डांगोरलीत आज येणार पाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2019 09:26 PM2019-04-20T21:26:54+5:302019-04-20T21:28:34+5:30
शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या डांगोरली येथे वैनगंगा नदीतील पाण्याचा साठा संपल्याने शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी यंदाही पुजारीटोला प्रकल्पातून पाणी घ्यावे लागले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या डांगोरली येथे वैनगंगा नदीतील पाण्याचा साठा संपल्याने शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी यंदाही पुजारीटोला प्रकल्पातून पाणी घ्यावे लागले आहे. पुजारीटोला प्रकल्पातून गुरूवारी (दि.१८) दुपारी ३ वाजतादरम्यान पाणी सोडण्यात आले असून ते पाणी रविवारी (दि.२१) सायंकाळी डांगोरलीत पोहचणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
शहराला महाराष्ट्र जीवन प्राधीकरण विभागाकडून पाणी पुरवठा केला जातो. यासाठी डांगोरली येथे वैनगंगा नदीच्या पात्रात पाणी पुरवठा योजना तयार करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत शहरवासीयांना प्रती व्यक्ती १८६ लीटर प्रमाणे दिवसातून दोन वेळा पाणी पुरवठा केला जातो. मात्र मागील तीन-चार वर्षांपासून शहरवासीयांना पाणी टंचाईला तोंड द्यावे लागत आहे. यातच मागील वर्षापासून स्थिती अधिकच गंभीर झाली असून मागील वर्षी येथून ९० किमी अंतरावरील पुजारीटोला प्रकल्पातून कालव्यांच्या माध्यमातून पाणी आणावे लागले होते.
यंदाही तीच स्थिती निर्माण झाली असून वैनगंगा नदीचे पात्र एप्रिल महिन्याच्या सुरूवातीलच कोरडे पडले व त्यामुळे पाणी पुरवठा योजनेच्या विहिरीची पातळी खालावली. त्यामुळे शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी यंदाही पुजारीटोला प्रकल्पाची धाव घ्यावी लागली आहे. त्यानुसार, गुरूवारी (दि.१८) पुजारीटोला प्रकल्पातून पाणी सोडण्यात आले आहे. गुरूवारपासून पाण्याचा हा प्रवास डांगेरलीसाठी सुरू झाला असून शनिवारपर्यंत (दि.२०) पाणी ५० किमी पर्यंत पोहचले होते अशी माहिती होती.
सोडण्यात आलेले पाणी कालव्यात जिरणार व त्यानंतर पुढे वाढत जाते. त्यामुळे रविवारी (दि.२१) सायंकाळी पाणी डांगोरलीत पोहचणार असा अंदाज व्यक्त केला जात आहे. अशात, रविवारी सायंकाळी पाणी पोहचण्याचा अंदाज असला तरी सोमवारी मात्र पाणी पोहचणारच असेही म्हणता येईल.
विशेष म्हणजे, मागील वर्षीच्या तुलनेत यंदा लवकरच पाणी मागविण्याची पाळी आली आहे. यातून पाणी टंचाईची तिव्रता लक्षात घेते येते.
१५० क्युसेस पाणी सोडले
शहराला पाणी करण्यासाठी सध्या पुजारीटोला प्रकल्पातून १५० क्युसेस पाणी सोडण्यात आल्याची माहिती आहे. यंदा मागील वर्षाच्या तुलनेत लवकरच पाणी मागविण्याची पाळी आली आहे. यावरून जून महिन्यापर्यंत प्रकल्पातून आणखीही टप्प्यातून पाणी मागविले जाणार यात शंका नाही. यादृष्टीने प्रकल्पात पाणी साठी असल्याची माहिती आहे.