वॉटर न्यूट्रल गावांवर ‘जलसंकट’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2018 09:03 PM2018-02-24T21:03:40+5:302018-02-24T21:03:40+5:30
टंचाईमुक्त महाराष्ट्र करणे, शाश्वत शेतीसाठी पाणी व पिण्याच्या पाण्याची सोय करून देण्यासाठी जलसंधारण विभागामार्फत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांनी जलयुक्त शिवार अभियान ही महत्वाकांक्षी योजना अमंलात आणली.
नरेश रहिले ।
ऑनलाईन लोकमत
गोंदिया : टंचाईमुक्त महाराष्ट्र करणे, शाश्वत शेतीसाठी पाणी व पिण्याच्या पाण्याची सोय करून देण्यासाठी जलसंधारण विभागामार्फत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांनी जलयुक्त शिवार अभियान ही महत्वाकांक्षी योजना अमंलात आणली. ही योजना प्रभावीपणे राबवून दोन वर्षापूर्वी ही गावे वॉटर न्यूट्रल म्हणून घोषीत करण्यात आली. मात्र याच १९९० गावात गेल्या वर्षी कमी पाऊस झाल्याने जलसंकट निर्माण होण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्रातील बऱ्यांच गावांमधील गावकऱ्यांना दरवर्षी पाणी टंचाईचा सामना करावा लागतो. या जलसंकटावर मात करण्यासाठी जलसंधारण व रोहयो विभागांतर्गत जलयुक्त शिवार अभियान राबविण्यात येत आहे. यासाठी मागेल त्याला शेततळी सारखे उपक्रम राबविण्यात आले.
सन २०१५-१६ या वर्षापासून जोमाने राबविण्यात येणाऱ्या जलयुक्त शिवार अभियानात नागपूर विभागातील ३ हजार ७४३ ग्रामपंचायतींपैकी २ हजार ७४९ ग्रामपंचायतीची निवड करण्यात आली. सुरूवातीच्या दोन वर्षात या योजनेला चांगला प्रतिसाद मिळाला. सन २०१५-१६ या वर्षात नागपूर विभागातील १०७७ तर सन २०१६-१७ या वर्षात ९१३ गावे असे एकूण १९९० गावे वॉट्रल न्यूट्रल झाल्याचे शासनाने जाहीर केले.
या गावातील भूगर्भातील पाण्याच्या पातळीत सुधार आणण्यासाठी जी कामे जलयुक्त शिवार अभियानातून होणार होती. ती कामे वॉटर न्यूट्रल झाल्यामुळे करण्यात आली नाहीत. सन २०१७ च्या पावासाळ्यात नागपूर विभागात केवळ ७० टक्के पाऊस झाला. नागपूर विभागाची पावसाची सरासरी ११७३.७० मिमी. आहे. परंतु १ जून ते ३० सप्टेंबर २०१७ या पर्यंत नागपूर विभागात ८१६.१२ मिमी म्हणजेच ७० टक्के पाऊस पडला आहे. अत्यल्प पावसामुळे मागील दोन वर्षात शासनाने ज्या गावांना वॉटर न्यूट्रल जाहीर केले त्या गावातही जलसंकट निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. जलयुक्त शिवार अभियानाच्या माध्यमातून ज्या गावातील पाण्याची पातळी वाढली होती.
त्या गावातील पाण्याची पातळी आता खोल गेल आहे. यंदा पाऊस कमी पडला तरी अनेकांनी पिके घेणे सुरूच ठेवले. बोअरवेल खोदकाम मोठ्या प्रमाणात होत असल्यामुळे ह्या गावांमध्ये जलसंकट निर्माण होण्याची शक्यता भूजल सर्वेक्षण विभागाकडून देखील वर्तविली जात आहे. प्रशासनाने २०० फूटांपेक्षा अधिक बोअरवेल खोदू नये असे आदेश दिले असताना ३०० ते ३५० फूटापर्यंत खोदकाम सुरू आहे. काही ठिकाणी तर ४०० फूटांपर्यंत बोअरवेल खोदण्याचे काम झाले आहे.
काय आहे वॉटर न्यूट्रल?
भूजल पातळी खालावलेल्या गावात जलसंधारणाची विविध कामे राबवून त्या गावाची भूजल पातळी वाढविण्याच्या प्रयोगाला वॉटर न्यूट्रल असे म्हटले जाते. जलयुक्त शिवार अभियानातंर्गत राबविण्यात आलेल्या कामांमुळे अनेक गावे वॉटर न्यूट्रल करण्यात प्रशासनाला यश आले होते.
जलयुक्तच्या कामांना लोकांचे सहकार्य
सन २०१६-१७ या वर्षात जलयुक्त शिवार अभियानातून गाळ काढणे, खोलीकरण, रूंदीकरण ही कामे करायची होती. या कामांना लोक सहभागातून करा असे शासनाने अधिकाºयांना सांगितल्यामुळे अधिकाऱ्यांनी नागरिकांना आवाहन करून लोकसहभागातून आपापल्या गावात कामे करण्यास सांगितले. त्यावर नागपूर जिल्ह्यातील २५ गावात, गोंदिया जिल्ह्यातील ८ गावात, चंद्रपूर जिल्ह्यातील २९ गावात, गडचिरोली जिल्ह्यातील ३० गावात, वर्धा जिल्ह्यातील ५९ गावात लोक सहभागातून कामे करण्यात आली. भंडारा जिल्ह्यातील एकाही गावात लोकसहभागातून कामे झाले नाहीत.
खडकाळ भागात शेती फुलविण्याचे स्वप्न भंगले
जलयुक्त शिवार योजना केंद्र शासनाच्या योजनेपूर्वीच अमंलात आली. पाण्याचे योग्य नियोजन, कुशल व्यवस्थापन, जमिनीची धूप, आद्रता थांबविणे, भूगर्भातील पाण्याचे पूनर्भरण, पूरसंरक्षण क्षमता स्थापित करणे, भूविकास व लाभक्षेत्राचा विकास, दुष्काळावर मात, शाश्वत सिंचनाची सोय करणे हा जलयुक्त शिवार अभियानाचा उद्देश होता. या योजनेच्या यशस्वीतेमुळे शेतकरी खडकाळ शेतीवरही भरपूर उत्पादन होईल अशी अपेक्षा होती. परंतु यंदाच्या दुष्काळी परिस्थितीमुळे आता सुपिक शेतीलाही पाणी मिळणे कठीण झाले आहे.
खडकांचे प्रमाण अधिक
पूर्व विदर्भातील नागपूर जिल्ह्याचा ५० टक्के, चंद्रपूरचा ६० टक्के तर भंडारा, गोंदिया, गडचिरोली या जिल्ह्याचा १०० टक्के भाग मेटेमॉर्फीक खडकाचा आहे. या जिल्ह्यांमध्ये भूजल पुनर्भरणाचे प्रमाण अत्यल्प आहे. मेटेमार्फीक खडकात विघटीत चुनखडीचे (क्ले) १८ ते ३० मीटर जाड थर असल्यामुळे या थरांतून जलसंधारण किंवा वहन अत्यल्प होते. परंतु साध्य विहिरी १९ ते १५ मीटर खोल व तीन मीटर व्यासाच्या असल्यास त्यातून पाणी जमिनीत मुरविण्यास मदत होते.