वॉटर कुलर मशीन ठेवली भर उन्हात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2018 10:18 PM2018-05-07T22:18:12+5:302018-05-07T22:18:12+5:30
मागील आठवडाभरापासून तापमानात सातत्याने वाढ होत असून पाऱ्याने चाळीस पार केली आहे. वाढत्या तापमानामुळे अंगाची लाही लाही होत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : मागील आठवडाभरापासून तापमानात सातत्याने वाढ होत असून पाऱ्याने चाळीस पार केली आहे. वाढत्या तापमानामुळे अंगाची लाही लाही होत आहे. मात्र अशा स्थितीत येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रुग्णांसाठी पिण्याच्या पाण्याची मशिन रुग्णालयाच्या आवारात भर उन्हात ठेवल्याने रुग्णाच्या नातेवाईकांना उन्हाचे चटके सहन करीत गरम पाणी प्यावे लागत आहे.
येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नेहमीच कुठल्या ना कुठल्या कारणावरुन चर्चेत असते. आता हे वैद्यकीय महाविद्यालय उन्हात ठेवलेल्या वॉटर कुलर मशिनवरुन चर्चेत आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल असलेल्या रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी, यासाठी वॉटर कुलर मशिन लावण्यात आली आहे.
मात्र ही मशिन रुग्णालयाच्या इमारतीत लावण्याऐवजी ती बाहेर उघड्यावर लावण्यात आली आहे. त्यामुळे या मशिनचे पाणी थंड होण्याऐवजी गरम होत आहे. परिणामी रुग्णांच्या नातेवाईकांना भर उन्हात उभे राहून पाणी प्यावे लागत आहे. वैद्यकीय महाविद्यालयात वॉटर कुलर मशिन लावण्यासाठी पुरेशी जागा उपलब्ध आहे. पण, रुग्णालय प्रशासनाने कोणता विचार करुन ही मशिन रुग्णालयाच्या आवारात भर उन्हात ठेवली हे मात्र समजण्या पलिकडे आहे.
विशेष म्हणजे आठ दिवसांपूर्वी याच वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठातानी प्रसिध्दी पत्रक काढून वाढत्या तापमानामुळे उष्माघाताची शक्यता असून काळजी घेण्यासाठी दिवसातून सात ते आठ लिटर पाणी पिण्याचा सल्ला दिला. मात्र त्यांनीच काढलेल्या प्रसिध्दी पत्रकाचा त्यानाच विसर पडल्याचे चित्र आहे.
यासंदर्भात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे प्रभारी अधिष्ठाता यांना विचारणा केली असता रुग्णांसाठी पाण्याची व्यवस्था करण्यासाठी ही वॉटर कुलर मशिन बाहेर लावल्याचे सांगितले. रात्रीच्या वेळेस वैद्यकीय महाविद्यालयाच्या दरवाज्याला कुलूप लावले जाते. त्यामुळे रात्रीच्या वेळेस त्यांना पाणी उपलब्ध व्हावे यासाठी ही मशिन आवारात लावल्याचे सांगितले.
टँकरने पाणी पुरवठा
येथील शासकीय महाविद्यालयात पाण्याची तीव्र समस्या आहे. बरेचदा येथील रुग्णांना पाण्यासाठी भटकंती करावी लागते. तर मागील काही दिवसांपासून वैद्यकीय महाविद्यालयाला नगर परिषदेच्या टँकरव्दारे पाणी पुरवठा केला जात आहे.विशेष म्हणजे या महाविद्यालयातील विहिरीत दररोज दोन तीन टँकर पाणी सोडले जात आहे. मात्र अद्यापही या समस्येवर कायम स्वरुपी उपाययोजना करण्यात आली नाही.
पाण्याचा अपव्यय
वैद्यकीय महाविद्यालयातील पाणी पुरवठ्याची व्यवस्था सुधारण्यासाठी पाईप टाकण्यात आली. मात्र पाईप लाईनचे पाईप योग्य तºहेने न जोडल्याने त्यातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा अपव्यय होत आहे. एकीकडे वैद्यकीय महाविद्यालयातील पाणी टंचाई दूर करण्यासाठी टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे. मात्र दुसरीकडे लिकेज पाईप लाईनमुळे हजारो लिटर पाण्याचा अपव्यय होत असल्याचे चित्र आहे.