गणेशोत्सवासाठी ‘जलरक्षक दल’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2019 06:00 AM2019-09-02T06:00:00+5:302019-09-02T06:00:15+5:30
नरेश रहिले। लोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया : महाराष्ट्राचे लाडके दैवत असलेल्या गणरायाची जिल्ह्यात मंगळवारी (दि.२) स्थापना केली जाणार आहे. ...
नरेश रहिले।
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : महाराष्ट्राचे लाडके दैवत असलेल्या गणरायाची जिल्ह्यात मंगळवारी (दि.२) स्थापना केली जाणार आहे. ९६९ ठिकाणी सार्वजनिक गणपती मांडले जाणार आहेत. तर चार हजार ८३५ घरांत गणपतीची स्थापना होणार आहे. यापैकी ४२८ गावांमध्ये ‘एक गाव-एक गणपती’ची संकल्पना यंदाही राबविली जात आहे. गणेश विसर्जनादरम्यान कुठलीही घटना घडू नये यासाठी पोलीस अधीक्षक मंगेश शिंदे यांनी प्रत्येक पोलीस ठाण्यात ‘जलरक्षक दल’ स्थापन केले आहे.
गपणती उत्सव साजरा करताना गणेशोत्सव मंडळांनी चोरीची वीज वापरू नये, मूर्ती मांडलेल्या ठिकाणी पावसाचे पाणी पडणार नाही, मूर्तीच्या सुरक्षेसाठी संपुर्ण जबाबदारी मंडळाच्या सदस्यांनी करावी, जनावरे मंडपात येणार नाही याची काळजी घ्यावी, अशा सूचना पोलीस अधीक्षक शिंदे यांनी दिल्या आहेत.
गणेशोत्सवाचे पावित्र्य राखले जावे तसेच सुरक्षा असावी यासाठी प्रत्येक पोलीस ठाण्यांतर्गत पोलीस अधीक्षकांनी जलरक्षक दल स्थापन केले आहेत. विसर्जनादरम्यान ज्या ठिकाणी यापूर्वी घटना घडल्या आहेत, किंवा जे ठिकाण पोलिसांना धोकादायक वाटते अशा ठिकाणी हे जलरक्षक दल उपस्थित राहणार आहेत. स्वयंसेवक व पोहण्यात तरबेज असलेले पोलीस कर्मचारी या जलरक्षक दलात राहणार आहेत. हे दल उभारण्याची संपूर्ण जबाबदारी ठाणेदार व उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्यावर सोपविण्यात आली आहे.
महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम सुरू होण्यापूर्वी एका गावात अनेक गणेश मूर्ती असायच्या. त्यातून आपल्या मंडळाचा देखावा आकर्षक असावा, आपल्याच कार्यक्रमांना लोकांनी प्रतिसाद द्यावा, आपल्या मंडळाची मूर्ती जास्त आकर्षक असावी अशा भावनेतून गणेश उत्सव मंडळांमध्ये चढाओढ असायची. यातूनच गावातील अनेक गणेश मंडळांचे वाद व्हायचे व गावची शांतता धोक्यात येत होती.
या उत्सवादरम्यान गावाची शांतता अबाधित राखण्यासाठी महात्मा गांधी तंटामुक्त समितीच्या पुढाकाराने ‘एक गाव-एक गणपती’ ची संकल्पना जिल्ह्यातील ४२८ गावांत राबविली जात आहे. गोंदिया शहरात सार्वजनिक ८२ तर खासगी ९३० मूर्तींची स्थापन केली जाणार आहे.
यात, रामनगर ठाण्यांतर्गत सार्वजनिक ६० तर खासगी ३००, गोंदिया ग्रामीण अंतर्गत सार्वजनिक ११० तर खासगी ५००, रावणवाडी अंतर्गत सार्वजनिक ६२ तर खासगी २९०, तिरोडा अंतर्गत सार्वजनिक ५० तर खासगी २५०, गंगाझरी अंतर्गत सार्वजनिक ४१ तर खासगी ११०, दवनीवाडा अंतर्गत सार्वजनिक १३ तर खासगी ६५, आमगाव अंतर्गत सार्वजनिक ७० तर खासगी ६६५, गोरेगाव अंतर्गत सार्वजनिक ५५ तर खासगी २१५, सालेकसा अंतर्गत सार्वजनिक १०५ तर खासगी २००, देवरी अंतर्गत सार्वजनिक ५८ तर खासगी २१५, चिचगड अंतर्गत सार्वजनिक ६३ तर खासगी ३०, डुग्गीपार अंतर्गत सार्वजनिक ८२ तर खासगी ७०, नवेगावबांध अंतर्गत सार्वजनिक २५ तर खासगी १७५, अर्जुनी-मोरगाव अंतर्गत सार्वजनिक ६५ तर खासगी २५०, केशोरी ठाण्यांतर्गत सार्वजनिक २८ तर खासगी ३७० गणपतींची स्थापना होणार आहे.
४२८ गावांत ‘एक गाव-एक गणपती’
गणेशोत्सवादरम्यान गावातील शांतता अबाधित राखण्यासाठी महात्मा गांधी तंटामुक्त समितीच्या पुढाकाराने ‘एक गाव-एक गणपती’ची संकल्पना जिल्ह्यातील ४२८ गावांत राबविली जात आहे. गोंदिया शहरात एक, गोंदिया ग्रामीण २०, रावणवाडी २८, तिरोडा २५, गंगाझरी २०, दवनीवाडा ९, आमगाव २४, गोरेगाव ४०, सालेकसा ६०, देवरी ३८, चिचगड ४४, डुग्गीपार ४३, नवेगावबांध १९, अर्जुनी-मोरगाव ३६, केशोरी २१ अशा ४२८ गावांत एकाच गणपतीची स्थापना केली जाणार आहे.
१८०० कर्मचारी बंदोबस्तात
गणेशोत्सव शांततेत पार पडावे यासाठी जिल्हा पोलिसांकडून पथके तयार करण्यात आली आहेत. दंगल नियंत्रक तीन पथक, चार उपविभागीय अधिकाऱ्यांकडे प्रत्येकी एक ट्रॅकींग फोर्स, पोलीस अधीक्षक व अप्पर पोलीस अधीक्षक यांच्याकडे प्रत्येकी एक ट्रॅकींग फोर्स सी-६० चे पथक राहणार आहेत. शिवाय बॉम्बशोध-नाशक पथकही नेमण्यात आले आहे. सोबतच पोलीस विभागाचे १२०० कर्मचारी व ६०० गृहरक्षक दलाचे जवान बंदोबस्तात राहणार आहेत.
ग्राम सुरक्षा दल झाले सज्ज
गावातील सण-उत्सव शांततेत पार पाडण्यासाठी महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीने पुढाकार घेतला आहे. गावातील सण, उत्सव, मेळावे, महापुरूषांच्या जयंती, पुण्यतिथी पोलीस बंदोबस्ताशिवाय पार पाडता याव्या यासाठी तंटामुक्त समित्यांनी आपापल्या गावात ग्राम सुरक्षा दलाला सज्ज केले आहे. मूर्तीच्या सुरक्षिततेसाठी उत्सव मंडळ व ग्राम सुरक्षा दलने पुढाकार घेतला आहे.