणी पुरवठ्यावर त्याचा परिणाम झाला. मागील महिनाभरापासून शहरवासीयांना दिवसातून केवळ एकच वेळ पाणीे पुरवठा केला जात आहे. त्यामुळे कधी नव्हे ती पाणी टंचाईची गंभीर समस्या शहरात निर्माण झाली. काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाने डांगोर्लीजवळ वैनगंगा नदीच्या पात्रात बंधारा तयार करुन पाणी पातळीत वाढ करण्याचा प्रयत्न केला. मात्र मजीप्राचा हा प्रयत्न देखील फसल्याचे चित्र आहे.
वैनगंगा नदीचे पात्र कोरडे पडले असून केवळ आठ दिवस पुरेल ऐवढाच पाणीसाठा शिल्लक असल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे. विशेष म्हणजे यंदा पाणी टंचाईची समस्या गंभीर होणार ही बाब मजीप्रा आणि जिल्हा प्रशासनाला चांगली ठाऊक असताना सुध्दा त्यांनी याकडे दुर्लक्ष केले. त्याचे परिणाम आता शहरवासीयांना भोगावे लागणार असून शहरात आता पाणी पेटण्याची शक्यता आहे.
अल्प पाणीसाठा असल्याची बाब जिल्हा प्रशासन आणि मजीप्राच्या अधिकाऱ्यांना चांगली ठाऊक होती. मात्र या दोन्ही विभागांच्या वेळकाढू धोरणाचा फटका आता शहरवासीयांना सहन करावा लागणार आहे. शहरातील पाणी टंचाईचा मुद्दा लोकमतने लावून धरल्यानंतर गुरूवारी (दि.५) जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे यांनी डांर्गोली येथील पाणी पुरवठा योजनेला भेट देवून पाहणी केली. तसेच मजीप्राने पंधरा दिवसांपूर्वी तयार केलेल्या बंधाऱ्याची पाहणी करुन पाणी टंचाईच्या परिस्थितीचा आढावा घेतल्याची माहिती आहे.
आठ दिवसांत उपाययोजना करणे अशक्य
पुजारीटोला धरणाचे पाणी कालव्याव्दारे डांर्गोली येथील पाणी पुरवठा योजनेपर्यंत पोहचविण्याचे काम सहज शक्य व आठ दिवसात पूर्ण होणारे नाही.त्यामुळे शहरवासीयांना पाणी टंचाईच्या तीव्र संकटाला सामोरे जाणे अटळ आहे. आता हे दोन्ही विभाग यावर काय उपाययोजना करतात याकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.
पर्यायी साधनाचा अभाव
शहराला महाराष्ट्र जीवन प्राधीकरण विभागाकडून होणारा पाणी पुरवठा बंद झाल्यास त्याला पर्यायी व्यवस्था शहरात नाही. शहरात बोअरवेल व विहिरींची संख्या सुध्दा फारशी नाही. त्यामुळे पाणी टंचाईची तीव्र समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे.
तहान लागल्यावर विहीर खोदण्याचा प्रकार
जिल्ह्यात मागील वर्षी कमी प्रमाणात झालेला पाऊस आणि भूजल सर्वेक्षण विभागाने दिलेला संभाव्य पाणी टंचाईचा अहवाल यावरुन प्रशासनाने वेळीच उपाय योजना सुरू करण्याची गरज होती. मात्र तसे न करता केवळ पाणी टंचाईची परिस्थिती निर्माण झाल्यास पुजारीटोला धरणातून पाणी पुरवठा करण्याचा अॅक्शन प्लॉन तयार केला होता. पण प्रत्यक्षात त्यावर कुठलीच उपाय योजना केली नाही. त्यामुळे आता जेव्हा केवळ आठ दिवस पुरेल ऐवढाच पाणीसाठा असल्याची बाब पुढे आल्यानंतर मजीप्रा आणि जिल्हा प्रशासनाने उपाययोजना करण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहे. परिस्थितीचे गांर्भीय ओळखून वेळीच उपाय योजना केल्या असत्या तर ही वेळ आली नसती.