वॉटर फिल्टर प्लान्ट अखेर कायमचा बंद
By admin | Published: February 5, 2017 12:18 AM2017-02-05T00:18:22+5:302017-02-05T00:18:22+5:30
महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र जीवन प्राधीकरण विभागाच्या माध्यमातून सौंदड येथील ७ हजार लोकांना शुध्द व फिल्टरयुक्त पिण्याचे पाणी
नियोजनाचा अभाव: सात हजार नागरिक शुद्ध पाण्यापासून वंचित
सौंदड : महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र जीवन प्राधीकरण विभागाच्या माध्यमातून सौंदड येथील ७ हजार लोकांना शुध्द व फिल्टरयुक्त पिण्याचे पाणी पिण्याकरीता मिळत होते.परंतु नियोजनाअभावी फिल्टरचे पाणी मिळणे कायमचे बंद झाले आहे.
सौंदड हे गाव उत्तर ते दक्षीण जवळपास दोन किमी इतक्या अंतरात आहे.या गावासाठी २००१ मध्ये वॉटर फिल्टर ही योजना सुरू करण्यात आली. २००१ मध्ये सुरू झालेली ही योजना काही काळ सुरू राहीली. सौंदड या गावामध्ये एकूण पाच वार्ड आहेत. प्रत्येक नागरिकाना पिण्याचे पाणी प्राप्त व्हावे याकरीता पाईप लाईन ग्राम पंचायतच्या माध्यमातून २० वर्षा अगोदर टाकण्यात आली आहे. मात्र ती पाईप लाईन २० वर्षापासून अजनूही स्वच्छ केली नाही. नळामध्ये पॉलीथीन कचरा, गढूळ पाणी येते. पिण्याचे पाणी स्वच्छ व शुध्द पिण्या योग्य पाणी मिळावे अशी नागरिकांची इच्छा आहे. ग्राम पंचायतीद्वारे नागरिकांना पिण्याकरीता पाणी चुलबंद नदी पात्रातून विज पंपाद्वारे पाणी टाकी मध्ये सोडले जाते. अशुध्द व क्षारयुक्त पाणी पाईप लाईनमध्ये टाकले याते. यामुळे नागरिक वेळोवेळी आजारी पडतात. कित्येक वेळी विजेचे बील न भरल्यान पाणी पंपाची वीज कापली जाते. परिणामी नागरिकांना आठवडाभर पिण्याचे पाणी मिळत नाही. पाण्यासाठी नागरिकाना भटकंती करावी लागते. पाण्याचा योग्य पुरवठा होत नसल्याने नागरिक कित्येकदा नळ बिल भरत नाही. याला जबाबदार स्वत: प्रशासन आहे. सौंदड गावातील जनतेला वेळीच पिण्याचे पाणी मुबलक उपलब्ध व्हावे याकरीता अतिरीक्त पाणी टाकी निर्माण करण्यात आली. या वॉटर फिल्टर प्लांटद्वारे पाणी भंडारा जिल्ह्यातील निम्म चुलबंद जलाशयाच्या आतील भागात लवारी येथे (विहीर) तयार करून तब्बल लवारी उमरी ते सौंदड १० किमी पाईप लाईन तयार करुन तेथील पाणी सौंदड येथे पिण्याकरीता आणले जाते. मात्र काही काळापासून या योजनेवर लक्ष न ठेवल्यामुळे संपूर्ण फिल्टर प्लांट पाईप लाईन नादुरूस्त असल्याने बंद आहे. शुध्द पाण्यापासून संपूर्ण गाव वंचीत आहे. याकडे प्रशासन व लोकप्रतिनिधीने पक्षपात व हेवेदावे न करता गावातील जनतेच्या विकासाकरीता त्वरीत लक्ष देण्याची गरज आहे. सौंदड या गावात एकमेव वॉटर फिल्टर बसविण्यात आला होता. परंतु तेही आता धूळखात पडले आहे. महाराष्ट्र शासन पिण्याच्या पाण्यासाठी व देखभाल दुरूस्तीसाठी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून पाणी टंचाई आराखडा तयार करीत असते. यामध्ये ही योजना बसवून ही योजना पुन्हा सुरू करावी जेणेकरून जनतेला शुध्द पाणी पिण्यासाठी मिळेल, अशी मागणी माजी सभापती अशोक लंजे यांनी केली आहे. (वार्ताहर)