सहा तासात पोहचू शकेल डांर्गोर्लीत पाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2019 09:14 PM2019-04-18T21:14:08+5:302019-04-18T21:15:24+5:30
शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या डांगोर्ली येथील वैनगंगा नदीचे पात्र कोरडे पडल्याने त्याचा पाणी पुरवठा योजनेच्या विहिरीवर परिणाम झाला. त्यामुळे गोंदिया शहरवासीयांवर पाणीटंचाईचे संकट निर्माण झाले आहे.यावर मात करण्यासाठी गोंदियापासून ९० कि.मी.अंतरावर असलेल्या पुजारीटोला धरणाचे पाणी कालव्यांव्दारे आणण्यात येणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या डांगोर्ली येथील वैनगंगा नदीचे पात्र कोरडे पडल्याने त्याचा पाणी पुरवठा योजनेच्या विहिरीवर परिणाम झाला. त्यामुळे गोंदिया शहरवासीयांवर पाणीटंचाईचे संकट निर्माण झाले आहे.यावर मात करण्यासाठी गोंदियापासून ९० कि.मी.अंतरावर असलेल्या पुजारीटोला धरणाचे पाणी कालव्यांव्दारे आणण्यात येणार आहे. कालव्यांचे दुरूस्तीचे काम पूर्ण झाले असल्याने पुजारीटोला धरणाचे पाणी डांगोर्ली येथील पाणी पुरवठा योजनेपर्यंत पोहचण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
मागील दोन वर्षांपासून डांगोर्ली येथील वैनगंगा नदीचे पात्र एप्रिल महिन्यातच कोरडे पडत असल्याने शहरवासीयांना पाणीटंचाईच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. मात्र यंदा एप्रिल महिन्यातच वैनगंगा नदीचे पात्र कोरडे पडल्याने पाणी पुरवठा योजनेच्या विहिरींची पातळी खालावली आहे. परिणामी सहा दिवस पुरेल ऐवढाच पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाने शहराला दिवसातून एकच वेळ पाणी पुरवठा करण्याचा निर्णय घेतला. तर शहरातील पाणीटंचाईच्या समस्येवर मात करण्यासाठी गोंदियापासून ९० कि.मी.अंतरावर असलेल्या पुजारीटोला धरणाचे पाणी कालव्याव्दारे डांगोर्ली येथील पाणी पुरवठा योजनेपर्यंत पोहचविले जाणार आहे. मागील वर्षी सुध्दा पुजारीटोला धरणाचे पाणी आणून पाणीटंचाईवर मात करण्यात आली होती. मात्र मागील वर्षी कालव्यांची दुरूस्ती झाली नसल्याने काही ठिकाणी कालवे फुटले होते. परिणामी पाण्याचा मोठ्या प्रमाणात अपव्यय झाला होता. ही समस्या ओळखून आ.गोपालदास अग्रवाल यांनी शासनाकडे पाठपुरावा करुन पुजारीटोला ते डांगोर्ली येथील पाणी पुरवठा योजनेच्या कालव्यांची दुरूस्ती करण्यासाठी निधी मंजूर करुन घेतला. त्यानंतर १५ नोव्हेबर ते मार्चपर्यंत कालव्यांच्या दुरूस्तीचे काम करण्यात आले. शिवाय कालव्यांच्या दुरूस्तीसह नवीन गेट तयार करण्यासाठी १३० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला.त्यामुळेच कालवे पूर्णपणे व्यवस्थित झाले असून पुजारीटोला ते डांर्गोली येथील पाणी पुरवठा योजनेपर्यंत केवळ सहा तासात पाणी पोहचविणे शक्य होणार आहे. यामुळे शहरातील पाणीटंचाईच्या समस्येवर मात करणे शक्य होणार असून पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ सुध्दा शहरवासीयांवर येणार नसल्याचे बोलल्या जाते.
शेतकऱ्यांना होणार मदत
पुजारीटोला ते गोंदियापर्यंत कालव्यांची दुरूस्ती मागील ४० वर्षांपासून करण्यात आली नव्हती. मात्र आ.गोपालदास अग्रवाल यांच्या पुढाकाराने कालव्याच्या दुरूस्तीसाठी शासनाने निधी मंजूर केला.त्यामुळे ९० कि.मी.च्या कालव्याची दुरूस्ती झाली असून शेतकऱ्यांना सुध्दा सिंचनासाठी याची मदत होणार आहे. शिवाय यामुळे पाण्याचा होणार अपव्यय टाळणे शक्य होणार आहे.
मजीप्रा उपाय योजनापासून अनभिज्ञ
गोंदिया शहराला महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागातंर्गत पाणी पुरवठा केला जातो. मात्र शहरात सध्या पाणी टंचाई निर्माण झाली असून यावर मात करण्यासाठी पुजारीटोला धरणाचे पाणी पाच सहा दिवसात आणण्यात येईल, अशी माहिती या विभागाचे अधिकारी देत आहे. मात्र कालव्यांच्या दुरूस्तीमुळे केवळ सहा तासात पुजारीटोला ते डांगोर्लीपर्यंत पोहचणार आहे. पण यापासून या विभागाचे अधिकार अनभिज्ञ असून पाणी पोहचण्यास चार पाच दिवस लागतील असे सांगत आहे.
मागील ४० वर्षांत जे कालवे दुरूस्तीचे काम झाले नव्हते ते आपण शासनाकडे पाठपुरावा केल्यामुळे मार्गी लागले आहे. पुजारीटोला ते गोंदियापर्यंतच्या कालव्यांची दुरूस्ती झाल्याने कालव्याव्दारे पुजारीटोला ते डांगोर्लीपर्यंत केवळ सहा तासात पाणी आणणे शक्य होणार आहे. त्यामुळे शहरवासीयांना पाणी टंचाईच्या समस्येला तोंड द्यावे लागणार नाही.कालव्यांची दुरूस्ती झाल्याने देवरी, आमगाव आणि गोंदिया तालुक्यातील शेतकऱ्यांना सुध्दा याचा फायदा होणार आहे.
-गोपालदास अग्रवाल, आमदार.