प्रभाग क्रमांक ४ मध्ये पाणी पेटले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2020 05:00 AM2020-06-01T05:00:00+5:302020-06-01T05:00:39+5:30
अर्जुनी नगरपंचायत होऊन ५ वर्षे झाली. पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणे हे स्थानिक स्वराज्य संस्थेची जबाबदारी आहे. सध्या नवतपा सुरू असून कोरोनाच्या सावटाखाली अख्खे जग आहे. अशा परिस्थितीत पिलाबोडी परिसरातील महिला डोक्यावर गुंड घेऊन चक्क राज्यमार्ग ओलांडून पाण्यासाठी भटकंती करीत आहेत.
राधेश्याम भेंडारकर ।
लोकमत न्यूज नेटवर्क
अर्जुनी-मोरगाव : शहरातील प्रभाग क्रमांक- ४ मधील पिलाबोडी परिसरातील बोअरवेल मागील ४ वर्षांपासून नादुरूस्त आहे. यामुळे येथील महिलांना पिण्याच्या पाण्यासाठी राज्यमार्ग ओलांडून पाणी आणण्यासाठी जावे लागत आहे. वारंवार मागणी करूनही नगरपंचायतचे याकडे दुर्लक्ष असल्याने प्रभागवासी मात्र पाण्यासाठी तडफडत आहेत.
अर्जुनी नगरपंचायत होऊन ५ वर्षे झाली. पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणे हे स्थानिक स्वराज्य संस्थेची जबाबदारी आहे. सध्या नवतपा सुरू असून कोरोनाच्या सावटाखाली अख्खे जग आहे. अशा परिस्थितीत पिलाबोडी परिसरातील महिला डोक्यावर गुंड घेऊन चक्क राज्यमार्ग ओलांडून पाण्यासाठी भटकंती करीत आहेत. एकीकडे कोरोनामुळे फिजिकल डिस्टन्स ठेवण्यास प्रशासन सांगत आहे, तर दुसरीकडे पाण्यासाठी विशिष्ट बोअरवेलवर गर्दी होत असल्याचे चित्र आहे.
या परिसरात सुमारे ३० कुटुंब वास्तव्यास असून त्यांच्या सोयीकरिता बोअरवेल आहेत. मात्र गेल्या चार वर्षांपासून ते नादुरूस्त आहेत. त्यातून कधी गढूळ पाणी येते, तर कधी पाणीच येत नाही अशी अवस्था आहे. यापुर्वी याच समस्येला घेवून काही महिलांनी नगरपंचायतवर आक्रोश मोर्चा काढला होता. तेव्हा लवकरच समस्या दूर करण्याचे आश्वास नगर पंचायतने देऊन वेळ मारुन नेल्याचा आरोप येथील नागरिकांनी केला आहे. स्थानिक महिलांनी वारंवार बोअरवेल दुरुस्ती करण्याची मागणी केली. मात्र नगरपंचायत अधिकारी आणि पदाधिकारी यांनी ढुंकूनही बघितले नाही, अशी तक्रार महिलांनी केली. आता तरी नगरपंचायत प्रशासन या गंभीर बाबीकडे लक्ष देईल काय? असा प्रश्न निर्माण होत आहे. ही समस्या मार्गी लावण्याची मागणी आहे.
चार वर्षांपासून पायपीट सुरु आहे.
आम्ही अनेकदा नगरपंचायतला जाऊन पिण्याच्या पाण्यासाठी नवीन बोअरवेल तयार करुन द्या किंवा जुना दुरु स्त करण्याची मागणी केली. मात्र आमच्या मागण्यांकडे कुणीच लक्ष देत नाही. जीव मुठीत धरून दूरवरून पाणी आणावे लागते.
- आशा इस्कापे
------------------
गरिबाला न्याय नाही!
नगरसेवक व नगरपंचायत अधिकारी-कर्मचाऱ्यांना अनेकदा भेटून बोअरवेल दुरुस्ती करा अशी मागणी केली. बोअरवेल बंद असल्याने एकाच ठिकाणी गर्दी करावी लागते. पाण्यासाठी भरपुर वेळ वाया जातोे.गरिबाला न्याय नाही.
- शीला मेश्राम
------------------
नवीन जागा शोधून ४ महिने झाले
४ महिन्यांपूर्वी नवीन बोअरवेल खोदण्यासाठी जागा बघून गेले.आम्हाला बरे वाटले होते. उन्हाळा संपत आला मात्र पाणी नाही मिळाले.
-रायवंता बंसोड
------------------
लवकरच दुरूस्ती होईल जाधव
पाणीटंचाई होऊ नये म्हणून नगरातील सर्व बोअरवेल तपासणी करण्याचे आदेश दिले आहेत. १३ नादुरूस्त बोअरवेलची माहिती मिळाली आहे.लवकरच योग्य त्या उपाययोजना करण्यात येतील.
- शिल्पाराणी जाधव
मुख्याधिकारी, नगर पंचायत, अर्जुनी-मोरगाव