जलसंधारणच वाचवू शकते पीक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2018 09:42 PM2018-05-29T21:42:37+5:302018-05-29T21:42:58+5:30

जिल्ह्यातील ९० टक्के क्षेत्र हे जून ते सप्टेंबर दरम्यान पडणाऱ्या मोसमी पावसावर अवलंबून असते. पाऊस हल्ली बेभरवशाचा झाला आहे. अशा परिस्थितीत पावसाच्या पाण्याचे प्रत्येक थेंब उपयोगात आणणे महत्त्वाचे ठरते. निसर्गाच्या लहरीपणावर बंधन घालणे शेतकऱ्यांना शक्य नाही.

Water conservation can save crop | जलसंधारणच वाचवू शकते पीक

जलसंधारणच वाचवू शकते पीक

googlenewsNext
ठळक मुद्देकोरडवाहू शेतीसाठी आवश्यक : पावसाचा प्रत्येक थेंब उपयोगात आणणे गरजेचे

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : जिल्ह्यातील ९० टक्के क्षेत्र हे जून ते सप्टेंबर दरम्यान पडणाऱ्या मोसमी पावसावर अवलंबून असते. पाऊस हल्ली बेभरवशाचा झाला आहे. अशा परिस्थितीत पावसाच्या पाण्याचे प्रत्येक थेंब उपयोगात आणणे महत्त्वाचे ठरते. निसर्गाच्या लहरीपणावर बंधन घालणे शेतकऱ्यांना शक्य नाही. परंतु आवश्यकता नसताना आलेले आगाऊ पावसाचे पाणी शेतातच साठवणे व गरजेच्या वेळी उपयोगात आणणे शक्य होऊ शकते. अतिवृष्टीमुळे होणारी मातीची धूप थांबविण्यासाठी व एका पाण्याअभावी वाया जाणारे पीक वाचविण्यासाठी मूलस्थानी जलसंधारण अगदी महत्त्वाचे ठरते.
गत दोन, तीन वर्षांपासून पाऊस अनियमित व लहरीपणामुळे पिकांची उत्पादकता बेभरवशाची झाली आहे. साधारणपणे बहुतेक पिकाला त्यांच्या पूर्ण वाढीकरिता ४०० ते ५०० मिमी पाणी लागते. जिल्ह्याची पावसाची सरासरी ८५० मिमी आहे. तरीही पिकाची उत्पादन क्षमता अधिक राहत नाही. एका पावसामुळे पिके हातचे गेल्याचे दरवर्षी निदर्शनात येते.
मोसमी वाऱ्याबरोबर येणारे पाऊस हे अनियमित व लहरी आहे. आवश्यकता नसताना पाऊस खूप येतो व गरज असते तेव्हा पडत नाही. जिल्ह्यात पारंपरिक शेती पद्धतीत अवेळी आलेला व जास्त झालेला पाऊस साठवून ठेवून गरज पडेल तेव्हा वापरायची काहीही पर्यायी व्यवस्था नाही. त्यामुळे निसर्गाच्या पावसावरच शेती व्यवसाय अवलंबून राहत होता. आवश्यकता नसताना आलेला पाऊस साठवून ठेवणे शेतकऱ्याच्या हाती आहे व हाच कोरडवाहू शेतीची उत्पादकता वाढविण्याचा एकमेव तोडगा आहे.
काय आहे मूलस्थानी जलसंधारण ?
पावसाच्या पाण्यामुळे होणारी मातीची धूप थांबविणे, अधिकाधिक पाणी शेतातच जिरावे यासाठी शेताच्या उताराला आडवी पेरणी, पट्टापीक पद्धतीने पेरणी, पावसाळ्यात उघाडीच्या दिवसांत पिकांची आंतरमशागत व उताराला आडव्या खोल सरी आदी प्रकारात पावसाचे पाणी शेतातच अधिक प्रमाणात जिरावे यासाठी केलेले उपाय, यामधून पिकाची उत्पादकता वाढते याला मूलस्थानी जलसंधारण म्हणतात.
पिकांच्या ओळीमध्ये खोलसरी
पेरणीनंतर ३० ते ३५ दिवसांनी दोन ओळीनंतर डवऱ्याच्या सहाय्याने सरी काढल्या जातात. अशा सरीत पावसाचे पाणी अडवून शेतातच मुरते व जास्तीचे पाणी शेतातून बाहेर काढता येते.
समपातळीत शेती
पिकाची पेरणी किंवा लागवड शेताच्या उताराला आडव्या दिशेने समपातळीत केल्यास पावसाचे पाणी सरीच्या किंवा पिकांच्या सर्व भागावर सारख्या प्रमाणात रुजण्यास मदत होते. वाहून जाणाऱ्या मातीचे संवर्धन होऊन पोत टिकून राहतो. कुंटूर पद्धतीने शेती करण्यासाठी शेतातील उताराच्या मधोमध गवत किंवा मातीचा एखादा बांध काढणे महत्त्वाचे ठरते.
उतारास आडवी खोल सरी
पिकाच्या आंतर मशागतीच्या वेळी कोळपणीला फासेच्या वरच्या बाजूला दोरी बांधून शेतात एक किंवा दोन ओळीनंतर खोल सरी पाडल्या जातात. पावसाचे पाणी खोल सरीत अडवून त्यात जिरविण्यात येते. त्यामुळे आर्द्रता कायम राहते.
पट्टा पीक पद्धत
ज्यावेळेस आडवी पीक पद्धती जमिनीवरून वाहणारे पाण्याचे लोट अडविण्यास अपुरे पडतात. अशा वेळेस सलग एक पीक पद्धत न वापरता पट्टा पद्धतीने शेतात दोन प्रकारची पिके उतारास आडवी पेरावी.
मातीची बांध बंदिस्ती
शेत जमिनीचा उतार ९० ते १०० मीटरपेक्षा अधिक असल्यास शेतात मातीचे बांध टाकून उताराची लांबी कमी करावी. ज्यामुळे पावसाच्या पाण्याचे लोट कमी प्रमाणात निघून त्याद्वारे मातीची धूपही कमी करता येते. जोराचा पाऊस आल्यास बांध फुटू नये म्हणून अडविण्यात आलेले जास्तीचे पाणी नियंत्रित पद्धतीने बाहेर काढावे.
रसायनांमुळे मातीचे सुपीक गुणधर्म नष्ट
शेत जमिनीत अधिक प्रमाणात रासायनिक खतांचा उपयोग केल्याने मातीत नैसर्गिकरीत्या असलेल्या पिकांसाठी पोषक तत्व नष्ट होतात. कोणत्याही गोष्टीचा अतिरेक केला की त्या पाठोपाठ त्याचे दुष्परिणामसुद्धा येतात. सेंद्रिय व नैसर्गिक पालापाचोळ्यापासून तयार तसेच शेणखत यांचा वापर केल्यास चांगले परिणाम येवू शकतात.

 

Web Title: Water conservation can save crop

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.